- डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
(अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)
घट्ट व टोकदार (सुपारी, बडीशेप/सौन्फ इतर) वस्तु दाताने चावणे, तोडणे ह्यामुळे मुखामध्ये गालातील आतील नाजुक बाजूस इजा पोहोचते व तेथे व्रण(अल्सर) झाल्यास खूप त्रासदायी असते, एवढे की तोंड उघड़णे, जेवणे, बोलणे, ब्रश करणे पण शक्य होत नाही.
मागील लेखामध्ये आपण बघितलेच आहे की कोणत्या गोष्टींमुळे आपल्या मुखाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ह्या लेखामध्ये पाहुया अजून काही गोष्टी.
जेव्हा व जितक्या वेळा आपण दात स्वच्छ करतो तेव्हा जीभ स्वच्छ करणेसुद्धा अपेक्षित असते. ब्रशच्या मागील बाजूस तशी व्यवस्था असते किंवा टंगक्लीनर वेगळा मिळतो. कारण जर अपचन झाले तर त्याची छटा जिभेवर एखादा सफ़ेद किंवा पिवळा लेप असल्यासारखी उमटते व ती साफ करणे महत्वाचे. कारण ते जर असेच राहिले तर त्यातूनच मुखाला घाण वास इत्यादी होऊ शकते. म्हणूनच तर डॉक्टर नेहमी जीभ अगोदर पाहतो. कारण येथेच तुमच्या पचनाचा अंदाज येतो व तेथेच रोगाचे मूळ असते.
अजून एक की ज्याच्यामुळे दात इतर खराब होतात ते म्हणजे कारबोनेटेड ड्रिंक्स/सॉफ्ट ड्रिंक्स. ज्यावेळी आपण तहान लागली, गरम झाले म्हणून एखादे कार्बोनेटेड शीतपेय पितो तेव्हा तात्पुरते ते दिलासा देईलही पण जे शीत आहे ते रुक्षता व कोरडेपणाही आणेल आणि ह्याच कारणामुळे मुख, घश्याच्या ठिकाणी अजूनच रुक्षता व शुष्कता येऊन तहान अजूनच वाढेल. जेवढे सॉफ्ट ड्रिंक्स प्याल तेवढ़े कमीच. ह्या कार्बोनेटेड शीतपेये प्यायल्याने पोटात फक्त गॅस होईल आणि पचनशक्ती कोलमड़ेल. रूपांतर काय तर भुख व्यवस्थित नसेल, जेवल्यास अपेक्षित पचन होणार नाही, अम्लपित्त, मलावष्टम्भ(संडासला घट्ट होणे/ व्यवस्थित न होणे) सारख्या तक्रारी मग मागे लागतात आणि हेच अपचन मग जिभेवर उमटेल.
मुखाच्या ठिकाणी शुष्कता, खरखरितपणा, मुखातुन सतत स्राव/पाणी येणे, आतील लाल, गुलाबी रंग बदलणे व थोडा काळया (जे गुट्खा, तंबाखू खाणार्यांमध्ये जास्त करुन जाणवते विशेषतः खालचे दात व ओठ ह्यात एखादा ड्रॉवर बाहेर काढून आत सामान ठेवावे असे तेथे गुट्खा इतर ठेवले जाते), पिवळसर, निळसर रंगाचा होणे, पुनःपुनः तहान लागणे, ताळुच्या ठिकाणी जळजळ होणे, ओठ फाटणे, भेगा पडणे, ओठांवर बुडबुड्याप्रमाणे सुज, मुखामध्ये आत खाज येणे, तोंडाला चव नसणे, मंद-तीव्र वेदना होतच राहणे, गळयाला व कंठाला सुज येणे, श्वास घेण्यास अडथळा होतो.
फोड, मोहरीच्या-बोराच्या बीच्या आकाराच्या वेदनासहीत/वेदनारहीत पुळया येणे, पूय, रक्तस्राव, दुर्गंधीत स्राव, तिखट-खारट पदार्थ सहन न होणे, मुखाच्या आतून चिकटपणा जाणवणे, ओठ निस्तेज होणे, दात हलु लागणे, हिरड्या फुगतात, मांस गळून पडणे, जीभ फाटणे, खरखरित होणे, संवेदना/रसज्ञान नष्ट होणे, जीभेवर फोड येणे, जड झाल्यासारखी वाटणे, आवाज़ बदलणे, सतत खोकला येणे, घशात नेहमी काहीतरी अडकल्यासारखे वाटणे व ते साफ करण्याचा सतत प्रयत्न करत राहणे असे अनेक रोग व तक्रारी होऊ शकतात.
मासे, म्हैस, रेडा, डुक्कर(बीफ, पोर्क) यासारख्या प्राण्यांच्या पचायला जड अश्या मांसाचे अतिसेवन, कोवळा मुळा, उडदाचे कढण, दही, दुध व दुधाचे पदार्थ, उसाचा रस, काकवी, आंबट रसाचे पदार्थ, गुळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने, पालथे झोपणे, दिवसा झोपणे, दारु पिणे यामुळे मुखाचे रोग होतात असे आयुर्वेद सांगतो.
तसेच घट्ट व टोकदार (सुपारी, बडीशेप/सौन्फ इतर) वस्तु दाताने चावणे, तोडणे ह्यामुळे मुखामध्ये गालातील आतील नाजुक बाजूस इजा पोहोचते व तेथे व्रण(अल्सर) झाल्यास खूप त्रासदायी असते, एवढे की तोंड उघड़णे, जेवणे, बोलणे, ब्रश करणे पण शक्य होत नाही. कारण ज्यावेळी तोंड उघडाल त्यावेळी तो भरत चाललेला व्रण पुनः उघडा होतो आणि वेदना देतो. अश्या तक्रारींमध्ये ब्रश/काष्ठाने दंतधावन करणे वर्ज्य आहे.
मुखरोगांमध्ये मुग, कुळीथ, मेथी, कारले, पडवळ, औषधी तांबूल(अर्थात सुपारी इतर न घातलेले), कापराचे पाणी, वाळा, कोमट पाणी, तुप, खैर (याचा काढा) सारखे खाद्य पदार्थ हितकर आहेत.