टीम इंडियाचा विंडीजवर १०७ धावांनी विजय

0
118

>> रोहित शर्मा, लोकेश राहुलची शतके; कुलदीपची हॅट्‌ट्रिक

>> तीन सामन्यांच्या मालिकेत भारताची १-१ अशी बरोबरी

रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी दिलेल्या २२७ धावांच्या भक्कम सलामीनंतर कुलदीप यादव व मोहम्मद शमी यांनी केलेल्या तिखट मार्‍याच्या जोरावर विराट कोहलीच्या टीम इंडियाने काल बुधवारी झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात विंडीजवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या ३८८ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ ४३.३ षटकांत केवळ २८० धावांत आटोपला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताकडून कुलदीप यादवने हॅट्‌ट्रिकची नोंद करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीजने डावाची आश्वासक सुरुवात केली होती. एविन लुईस आणि शेय होप यांनी ६१ धावांची सलामी देत भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही. ही जोडी फुटल्यानंतर विंडीजचा डाव थोडा अडखळला. श्रेयस अय्यर व रवींद्र जडेजा यांनी सुरेख समन्वय दाखवत धोकादायक हेटमायरला क्रीझबाहेर गाठताना विंडीजला दुसरा धक्का दिला. यावेळी फलकावर केवळ ७३ धावा लागल्या होत्या. हेटमायरच्या अपयशामुळे विंडीजचे समीकरण चुकले व त्यांनी निकोलस पूरनच्या जागी रॉस्टन चेजला चौथ्या स्थानावर पाठवण्याचा जुगार खेळला. परंतु, रवींद्र जडेजाने चेजचा त्रिफळा उडवून विंडीजला ३ बाद ८६ असे कोंडीत पकडले.
यानंतर निकोलस पूरन आणि होप यांनी १०६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचत विंडीजच्या आशा पल्लवीत ठेवल्या. दोन्ही फलंदाजांनी यादरम्यान आपली अर्धशतकेही पूर्ण केली. पूरनने आपले चौथे तर होपने १५वे वनडे अर्धशतक केले. मात्र मोहम्मद शमीने एकाच षटकात पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डला माघारी धाडत विंडीजला दणके देत त्यांची ३ बाद १९३ वरून ५ बाद १९३ अशी घसरगुंडी उडवली. यानंतर कुलदीप यादवने सामन्याच्या ३३ व्या षटकात शेय होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांना माघारी धाडत विंडीजच्या डावाला खिंडार पाडले. भारत विजयाच्या दारात उभा असताना विंडीजच्या शेपटाने कडवा प्रतिकार केला. ८ बाद २१० वरून त्यांनी २८० पर्यंत मजल मारत पराभवाचे अंतर कमी केले. भारताकडून कुलदीप यादव व मोहम्मद शमीने प्रत्येकी ३, रवींद्र जडेजाने २ तर शार्दुल ठाकूरने एक बळी घेतला. विंडीजचा एक फलंदाज धावबाद झाला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत द्विशतकी भागीदारी केली. रोहित-राहुल मैदानावर असताना विंडीजचे गोलंदाज हतबल दिसत होते. रोहितने आपले२८वे व राहुलने आपले तिसरे वनडे शतक झळकावत विंडीज गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. अखेरीस अल्झारी जोसेफने राहुलला माघारी धाडत भारताची जोडी फोडली. यानंतर कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. रोहित शर्माही कॉटरेलच्या गोलंदाजीवर होपच्या हाती झेल देऊन माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी मधल्या फळीत फटकेबाजी करत भारताची बाजू अधिक भक्कम केली. पंत याने फटकेबाजी करत केवळ १६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह झटपट ३९ धावा केल्या. श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत आपले सलग चौथे वनडे अर्धशतक पूर्ण केले. ४९ व्या षटकात श्रेयस अय्यर ५३ धावा काढून माघारी परतला. विंडीजकडून शेल्डन कॉटरेलने २ तर अल्झारी जोसेफ, किमो पॉल आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. मालिकेतील तिसरा सामना २२ रोजी कटक येथे खेळविला जाणार आहे.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. होप गो. कॉटरेल १५९ (१३८ चेंडू, १७ चौकार, ५ षटकार), लोकेश राहुल झे. चेज गो. जोसेफ १०२ (१०४ चेंडू, ८ चौकार, ३ षटकार), विराट कोहली झे. चेज गो. पोलार्ड ०, श्रेयस अय्यर झे. होप गो. कॉटरेल ५३, ऋषभ पंत झे. पूरन गो. पॉल ३९, केदार जाधव नाबाद १६, रवींद्र जडेजा नाबाद ०, अवांतर १८, एकूण ५० षटकांत ५ बाद ३८७

गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल ९-०-८३-२, जेसन होल्डर ९-०-४५-०, खारी पिएर ९-०-६२-०, किमो पॉल ७-०-५७-१, अल्झारी जोसेफ ९-१-६८-१, रॉस्टन चेज ५-०-४८-०, कायरन पोलार्ड २-०-२०-१

वेस्ट इंडीज ः इविन लुईस झे. अय्यर गो. ठाकूर ३०, शेय होप झे. कोहली गो. कुलदीप ७८ (८५ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार), शिमरॉन हेटमायर धावबाद ४, रॉस्टन चेज त्रि. गो. जडेजा ४, निकोलस पूरन झे. कुलदीप गो. शमी ७५ (४७ चेंडू, ६ चौकार, ६ षटकार), कायरन पोलार्ड झे. पंत गो. शमी ०, जेसन होल्डर यष्टिचीत पंत गो. कुलदीप ११, किमो पॉल त्रि. गो. शमी ४६, अल्झारी जोसेफ झे. जाधव गो. कुलदीप ०, खारी पिएर झे. कोहली गो. जडेजा २१, शेल्डन कॉटरेल नाबाद ०, अवांतर ११, एकूण ४३.३ षटकांत सर्वबाद २८०
गोलंदाजी ः दीपक चहर ७-१-४४-०, शार्दुल ठाकूर ८-०-५५-१, मोहम्मद शमी ७.३-०-३९-३, रवींद्र जडेजा १०-०-७४-२, कुलदीप यादव १०-०-५२-३, श्रेयस अय्यर १-०-१३-०

रोहितने मोडले अनेक विक्रम
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने भारतीय भूमीवर सर्वाधिक षटकार लगावण्याचा महेंद्रसिंग धोनी याचा विक्रम कालच्या आपल्या शतकी खेळी दरम्यान मोडला. रोहितने भारतातील ११६ डावांत १८७ षटकार ठोकले आहेत. धोनीच्या नावावर २०८ डावांत १८६ षटकार आहेत. सलग सातव्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये कॅलेडर वर्षातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आपल्या नावावर रोहितने केली. रोहितने काल १५९ धावा चोपल्या. यापूर्वी रोहितने २०१३ (२०९), २०१४ (२६४), २०१५ (१५०), २०१६ (१७१ नाबाद), २०१७ (२०८ नाबाद), २०१८ (१६२) या सहा वर्षांत कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या उभारणारा म्हणून नाव नोंदविले आहे.

२०१८ साली रोहितने ७४ षटकार खेचले होते. यंदा ७७ षटकार खेचत त्याने एका कॅलेंडर वर्षांत ७५ किंवा जास्त षटकार खेळणारा पहिला खेळाडू म्हणून नाव नोंदविले. तब्बल आठव्यांदा दीडशतकी वेस ओलांडताना रोहितने आपल्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर सहा दीडशतकांसह या बाबतीत दुसर्‍या स्थानावर आहे. रोहितने काल आपले यंदाच्या वर्षातील सातवे वनडे शतक साजरे केले. केवळ सचिन तेंडुलकर (९ शतके, १९९८) पुढे आहे. सौरव गांगुली (२०००) व डेव्हिड वॉर्नर (२०१६) यांची बरोबरी रोहितने केली. विशेष म्हणजे रोहितची यंदाची सातही शतके वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आहेत. ऑस्ट्रेलिया (१३३), द. आफ्रिका (१२२), पाकिस्तान (१४०), इंग्लंड (१०२), बांगलादेश (१०४), श्रीलंका (१०३) व वेस्ट इंडीज (१५९) यांच्याविरुद्ध रोहितने शतके ठोकली आहेत.

दोन हॅट्‌ट्रिक घेणारा
कुलदीप पहिला भारतीय गोलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून दोन हॅट्‌ट्रिक घेणारा पहिला खेळाडू होण्याचा मान चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने मिळविला. त्याने वेस्ट इंडीजच्या डावातील ३३व्या षटकात चौथ्या, पाचव्या व सहाव्या चेंडूवर अनुक्रमे शेय होप, जेसन होल्डर व अल्झारी जोसेफ यांना बाद केले. यापूर्वी २०१७ साली कुलदीपने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्‌ट्रिक घेतली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३ वेळा हॅट्‌ट्रिक घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा याच्या नावावर आहे. पाकिस्तानचा वासिम अक्रम, सकलेन मुश्ताक, श्रीलंकेचा चामिंडा वास व न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन वेळा हॅट्‌ट्रिक घेतली आहे.