समाजमनस्क वृत्तीचे कर्ते सुधारक ‘भारतकार’ हेगडे-देसाई

0
631
  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा हा ‘भारत’कार गो. पुं. हेगडे-देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गुणविशेष होता. उणीपुरी छत्तीस वर्षे ‘भारत’ या नियतकालिकामधून परकीय सत्तेशी आपल्या प्रखर लेखणीने त्यांनी झुंज दिली. पारतंत्र्याविषयीची चीड त्यांनी आपल्या अग्रलेखांतून व्यक्त केली.

 

जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा हा ‘भारत’कार गो. पुं. हेगडे-देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गुणविशेष होता. उणीपुरी छत्तीस वर्षे ‘भारत’ या नियतकालिकामधून परकीय सत्तेशी आपल्या प्रखर लेखणीने त्यांनी झुंज दिली. ते असिधाराव्रत होते. त्यांच्या जागी अन्य कुणी असता तर प्रतिकूलतेशी लढता लढता मोडून पडला असता. पण ‘भारत’कारांचा वज्रनिर्धार कधीही ढळला नाही. पारतंत्र्याविषयीची चीड त्यांनी आपल्या प्रज्वलित स्वरूपाच्या अग्रलेखांतून व्यक्त केली. त्यासाठी त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली. मानवी करुणेचा झरा त्यांच्या अंतःकरणात निरंतर पाझरत राहिला. जनमानसातील आक्रंदनाचा स्वर त्यांनी निष्ठुर शासनापर्यंत पोचविण्याचा निकराने प्रयत्न केला. त्यांची ही समाजमनस्क वृत्ती त्यांच्या राष्ट्रभक्तीइतकीच लक्षणीय स्वरूपाची होती. त्यांच्या या पैलूवरच येथे प्रामुख्याने प्रकाश टाकायचा आहे. राजकीय विचारांच्या संदर्भात त्यांनी लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आणि त्यांच्या सामाजिक विचारसरणीवर आगरकरांचा प्रभाव होता. ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांच्या शैलीशी त्यांच्या शैलीचे नाते होते. ते स्वतंत्र प्रज्ञेचे खंदे पत्रकार होते. सांप्रत काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची त्यांच्या बुद्धिमत्तेची झेप होती. त्यांच्या भाषेचे वळण आणि वाकण आजचे वाटते. धीरोदात्तता, स्पष्टवक्तेपणा आणि अंतःकरणातील सच्चेपणा या गुणांचा समुच्चय त्यांच्या अग्रलेखांत आढळतो.

