सीएएबाबत विरोधकांकडून मुस्लिमांची दिशाभूल

0
133

>> नवी दिल्लीतील भाजपच्या सभेत पंतप्रधानांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात विरोधकांकडून मुस्लिम समाजाची दिशाभूल केली जात असल्याची जोरदार टीका केली. गरिबांच्या कल्याणासाठी, विकास योजनांसाठी आम्ही कधीही कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

गरिबाच्या झोपड्या, वाहने जाळू नका. गरिबांना मारून तुम्हाला काय मिळणार? मोदींना नाव ठेवा, मोदींचा तिरस्कार करा. मोदींचा जेवढा विरोध करायचा तेवढा नक्की करा, परंतु देशाची संपत्ती जाळू नका असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

दिल्लीतील १७३४ अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजपकडून रामलीला मैदानात ‘धन्यवाद’ सभेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना पंतप्रधानांनी, सुधारित नागरिकत्व विधेयक गरिबांविरोधात असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. या कायद्यामुळे गरिबांचा हक्क हिरावून घेण्यात येणार असल्याचा अपप्रचार सुरू आहे. किमान खोटे बोलताना गरिबांवर दया करा, असे विरोधकांना सुनावले. अफवा पसरवणारे दोन प्रकारे लोक असून त्यातील एका गटाला अनेक दशके वोटबँक मिळत होती आणि दुसरा गटाला राजकीय फायदे मिळत होते. हे दोन्ही गट अफवा पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. हे विरोधक आपल्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, दिल्लीतील शेकडो अनधिकृत वस्त्यांना अधिकृत करण्यात येऊन सुमारे ४० लाख लोकांना अधिकार मिळाला. यामध्ये आम्ही कोणालाही धर्म, जात विचारली नाही. दिल्लीतील लोकांना आम्ही अधिकार देत आहोत आणि आम्ही त्यांचा अधिकार हिसकावून घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. माझ्या कामाची पडताळणी करा. त्यात भेदभाव आढळल्यास देशासमोर मांडण्याचे आव्हान मोदींनी विरोधकांना दिले.

दलित नेत्यांवरही प्रहार
दिल्लीतील रामलीला मैदानावर बोलताना पंतप्रधानांनीदलित नेत्यांच्या भूमिकेवरही टीका केली. मोदी म्हणाले की, हा कायदा नेमका काय आहे, नेमकी दुरुस्ती काय आहे याचा अभ्यास न करता देशातील दलितांचे काही नेतेही या वादात पडले आहेत. ज्यांच्यावर शेजारी देशांमध्ये धार्मिक अत्याचार झाले अशांना संरक्षण देणार हा कायदा आहे. पाकिस्तानातून आलेले शरणार्थी हे अधिकतर दलित समाजाचे आहेत. आजही पाकिस्तानात दलितांना गुलामीचे जीवन जगावे लागत असून त्यांचे बळजबरीने धर्मांतर केले जात आहे.