इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) काल रविवारी एफसी गोवा संघाने ओडिशा एफसीचा घरच्या मैदानावर ३-० असा धुव्वा उडविला. याबरोबरच गोव्याने गुक्तक्त्यात पहिले स्थान मिळविले स्पेनचा स्टार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने दोन गोलांसह मोलाचा वाटा उचलला. ब्रेंडन फर्नांडिसने एका गोलची भर घातली.
गोव्याने ९ सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून तीन बरोबरी आणि एकमेव पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १८ गुण झाले. गोव्याने बंगळुरू एफसी (९ सामन्यांतून १६) आणि एटीके (९ सामन्यांतून १५) यांना मागे टाकले. त्यांनी तीनवरून पहिला क्रमांक गाठत आघाडी घेतली. ओडिशाला ९ सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. दोन विजय आणि तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे ९ गुण आणि सातवे स्थान कायम राहिले.
खाते उघडण्याची शर्यत गोव्याने जिंकली. उजव्या बाजूने जॅकीचंद सिंग याने ही चाल रचली. त्याने गोलक्षेत्रात ह्युगो बुमूसला पास दिला. बुमूसने अचूक पास देताच स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने सोप्या संधीचे अचूक फिनीशिंग केले.
निर्धारित वेळ संपण्यात पाच मिनिटे बाकी असताना कोरोमीनासने ब्रेंडन फर्नांडिसला पास दिला. ब्रेंडनने पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवित ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याच्या दिशेने ताकदवान फटका मारला. अर्शदीपला पुरेशी ताकद लावून चेंडू अडविता आला नाही. त्याच्या हाताला लागलेला चेंडू नेटमध्ये गेला. एक मिनिट बाकी असताना गोव्याला पेनल्टी मिळाली. कॉर्नरवर कोरोमीनास याने फटका मारण्याचा प्रयत्न करताच अर्शदीपने त्याला ढकलले. त्यामुळे पंच एल. अजितकुमार मैतेई यांनी गोव्याला पेनल्टी बहाल केली. ती घेण्यासाठी कोरोमीनासच पुढे आला.
त्याने डावीकडे फटका मारला, पण ताकदवान आणि अचूक फटका अर्शदीपला अडविता आला नाही. गोव्याने आक्रमक सुरवात केली. दुसर्याच मिनिटाला ब्रेंडन फर्नांडिसने डावीकडून चाल रचली. त्याने प्रतिस्पर्धी बचाव फळीच्या वरून चेंडू मारताच मंदारराव देसाई याने मुसंडी मारली. त्याने प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. तिसर्या मिनिटाला लेनी रॉड्रीग्जने चेंडूवर ताबा मिळविला. त्याने मुर्तडा फॉलला पास दिला. त्यातून बुमुसला संधी मिळाली. त्याचा फटका मात्र ओडिशाच्या डियावँडौ डियाग्ने याच्या पायाला लागून चेंडू नेटच्या अगदी जवळून बाहेर गेला. पाचव्या मिनिटाला गोव्याला फ्री किक मिळाली. त्यावर कोरोमीनासने जॅकीचंदला उजवीकडे छान पास दिला, पण जॅकीचंद चेंडूवर नीट ताबा मिळवू शकला नाही. त्यातच नारायण दासने त्याला पाडले. अथक चालींचे फळ गोव्याला पहिल्या सत्रात मिळाले. मग दुसर्या सत्रातही हेच घडले. अंतिम टप्यात गोव्याने दोन गोल केले.