- वैद्य. सुरज सदाशिव पाटलेकर, एम.एस(आयुर्वेद)
श्री व्यंकटेश आयुर्वेद, मडगांव
काही लोक तर सकाळी वेळेअभावी तोंड न धुता फक्त माऊथ वॉशसारख्या गोष्टी चूळ भरण्यासाठी वापरतात. हे बरोबर नव्हे. दात व्यवस्थित साफ झालेच पाहिजेत व नंतरच काय ते माऊथ वॉश वगैरे पाहिजे असल्यास वापरावेत.
मुख हे सप्त अंगांच्या समुदायाने किंवा एकत्र येण्याने बनते. ओठ, दात, हिरड्या(दंतमूल), जीभ, ताळु, कंठ व ही सर्व अंगे मिळुन एक(गालाचा व मुखाचा आतील भाग) हे सर्व मुखाचे ७ भाग आहेत. तसेच गळा आणि घसा हे देखील आपण त्यात समाविष्ट करु शकतो. तर एवढे सगळे अवयव असलेल्या मुखाची काळजी घेणे किती आवश्यक असेल ह्याची कल्पना आलीच असेल. आपण काय खातो, काय पितो इतर सर्व गोष्टींचा परिणाम हा मुखामध्ये होतो किंवा होताना दिसून येतो.
* रोज सकाळी उठल्यावर व रात्री जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी दात घासणे, जीभ साफ करणे, चुळ भरणे आवश्यक आहे. नाहीतर मुखामध्ये एखादा अन्नाचा कण किंवा अंश शिल्लक राहिल्यास कुजून त्यामुळे मुखाला घाण वास येईल.
काही लोक दात घासणे ह्याचा अर्थ असा घेतात- दात साफ करत असताना भरपूर प्रमाणात फेस काढणे म्हणजेच दात घासणे असा गैरसमज काही जणांचा असतो. टूथब्रशने अगदी कपडे धुतल्यासारखे जोरजोरात दात घासले जातात. एवढा की ह्या कृतीचा आवाज़ बाजुच्या खोलीमध्येसुद्धा ऐकू येतो. हे असे करणे साफ चुकिचे आहे. अश्याने दातांना मार बसतो व ते दात त्यांच्या मुळातून सैल होऊ न नंतर हलु किंवा पडुही शकतात. एवढेच नव्हे तर अश्याने हिरड्यांनादेखील मार बसू शकतो व त्यातून रक्त येऊ शकते. तेथे सुज येऊन तोंड उघडण्यास त्राससुद्धा होऊ शकतो. टूथब्रशने जरी दात घासणे झाल्यास तेव्हा ते सावकाश आणि अलगद सरळ वर-खाली व आडवे; उजवी ते डावी /डावी ते उजवीकडे, चक्राकार सारखे दातांवर गोल पद्धतीने फिरवून घासावेत. हिरड्यांना ब्रशचा स्पर्श होऊ देऊ नये. कारण ते नाजुक असतात व ब्रशच्या स्पर्शाने तेथे रक्तस्राव होऊ शकतो.
* काही लोक तर सकाळी वेळेअभावी तोंड न धुता फक्त माऊथ वॉशसारख्या गोष्टी चूळ भरण्यासाठी वापरतात. हे बरोबर नव्हे. दात व्यवस्थित साफ झालेच पाहिजेत व नंतरच काय ते माऊथ वॉश वगैरे पाहिजे असल्यास वापरावेत.
* हल्ली तर अजून एक फॅड आले आहे ते म्हणजे फ्लेवर्ड टूथपेस्ट वापरणे. ते पण ऑरेंज, पायनॅपलसारख्या चवींचे आणि तेही गोड. हे सर्व प्रयोग लहान मुलांना आकर्षित करण्यासाठीच असतात व टूथपेस्ट कंपनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी भरमसाठ पैसा मार्केटमध्ये ओतत असते. मग त्यात खरोखरच हे प्रयोग लहान मुलांच्या हितासाठी गरजेच्या आहेत की नाही ह्यांचा विचार ते का करतील? असे केल्याने कंपनीला टाळे लावावे लागेल. असो. ती त्यांची मार्केटिंग टॅक्टीक आहे व ते आपण थांबवू शकत नाही. पण ते वापरायचे की नाही हे तरी आपल्या हातात आहे ना? एखादा सर्व्हे केला तर लक्षात येईल की लहान मुलांमध्ये जे जंत/कृमि होतात मग ते दातांमध्ये असतील किंवा पोटामध्ये, ते सर्व गोड पदार्थ खाल्ल्यानेच होतात आणि ह्या फ्लेवर्ड टूथपेस्ट त्यात अजूनच भर घालतात… विशेषकरुन दातांमध्ये जे कृमि होतात त्यामध्ये, ज्याला आपण डेंटल कॅरिस असे गोंड़स नाव दिले आहे. फक्त लहान मुलेच कशाला… काही मोठी तरुण, वृद्ध लोकसुद्धा गोड पदार्थाने दात घासण्याची चुक करतातच. दात साफ करण्यासाठी गोड पदार्थ आवश्यक नसून, कडु(कडुनिंब), तिखट यांसारख्या चवीचे पदार्थ उपयुक्त ठरतात. म्हणूनच तर आपले पूर्वज जुन्या काळी कडुनिंब, खदिर(खैर)सारख्या कडू, तुरट(कषाय) औषधी वनस्पतींचा/त्यांच्या डहाळीचा उपयोग दातुन (चावण्यासाठी)म्हणून दात घासण्यासाठी करायचे. कोळसा, सैन्धव मीठ, राख यांसारख्या गोष्टीसुद्धा वापरायचे. त्याने दात नक्कीच मज़बूत व्हायचे.
गोड चवीचे मग ते चॉकलेट, मिठाईसारखे दुधाचे पदार्थ वा इतर, खाण्यासाठी असो वा दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट, ते नेहमीच दातांवर एक प्रकारचा थर/लेप उत्पन्न करतात आणि तो थर स्वच्छ जर केला नाही तर मग मुखाला दुर्गंधी येणे, दात किडणे, दातांचा रंग बदलणे (शक्यतो पिवळसरच होणे), दात तुटणे किंवा दातांचे तुकडे जाणे, दातांची संवेदनशीलता फार वाढणे (थंड, गरम, आंबट पदार्थ असह्य होणे यांसारख्या इतर तक्रारी), दात सैल होणे, दंतशूल, दातांच्या आत छिद्र निर्माण होणे यांसारखे रोग होऊ शकतात. मग जे गोड चवीचे पदार्थ दातांवर हा एक प्रकारचा थर/लेप उत्पन्न करतात, त्याच चवीच्या पदार्थाने दात व्यवस्थित स्वच्छ होतील का? ह्याचा कधी विचार तरी आपण केलाय का?
* मान्य आहे की आधुनिकीकरणामुळे वरील उल्लेखित गोष्टी मिळणे किंवा वापरणे शक्य नाही किंवा त्या कालबाह्य झाल्या आहेत. टूथपेस्ट ही काळाची गरज आहे व ती वापरण्यास नकारही नाही. पण तीदेखील आपण कुठली वापरावी हे आपल्या हातात आहे.
तसेच आपण ज्या प्रकारचे टूथब्रश वापरतो तेसुद्धा न अधिक मऊ न अधिक घट्ट असले पहिजे. अधिक मऊ असल्यास दातांमधील मळ व्यवस्थितरित्या निघणार नाही व अधिक घट्ट(ब्रश चे दात/ब्रिसल्स) असल्यास हिरड्यांना इजा होईल. योग्य प्रकारचेच टूथब्रश वापरले पहिजे. तसेच प्रत्येक जिन्नस खाऊन झाल्यावर मुख पाण्याने चुळ भरुन स्वच्छ करावे. पुन: पुन: टूथब्रशने दात घासु नये. टूथब्रशचा जास्त वापर पण दातांना त्रासदायक ठरू शकतो.
दातांच्या तक्रारी असल्यास त्वरित एखाद्या योग्य चिकित्सकास/तज्ञानां किंवा डेंटिस्ट यांना दाखवावे. घरगुती उपचार करु नयेत. बाहेरुन दात व्यवस्थित दिसतही असतील, पण कित्येक वेळी दात हा आतून पोखरला जातो, कीड लागते आणि हे दातांची क्ष-किरण चाचणी केल्यावरच स्पष्ट होऊ शकते. रूट कॅनलची गरज पडू शकते. जर तज्ञांना वाटेल तर तेसुद्धा करून घ्यावे. पण जर सुरुवातीपासूनच दातांची काळजी व्यवस्थितपणे घेतली गेली तर या सर्व उपचारांची गरजच का?
(क्रमशः)