- शंभू भाऊ बांदेकर
आर्थिक सुबत्ता आली खरी, पण संस्कृतीची घसरणही होताना दिसते आहे. शिवाय कचर्याचे वाढते ढीग, झाडांची बेसुमार कत्तल, प्रदूषण, वाढती कॉंक्रिटची जंगले यामुळे मूळ गोव्याचे सर्व स्वरूपच बदलत चालले आहे. यावर चिंतन करणे गरजेचे आहे.
तब्बल साडेचारशे वर्षे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीत खितपत पडलेला गोवा ज्ञात – अज्ञात हुतात्म्यांनी बलिदान देऊन बजावलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे शेवटी १९ डिसेंबर १९६१ रोजी मुक्त झाला आणि आपला भारत देश खर्या अर्थाने स्वतंत्र झाला. काल आपण तो उत्साहात साजराही केला.
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर १४ वर्षांच्या वनवासानंतर गोवा मुक्त झाला. हा वनवास स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्या नाकर्तेपणामुळे भोगावा लागला असे अनेकवेळा अनेक मान्यवरांकडून ऐकावे लागत होते व अजूनही ऐकावे लागते. या १४ वर्षांच्या वनवासाबद्दल पं. नेहरू यांनी जे स्पष्टीकरण दिलेले आहे, त्यातून त्यांची भूमिका काय होती हे आपल्या चांगल्याप्रकारे लक्षात येऊ शकते.
पं. नेहरूंनी संसदेमध्ये केलेली भाषणे पाहिली तर त्यामध्ये गोव्याच्या जनतेच्या स्वातंत्र्याकांक्षेचे जोरदार समर्थन त्यांनी सदोदित केलेले दिसते. नवप्रभेने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात त्यासंबंधीचे विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. ‘‘गोव्यात पोर्तुगिजांनी आपल्या सैन्यदलात वाढ केली आहे. काही युद्धनौकाही आणल्या आहेत. काही विमानेही असावीत, अशा प्रकारची चिथावणीखोर कृती ते का करीत आहेत, हे मला ठाऊक नाही. जणू काही आम्ही काही कृती करावी अशीच त्यांची इच्छा आहे.’’ असे प्रतिपादन करून गेल्या चौदा वर्षांत गोवा मुक्तीची कारवाई का केली नाही यावर पं. नेहरूंनी स्पष्टीकरण केले होते की, ‘‘त्यामागचे कारण पोर्तुगाल हे नव्हते. इतर बाबतीत काय होईल याच विचाराने आम्ही शांत राहिलो. मात्र त्यांना हाकलणे हा आमचा हक्क आहे यावर आम्ही ठाम होतो. फक्त परिणामांचा विचार करून आम्ही कृती केली नाही, पण जेव्हा असह्य झाले तेव्हा आम्ही कारवाई केली.’’हे वास्तव लक्षात न घेता आज गोवामुक्तीच्या ५८ वर्षांनंतरही यावर वेगळेच भाष्य काही जणांकडून केले जाते याचे आश्चर्य वाटते.
आज गोव्यातील नैसर्गिक संपत्ती आणि सौंदर्य तसेच येथील शांतता, सुबत्ता, सुव्यवस्था यामुळे गोवा हा केवळ भारत देशातलेच नव्हे, तर साता समुद्रापार अत्यंत महत्त्वाचे व रमणीय पर्यटनक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस पावला आहे. शिवाय सरकारने गोवा हे बारमाही पर्यटनक्षेत्र म्हणून जाहीर करून व त्यासाठी देशी – विदेशी पर्यटकांना खास पॅकेज जाहीर करून आकर्षित केले आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्यांतून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात गोव्यात येत असतेच, शिवाय रशिया, तुर्कस्तान, कॅनडा, नायजेरिया आणि अन्य देशांतील पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात येत असतात. खाण व्यवसाय बंद पडल्यामुळे गोव्याच्या महसुलात झालेली कोट्यवधी रुपयांची घट येथे पर्यटन हा प्रमुख उद्योग होऊ घातल्याने कोट्यवधी रुपयांनी वाढेल अशी आशा बाळगायला मुळीच हरकत नाही. मात्र, हे सारे कशाचा बळी देऊन होत आहे याचाही गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. कारण येथे वाढलेली कॅसिनोंची संख्या, ब्यूटीपार्लर्सच्या नावे वाढलेला वेश्याव्यवसाय, अमली पदार्थांची देवाणघेवाण, अनैतिक व्यवहार अशा गोष्टींमुळे गोव्याची मूळची शांतता, सुबत्ता व सुव्यवस्था धोक्यात तर येणार नाही ना अशी शंका आल्यावाचून राहात नाही.
दिवसेंदिवस परप्रांतीयांची लोकसंख्या येथे वाढत चालली असून तो चिंतेचा विषय बनलेली आहे. गोव्याच्या एकूण ३ हजार ७०२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी आता फक्त ३६० चौरस किलोमीटर एवढीच जागा विकास प्रकल्पांसाठी, निवासी प्रकल्पांसाठी शिल्लक राहिली आहे, अशी माहिती शासकीय आकडेवारीतून पुढे आली आहे. याचाच अर्थ आता गोव्यातील नव्या पिढीकरिता त्यांचा निवास, त्यांचे टोलेजंग घर सोडाच, पण छोटे निवासस्थान आणि छोटे प्रकल्प सुद्धा प्रत्यक्षात येणे कठीण होऊन बसणार आहे. ही गोव्याच्याव गोवेकरांच्या दृष्टीने चिंतेची व भयावह अशी बाब आहे.
गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण हे केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापरले जात आहे. त्यात आघाडीवर असलेल्या राजकारण्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही म्हणून याकडे गांभीर्याने विचार करून त्यादृष्टीने योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. नपेक्षा तमाम गोमंतकीयांवर बैल गेला नि झोपा केला अशी अवस्था ओढवण्यास वेळ लागणार नाही. गोव्यातील जाणकार, विचारवंत याबाबत अजून गप्प का आहेत बरे? त्यांनी संबंधितांच्या लक्षात या गोष्टी आणून देण्यातच गोव्याचे हित आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही असे कसे म्हणावे?
आज आमच्या मुक्त गोव्याचे चित्र काय दिसते? आपण जेव्हा स्वतःलाच हा प्रश्न करतो, तेव्हा जे उत्तर मिळते ते आनंददायी नसते, कारण आपला गोवा परकीयांच्या हुकुमशाही जोखडातून मुक्त झाला, पण लोकशाही मार्गाने आलेल्या सत्तेत हळूहळू भ्रष्टाचाराचा भस्मासुर थैमान घालू लागला. येथे लहानसहान गोष्टींवरून मारामार्या, बलात्कार, खून, अत्याचार यांचे प्रमाण वाढले. आर्थिक सुबत्ता आली खरी, पण संस्कृतीची घसरणही होताना दिसते आहे. शिवाय कचर्याचे वाढते ढीग, झाडांची बेसुमार कत्तल, प्रदूषण, वाढती कॉंक्रिटची जंगले यामुळे मूळ गोव्याचे सर्व स्वरूपच बदलत चालले आहे. यावर चिंतन करणे गरजेचे आहे.