श्वेत कुष्ठ किंवा कोड  भाग – १

0
157
– डॉ. स्वाती हे. अणवेकर,
(म्हापसा )
हा व्याधी एखाद्या व्यक्तीला कसा होतो ह्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पण शरीरात रोग प्रतिकार करणार्‍या पेशी शरीरातील त्वचेमध्ये असणार्‍या रंगोत्पादक पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. तसेच त्या व्यक्तीच्या शरीरातील जनुकांमध्ये होणार्‍या बिघाडामुळे देखील हा व्याधी होतो.
श्वेत कुष्ठ अथवा कोड ह्याला अर्वाचीन वैद्यक शास्त्रात ‘व्हिटिलिगो’ असे म्हणतात. ह्या व्याधीमध्ये शरीरावर पांढर्‍या वर्णाचे चट्टे तयार होतात. कारण त्वचेमध्ये असणार्‍या रंग उत्पादक पेशी- मेलॅनोसाईट्‌स ह्या नष्ट होतात. तसेच त्वचेमधील पिगमेंट्‌सदेखील त्वचेच्या काही भागात नष्ट होतात व त्यामुळे तो भाग इतर त्वचेपेक्षा पांढरा दिसू लागतो. ह्यात त्वचेच्या प्रभावित भागाचा रंग हलका होऊन तो नष्ट होतो व त्या भागात पांढरे चट्टे दिसू लागतात. हा व्याधी एकाच भागात स्थिर असू शकतो अथवा शरीराच्या अनेक भागांमध्ये पसरू शकतो.
ह्या व्याधीचे नेमके कारण सांगणे कठीण असून असे मानले जाते की हा एक Aऑटोइम्यून व्याधी आहे. ह्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही चुकून शरीराच्या काही चांगल्या पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करते. बर्‍याच व्यक्तींना हा आजार विसाव्या वयात अथवा चाळीशीपूर्वी होतो. ह्यामध्ये अनुवंशीकता देखील आढळून येते. त्यामुळे आपणास एखाद्या कुटुंबात अनेक पिढ्यांमध्ये हा व्याधी होताना दिसतो.
बर्‍याच वेळेस हे होण्यामागे शरीरामधील अन्य भागात होणार्‍या विकृती किंवा त्याचा परिणाम स्वरूप हा व्याधी एखाद्या व्यक्तीला होताना दिसतो. ह्यात थायरॉइड ग्रंथीची विकृतीदेखील आढळते. एखाद्या व्यक्तीला झालेला हा आजार हा प्रसार पावणार की तो स्थिर राहणार हे सांगणे कठीण असते. ह्या व्याधीमध्ये वेदना होणे, अथवा शरीरात कुठला अन्य मोठा आजार आढळत नाही तरीदेखील ती व्यक्ती मानसिक व भावनिक दृष्ट्या खचलेली आढळते. हा व्याधी शरीराच्या श्लेष्मल कलेला सुद्धा प्रभावित करू शकतो जसे तोंड, नाक इ तसेच डोळ्याचा भाग देखील.
हा व्याधी एखाद्या व्यक्तीला कसा होतो ह्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पण शरीरात रोग प्रतिकार करणार्‍या पेशी शरीरातील त्वचेमध्ये असणार्‍या रंगोत्पादक पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. तसेच त्या व्यक्तीच्या शरीरातील जनुकांमध्ये होणार्‍या बिघाडामुळे देखील हा व्याधी होतो. काही संशोधकांच्या मते उन्हामध्ये त्वचा भाजणे, मानसिक तणाव इ. कारणेदेखील हा आजार बळावू शकतात.
* हा व्याधी कोणकोणत्या व्यक्तींना होऊ शकतो ः-
– वीस वर्षांच्या वयात हा प्रामुख्याने होतो अथवा तो कोणत्याही वयात होऊ शकतो.
– हा प्रामुख्याने गडद त्वचा वर्ण असणार्‍या लोकांना अधिक प्रमाणात होतो.
– ज्या व्यक्तींना अन्य एखादा ऑटो इम्युन म्हणजे स्वप्रतिरक्षित व्याधी आहे जसे हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम तर अशा व्यक्तीला हा होऊ शकतो.
– पूर्वी सांगितल्याप्रमाणे ह्यात अनुवंशिकता आढळते.
 * ह्या व्याधीमध्ये कोणकोणती लक्षणे दिसतात :-
– यात उद्भवणारे चट्टे हे जो त्वचेचा भाग सुर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कात येतो त्यावर हे जास्त येतात. जसे पावले, हात, चेहरा, ओठ इ भागांवर हे जास्त आढळतात. तसेच अन्य शरीराच्या भागात जसे काखेत, दोन पायांच्या मध्ये, तोंडावर, डोळ्यांजवळ, नाकाजवळ, नाभीजवळ, जननांगावर, गुद भागी इ.
हा व्याधी झालेल्या व्यक्तीचे केसदेखील लवकर पांढरे होतात तसेच तोंडाच्या आतील भाग देखील पांढरा झालेला आढळतो.
आता हे आलेले चट्टे एकाच भागी राहणार की त्याचा प्रसार होणार हे सांगणे कठीण असते. पण काही व्यक्तींमध्ये हे चट्टे भराभर पसरतात अथवा काही व्यक्तींमध्ये ते सावकाश पसरतात अर्थात ते पसरायला बरीच वर्षे लागतात. काही लोकांना असा देखील अनुभव आला आहे की मानसिक अथवा शारीरिक ताण असल्यास हा आजार वाढतो व शरीरावर येणारे चट्टे वाढतात व पसरतात.
ह्या व्याधीचे योग्य निदान करण्यासाठी डॉक्टर रुग्णाला प्रश्न विचारतात तसेच रक्ताच्या चाचण्या अथवा त्वचेची बायॉप्सी करून त्याचे निदान करतात.
(क्रमशः)
(कृपया वरील उपचार हे फक्त वाचकांच्या माहितीसाठी असून त्याचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा).