मुहाझिरांचे पाकिस्तानविरोधी बंड

0
151
  •  दत्ता भि. नाईक

ज्या पद्धतीने पाकिस्तानमधील निरनिराळे प्रांत व निरनिराळ्या जमाती स्वतंत्र होण्यासाठी धडपड करतात त्यावरून नजीकच्या काळात पाकिस्तान नावाच्या राष्ट्रराज्याचे अस्तित्व टिकून राहील की ते जगाच्या नकाशावरून पुसले जाईल अशी शंका उभी राहते.

सुप्रसिद्ध निर्भीड पत्रकार लोकमान्य टिळकांचे नातू ग. वि. केतकर यांनी देशाचे विभाजन झाले तेव्हाच नवनिर्मित पाकिस्तान कधीही स्थिर राष्ट्र होणार नाही, ते सतत समस्यांच्या कढईत भाजले जाईल व स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची कल्पनाही पाकिस्तानमध्ये रूजणार नाही असे भाकित केले होते. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान पश्‍चिम पाकिस्तानपासून वेगळे झाले व स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हापासून ग. वि. केतकरांचे भाकित खरे ठरण्यास सुरुवात झाली. पूर्व पाकिस्तान पश्‍चिम पाकिस्तानशी भौगोलिकदृष्ट्या सलग नसल्यामुळे हे विभाजन साहजिक होते, परंतु उर्वरित पाकिस्तानही शांतपणे एक राष्ट्र म्हणून जगू शकत नाही याचा पदोपदी अनुभव येतो.

बलुचिस्तानचा स्वातंत्र्यलढा आता सर्वज्ञात झालेला आहे. बलुच नेत्यांची धरपकड व काहीजणांना नाहीसे करणे यासारखे प्रकार नित्याचेच झालेले आहेत. सिंधमधील जिये सिंधची चळवळही बरीच वर्षे चालू आहे. या चळवळीच्या नेत्यांकडून अधूनमधून भारताचा तिरंगा झेंडा फडकावला जातो. पठाण समाज पाकिस्तानात मनापासून समाधानी नाही हेही आता सगळ्यानाच ज्ञात झालेले आहे. यात भर म्हणून कराचीमधील मुक्त हिदा कौमी मुव्हमेंटच्या (एम.क्यू.एम.) वतीने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले गेले आहे.

शुद्ध उर्दू बोलणारे लोक
मुक्त हिदा कौमी मुव्हमेंटचे सुरुवातीचे नाव होते मुहाझीर कौमी मुव्हमेंट. मुहाझीर याचा अर्थ होतो भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आदी प्रदेशांतून देशाच्या विभाजनाच्या काळात स्थलांतरित झालेले लोक. यांना निर्वासित यासाठी म्हणता येत नाही की त्यांना त्यांच्या मूळ गावातून कुणीही हाकलून लावलेले नाही तर ते स्वखुशीने पाकिस्तानला निघून गेलेले आहेत. पाकिस्तानने उर्दू ही देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित केलेली आहे. परंतु मुहाझिरांइतके शुद्ध व स्पष्ट उर्दू बोलणारे लोक अख्ख्या पाकिस्तानात आढळणार नाहीत. सध्या लंडनमध्ये निवास करून पाकिस्तानातील सिंध सरकारविरोधात भडक वक्तव्ये करणारे एम.क्यू.एम.चे नेते अल्ताफ हुसेन यांच्यामुळे ही चळवळ सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात गाजत आहे. सिंधमधील प्रांतीय निवडणुकीमध्ये २००८ साली एम.क्यू.एम.चे पंचवीस प्रतिनिधी निवडून आले होते. २०१३ साली ही संख्या अठरावर आली. तर अल्ताफ हुसेन यांच्याशी मतभेद असलेल्या पाकिस्तान सरजमीन पार्टीने रिंगणात उमेदवार उतरवल्यामुळे एम.क्यू.एम.च्या प्रतिनिधींची संख्या सातवर आली. सरजमीन पार्टीचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. इतके होऊनही एम.क्यू.एम.चे सिंधमधील व विशेषकरून कराची शहरातील महत्त्व कमी झालेले नाही.

एम.क्यू.एम. संघटना राजकीय पक्ष म्हणून पाकिस्तानमध्ये प्रस्थापित झाली ती देशांतर्गत समस्या सोडवण्यासाठीच होती. तरीही भुत्तो घराण्याचे वर्चस्व असलेल्या पाकिस्तान पिपल्स पार्टीशी (पी.पी.पी.शी) या संघटनेचे जन्मापासूनचे वैर आहे. एम.क्यू.एम. व पी.पी.पी.चे कार्यकर्ते बर्‍याच वेळा रस्त्यारस्त्यांवर एकमेकांच्या विरोधात उतरलेले आहेत व पाकिस्तानी सेनादलांची एम.क्यू.एम.वर करडी नजर आहे.
हा अल्ताफ हुसेन कोण?
अल्ताफ हुसेन हा सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेला एम.क्यू.एम.चा नेता आहे. १९७० साली ऑल पाकिस्तान मुहाझिर स्टुडंट्‌स ऑर्गनायझेशनचा नेता म्हणून तो सर्वप्रथम प्रकाशात आला. त्या काळात झिया-उल्-हकच्या लष्करी हुकूमशाहीच्या विरोधात सर्व लोकशाहीप्रेमी संघटना एकवटल्या होत्या. त्या चळवळीचे नेतृत्व पी.पी.पी.च्या हातात होते. हळूहळू एम.क्यू.एम.ने सिंधमध्ये व कराची शहरात आपले हातपाय पसरले.
लष्करी हुकूमाहीच्या विरोधात लढणार्‍या एम.क्यू.एम.ने जन. परवेझ मुशर्रफच्या काळात आपली भूमिका बदलली. परवेझ मुशर्रफ हा लष्करशहा असला तरीही दिल्लीहून स्थलांतरित झालेला उर्दू भाषिक मुहाझिर होता. या काळात एम.क्यू.एम. हा पाकिस्तानमधील एकमेव धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष म्हणून मिरवू लागला. कराची शहरामध्ये पश्तून जमातीची लक्षणीय संख्या आहे. यांच्याकडून कराचीचे तालिबानीकरण होणे रोखले पाहिजे अशी पक्षाने भूमिका घेतली. पक्षाचा कराची शहराचा महापौर मुस्तफा कमाल याचे सर्वात तरुण महापौर म्हणून कौतुक तर झालेच, याशिवाय त्याच्याकडून केल्या गेलेल्या शहरातील सुधारणांमुळे पाश्‍चात्त्य जगात त्याचा गौरवही केला गेला. याच काळात अल्ताफ हुसेन याने नवी दिल्लीला भेट दिली. भारत-पाकिस्तानमधील शांततेचा दूत म्हणून त्यावेळेस अल्ताफ हुसेन यास मान्यताही मिळाली. मुशर्रफ सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर पक्षांतर्गत दुफळीचा फायदा घेऊन लष्कर छापा टाकेल व तुरुंगात सडावे लागेल हे लक्षात येताच अल्ताफ हुसेन याने आपले चंबूगबाळे आवरले व लंडनमधील मिलहिल येथे आपले बस्तान बसवले.
२२ ऑगस्ट २०१६ रोजी अल्ताफ हुसेन याने लंडनमधून दूरध्वनीवरून जे भाषण केले ते थेट कराची येथे ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली. हे भाषण दहशतवादाला प्रोत्साहन देणारे आहे असा आरोप ठेवून लंडनमध्ये त्याच्यावर खटला चालू आहे. कदाचित ब्रिटन सरकार त्याचे प्रत्यार्पण करून त्याला पाकिस्तानच्या हवाली करेल अशी भीती असल्यामुळे रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांना राजकीय आश्रय द्यावा अशी विनंती आहे. अल्ताफ हुसेन हा ब्रिटनचा नागरिक आहे. एक ब्रिटिश नागरिक भारत सरकारकडे आश्रय मागतो ही इतिहासातील पहिलीच घटना आहे.

१७ नोव्हेंबर रोजी एम.क्यू.एम.चे कार्यकर्ते कराची येथील चौकात जमले होते. पक्षाच्या केंद्रीय समितीला रबिता या नावाने ओळखतात. रबिताचे सदस्य व्यासपीठावर बसले होते. अल्ताफ हुसेन याचे मोठे चित्र असलेला फलक लावलेला होता. सर्वकाही शिस्तबद्धपणे चालले होते. २०१६ सालाप्रमाणे या वेळेस व्यासपीठावरील आयोजकाने दूरध्वनी उचलला व ध्वनिवर्धकासमोर धरला. अल्ताफ हुसेनचे भाषण सर्व उपस्थितांनी ऐकले. या भाषणात त्यांनी त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना भारतात आश्रम मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर त्याने म्हटले की, पाकिस्तान हा संपूर्ण जगाला जडलेला कर्करोग, ही तर जगाची डोकेदुखी व जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे. त्याने सिंधमधील समाजमाध्यमांसमोर आपला विषय मांडण्याचे आवाहन केले व मोठ्या संख्येने जाऊन सिंधच्या सचिवालयाला टाळे ठोकावे अशीही उपस्थितांना आग्रहाची विनंती केली.

या संपूर्ण आंदोलनाचा परिणाम म्हणून पाकिस्तानच्या लष्कराने एम.क्यू.एम.च्या नेत्यांची धरपकड तर चालू ठेवलेलीच आहे, याशिवाय त्यांचे अनेक कार्यकर्ते काही वर्षांपासून गायब झालेले आहेत. त्यांना संपवण्यात आले असल्याचा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे.

१९९० पासून पाकिस्तानी लष्कर एम.क्यू.एम.च्या मागावर आहे. सत्ता कोणाचीही असो, त्यांच्या कार्यालयांवर पोलिसांकरवी छापा टाकण्याऐवजी लष्कराचा वापर केला जातो. भारताची गुप्तहेर यंत्रणा रिसर्च ऍण्ड ऍनालिसिसशी (रॉ) एम.क्यू.एम.ने संधान बांधलेले आहे असा पाकिस्तान सरकारचा आरोप आहे. सर्वप्रथम कराचीला सिंधपासून वेगळे करून मुहाझिरांसाठी वेगळा सुभा स्थापन करावा अशी मागणी करणारी ही संघटना आता पाकिस्तानच्याच मुळावर आलेली आहे.
स्वातंत्र्यचळवळीच्या काळात मुसलमानांना वेगळे राष्ट्रराज्य हवे अशी मागणी करणारा मोठा वर्ग उत्तर प्रदेश व बिहारमध्ये होता. स्वातंत्र्यानंतर त्यातील काहीजण भारत सोडून पाकिस्तानात वास्तव्याला गेले. जे गेले ते तसे पाहता स्वतःच्या इच्छेने गेले. त्यांच्यासाठी पाकिस्तान म्हणजे एकप्रकारे स्वर्ग होता. परंतु हाच स्वर्ग आता नरक असल्याचे उघड झालेले आहे. पाकिस्तानची मागणी करणार्‍या मुहाझिरांनीच आता त्याविरुद् बंड पुकारलेले आहे. ज्या पद्धतीने पाकिस्तानमधील निरनिराळे प्रांत व निरनिराळ्या जमाती स्वतंत्र होण्यासाठी धडपड करतात त्यावरून नजीकच्या काळात पाकिस्तान नावाच्या राष्ट्रराज्याचे अस्तित्व टिकून राहील की ते जगाच्या नकाशावरून पुसले जाईल अशी शंका उभी राहते.