आजीच्या घराचं अंगण

0
418
  • गौरी भालचंद्र

सुंदर अशी ती भरपूर फुलं आणून माझ्या आजीकडे मी देते आणि पुन्हा हावर्‍यासारखी अंगणातली फुलं वेच वेच वेचून मिळणारं ते समाधान इतकं तृप्त करणारं असतं की शब्दसुद्धा कमी पडतील सांगायला… आमच्या आजीच्या घरी असलेला तो बकुळ मला अगदी मनापासून आवडतो …

मला खूप आवडते पावसाळी हवा… जेव्हा येते तेव्हा मनाला खुप्प समाधान वाटतं. मस्त अशी सुरेख संध्याकाळ … सुखावून जात अशी पायर्‍यांवर बसलेली मी… वार्‍याच्या झोताने हळुवार पडणारी अंगणातली पाने … त्यातून मिळणारा पावसाचा संदेश… संध्याकाळचं असं सुरेख मस्त वातावरण … हळूहळू सुरु होणारी पावसाची सुंदर रिमझिम… मनाला अगदी सुखावून जाते. खूपच छान वाटते.

बकुळीच्या झाडाची फुलं पावसाच्या आगमनाने, त्याच्या सोबत येणार्‍या वार्‍याच्या झोताने हलून हलून खाली कोसळतात.. आणि भराभर मी ती वेचायला लागते. ओच्यात घेते … तृप्त व्हायला होतं ती फुलं पहिली की, त्यांचा वास, वार्‍यासोबत येणार्‍या पावसाचा हळुवार वास, सोबत मंद सुगंधाची असलेली ती फुलं … पावसाच्या हळुवार पडणार्‍या पाण्याचे टपोरे थेंब…मातीत कोसळताना त्यांचा येणारा गंध मनाला अगदी तृप्त तृप्त करून जात असतो.

सुंदर अशी ती भरपूर फुलं आणून माझ्या आजीकडे मी देते आणि पुन्हा हावर्‍यासारखी अंगणातली फुलं वेच वेच वेचून मिळणारं ते समाधान इतकं तृप्त करणारं असतं की शब्दसुद्धा कमी पडतील सांगायला… आमच्या आजीच्या घरी असलेला तो बकुळ मला अगदी मनापासून आवडतो … आठवतो … भरभरून पडणारी ती फुलं वेचतानाचं ते तृप्त समाधान मनाला अगदी सुगंधित मोहीत करत असतं आणि त्यातून मनाला मिळणारी तृप्ती एक वेगळाच आनंद देऊन जाते …
पावसाच्या आगमनाने मनाला अगदी सुखावल्यासारखं होतं आणि येणारी पावसाळी संध्याकाळ वातावरणात नानाविध रंगांचे एक कोंदण तयार करत असते आणि त्या कोंदणाला आपण डोळे भरून न्याहाळत असतो. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे आजूबाजूच्या वातावरणात होणारे बदल मनाला सुखावून जात असतात …
स्वयंपाकखोलीतून येणारा चहाचा वास पावसाच्या वासासोबत अधिकच प्रफुल्लीत करणारा.. हवाहवासा वाटणारा असा असतो. पावसाची रिमझिम त्यासोबत सुखावून जात असते. अगदी बरं वाटत असत.

तिथेच बाजूला असलेलं प्राजक्त… पावसासोबत येणार्‍या वार्‍याने आणि पावसाच्या ओलाव्याने सडा टाकते अंगणात…आणि तो सुरेख सडा पावसातून मध्ये मध्ये भिजत भिजत फुलं वेचताना एक अप्रतिम आनंद मनाला होतो. ती केशरट रंगाची देठं असलेली पांढरी शुभ्र फुलं अत्यंत सुंदर, मोहक अशी नाजूक फुलं हातात घेताना मनाला खूपच छान वाटत असतं. एकदम मस्त वाटतं.

पावसाचे थेंब जेव्हा मोगर्‍याच्या फुलांवर पडतात तेव्हा ती दिसणारी टपोरी फुलं अजून सुंदर होत जातात. टपोरी भासतात. अंगणात फिरताना… पावसासोबत संध्याकाळी वावरताना पावसाळी संध्याकाळ मनाला एक सुवास देऊन जात असते. मोगर्‍याला येणारा गंध पावसाच्या वातावरणात अजूनच प्रफुल्लीत करणारा ठरतो मनाला … ताजातवाना करतो. उत्साहाने भारल्यासारखं होतं … आणि काय करू नि काय नको असं वाटतं . इतकं छान वाटतं.

पावसातून पडणार्‍या छानशा गारा अंगणात धावत जाऊन वेचायला मजा येते. त्यांच्या आवाजानेसुद्धा मनाला एक वेगळंच वाटतं असतं. रस्ते चिंब ओले, संध्याकाळचं ते सुरेख असं विविध फुलांनी बहरलेलं वातावरण … माझ्या आजीच्या घराचं अंगण मनाला नेहमीच भुरळ घालतं माझ्या.

ती सुंदर कोरांटीची फुलं, ती आकर्षक अशी चाफ्याची फुलं, कोरांटीच्या गुलाबी, पांढर्‍या, पिवळ्या अशा रंगानी बहरलेली वेणी जेव्हा आजी बनवते त्याचे रंग आणि त्या वेणीची गुंफण पाहून फारच मनमोहक वाटतं. खूपच आनंद मिळतो मनाला.
या पावसाळी संध्याकाळी फुलांच्या सोबत पावसात हळुवार भिजत, फुलांचा गंध अनुभवत … फुले ओंजळीत भरताना मनाला अगदी सर्वकाही मिळाल्याचं समाधान लाभतं. इतकं मोकळं छान सुरेख वाटतं मनाला की जणू आकाशच ठेंगणं झाल्यासारखं वाटतं …. आपलं मन म्हणजे …! आणि त्या आकाशातली रंगबिरंगी रंग पावसाच्या इंद्रधनुष्यी कमानीतून आपल्या मनामध्ये साकारतात. रेखाटतात … आणि आपलं मनच सुखाच्या हिंदोळ्यावर झुलायला लागतं… अगदी सहजपणे …