गतविजेत्या बेंगळुरू एफसीने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात पुन्हा आघाडी घेतली. येथील इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवर बेंगळूरू एफसीने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला २-० असे हरविले. दुसर्या सत्रात कर्णधार सुनील छेत्रीने पेनल्टीवर खाते उघडले, तर अल्बर्ट सेरॅन याने नऊ मिनिटे बाकी असताना भर घातली.
बेंगळुरूने या विजयासह गुणतक्त्यात आघाडी घेतली. गतविजेत्यांनी ९ सामन्यांत चौथा विजय मिळविला असून चार बरोबरी आणि एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १६ गुण झाले. त्यांनी एफसी गोवा (८ सामन्यांतून १५) आणि एटीके (८ सामन्यांतून १४) यांना मागे टाकले. नॉर्थईस्टला ८ लढतींत दुसरीच हार पत्करावी लागली. २ विजय आणि ४ बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे १० गुण आहेत. गोलफरक खालावल्यामुळे त्यांची एक क्रमांक घसरण झाली. आता मुंबई सिटी एफसी चौथ्या क्रमांकावर आला. मुंबईचा गोलफरक उणे २ (१३-१५), तर नॉर्थईस्टचा उणे ३ (८-११) असा आहे. दुसर्या सत्रात बेंगळुरूने नॉर्थईस्टच्या क्षेत्रात अधिकाधिक चढाया केल्या. सुरवातीला मिस्लाव कोमोर्स्की याच्या नेतृत्वाखालील बचाव फळीने यजमान संघाचे क्षेत्र सुरक्षित राखले होते, पण नॉर्थईस्टचा मध्यरक्षक रेडीम ट्लांग याने ६७व्या मिनिटाला गोल क्षेत्रात चुकून हाताने चेंडू अडविला.
त्यामुळे बेंगळुरूला पेनल्टी बहाल करण्यात आली. या सुवर्णसंधीचे बेंगळुरूचा कर्णधार सुनील छेत्रीने सोन केले. ८१व्या मिनिटाला मध्य फळीतील एरीक पार्टालू याच्या चालीवर बचाव फळीतील स्पेनच्या ३५ वर्षीय अल्बर्ट सेरॅन याने लक्ष्य साधले.
निकाल :
नॉर्थईस्ट युनायटेड एफसी : ० पराभूत विरुद्ध
बेंगळुरू एफसी : २ (सुनील छेत्री ६८-पेनल्टी, अल्बर्ट सेरॅन ८१)