एके काळी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘आमच्या देशाची स्थिती’ या निबंधातून आमच्या अवनतीची मीमांसा केली होती. ‘भारत’कार हेगडे-देसाई यांनी स्वसमाजाच्या दोषांची परखड मीमांसा केली आहे ः
‘‘…पण आपला गोमांतकदेश फार काळापासून पारतंत्र्यांत अडकल्यामुळें लोकांना स्वकर्तव्यांचा विसर पडत चाललेला आहे. त्यांत आपला हिंदु समाज तर अत्यंत अवनतस्थितीत आहे. पूर्वजांनी मिळवून ठेविलेल्या इस्टेटीवर खाऊन पिऊन मस्त चैन मारावी, एखादी नोकरी किंवा धंदा करून पोट भरावें यांपेक्षा आपल्या देशाकरिता करावयाचें कांही तरी श्रेष्ठ कर्तव्य आहे, ही भावना नष्ट झालेली आहे. आम्हां हिंदु लोकांच्या अंगी स्वाभिमान नाही. स्वार्थत्याग करण्याची इच्छा नाही. देशाकरिता, तसेच समाजाकरिता वाहून घेण्याची तयारी नाही. यामुळे चारचौघांनी मिळून चालविलेली व मतभेद नसलेली अशी संस्था दिसत नाही. जिकडे पाहावे तिकडे पक्षभेद व मतभेद दृष्टीस पडतात.’’ (आमचें कर्तव्य, लेखांक १)
अशी आत्मविश्‍लेषण करण्याची पारदर्शक वृत्ती आणि ऊर्जा निर्माण करणारी प्रेरकता त्यांच्या विचारांत सर्वत्र आढळते. गोमंतकात नवविचारांचे प्रवर्तन करणार्‍या विचारवंतांमध्ये ‘भारत’कारांचे महत्त्वाचे स्थान आहे. ‘सार्वजनिक चळवळ कां करावी’, ‘सुशिक्षितांचा धरसोडपणा’, ‘जुगार अप्रतिबंधच राहणार काय?’, ‘मद्यपानाचा प्रसार’, ‘नोटिस’, ‘जाहिर खबर ः एक लाख रुपयांची गोष्ट’, ‘सामाजिक सुधारणा’, ‘हा कोण व्यामोह’, ‘परीक्षेची वेळ आहे!’, ‘आमचे डोळे उघडणार तरी कधीं?’, ‘आमचें कर्तव्य’, ‘हिंदु व ख्रिस्ती’, ‘एकीची आवश्यकता’, ‘गोमांतकीय हिंदुपरिषद’, ‘असहकारिता’, ‘हिंदु-ख्रिस्ती-ऐक्य’, ‘हिंदु-समाज’, ‘आधीं कळस मग पाया रे’, ‘एक सामाजिक प्रश्‍न- वरदक्षिणा’, ‘प्रगतिपथ आक्रमा!’, ‘मद्यपान व हिंदुसमाज’, ‘पतितपरावर्तन’, ‘स्वामी विवेकानंदांचे विचार ः पतितपरावर्तन- हिंदुधर्माची मर्यादा,’ ‘गोहत्येतून मुक्त व्हा’, ‘मद्यपान प्रतिबंध’, ‘पतितपरावर्तन’ (१२ एप्रिल १९२३), ‘पतितपरावर्तन’ (३ मे १९२३), ‘बळी तो कान पिळी’, ‘तरुणांनो उठा!’, ‘जुना इतिहास’, ‘जुगार, सरकार व प्रतिकार’, ‘जुगार व हिंदुधर्मविचार’, ‘गोव्यांतील गोरक्षण’, ‘आमची आजची तरुणपिढी’, ‘जनसेवा हीच ईश्‍वरसेवा’, ‘बुद्धिबळाचें पुढील धोरण’, ‘शुद्धीची पुढील दिशा’, ‘अस्पृश्यतानिवारणाचे कार्य’, ‘अस्पृश्यता दूर करा!’ (लेखांक १ला), ‘अस्पृश्यता दूर करा’ (लेखांक २रा), ‘अस्पृश्यता दूर करा’ (लेखांक ३रा), ‘अस्पृश्यता दूर करा’ (लेखांक ४था), ‘वेश्याव्यवसायाचे उच्चाटन’, ‘कर्मवीर कर्वे’, ‘असे उघडे तरी व्हा!’, ‘समाचार घ्या!’, ‘अनावृत पत्रास उत्तर’ आणि ‘एकमेकां सहाय्य करू! अवघे धरूं सुपंथ॥ (२७ सप्टेंबर १९२८) या अग्रलेखांमधून ‘भारत’कारांच्या सामाजिक चिंतनात त्यांचे आस्थेचे विषय कोणते हे लक्षात येते. विस्ताराने हा तपशील येथे दिलेला आहे की त्यांच्या विचारांचा पैस कळावा. हे सर्व अग्रलेख आशयदृष्ट्या समाजप्रबोधनकार्यास प्रेरणा देणारे आहेत. त्यांचे अभिव्यक्तिसामर्थ्य तेवढेच तोलामोलाचे आहे. व्यसनमुक्ती, अस्पृश्यनिवारण व सामाजिक एकात्मता या त्रयीसाठी ते किती जागरूक होते, हे येथे लक्षात येते. या घटकांच्या अभावामुळे आपला गोमंतकीय समाज आत्मशबल झाला होता याची जाणीव त्यांना पुरेपूर होती. तरुणाईवर त्यांची सारी भिस्त होती. ‘भारत’कारांनी उभे केलेले वास्तव शतकापूर्वीचे आहे. मांडवी-जुवारीतून कालप्रवाहात कितीतरी पाणी वाहून गेले आहे. थोडे तपशील वगळले तरी आजही आमच्या समाजात आमूलाग्र बदल कुठे झाला आहे? म्हणूनच तर त्यांनी केलेल्या सामाजिक मंथनाचे मोल कळते. या सामाजिक भाष्यामागे त्यांचे मनस्वी व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक समस्यांचा अभ्यास होता. त्या सुनियोजितपणे मांडण्याची विचारांची बैठक होती.

‘भारत’कारांच्या विचारांमध्ये किती स्पष्टवक्तेपणा होता हे त्यांच्या पुढील उद्गारांतून दिसून येते. ‘‘तद्वत् दास्यवृत्तींत संतोष मानणारे, अज्ञानी, कर्तव्यशून्य म्हणून परतंत्र व खुळचट रूढींनी ग्रासलेले लोक ज्या भूमींत रेंगाळतात, त्या प्रदेशास पुण्यभूमी हें नांव देणे, हें विझलेल्या निखार्‍यास कोळशाचा अंगारा म्हणण्याइतकेंच सरळ नव्हे काय?’’
(आर्यभूमी कीं अनार्यांचा मुलूख?)
मद्यपान हे समाजाचा विनाश घडविणारे महा भयंकर व्यसन आहे, हे ‘भारत’कार शतकापूर्वीपासून निक्षून सांगत होते. त्यांचे त्यावेळी लोकांनी मनावर घेतले असते तर केवढी मोठी अनर्थ परंपरा टाळता आली असती. ते म्हणतात, ‘‘पाश्‍चात्त्य लोकांच्या संसर्गापासून ज्या काहीं बर्‍या वाईट चाली आमच्या हिंदुसमाजांत शिरल्या, त्यांत मद्याचे सेवन ही एक अत्यंत अनिष्ट व भयंकर चाल होय.’’

‘सामाजिक सुधारणा’ या अग्रलेखात ‘भारत’कार म्हणतात, ‘‘पारतंत्र्याचें बिकट जूं आमच्या खांद्यावर पडल्यापासून व त्याच्या भाराने आम्ही अधिकाधिक वाकले जाऊन भुईसपाट होण्याचा प्रसंग आल्यामुळे आमच्या समाजांतील एकंदर चालीरीतींत योग्य फेरफार करून आमच्या दैन्यास आम्हीच सावरून धरिले पाहिजे; कारण उलटपक्षी आम्ही अवहेलना केल्यास त्याची कटुतर फळे चाखण्याचे नशिबी येऊन आमच्या सुखांत माती कालविण्यास आम्हीच कारण झालो व त्यामुळे आमच्या जन्माचें मातेरें होणार, असें खास समजावें.’’

‘आमचे डोळे उघडणार तरी कधीं?’ या अग्रलेखातून दुसर्‍या एका जबर व्यसनाकडे ‘भारत’कारांनी समाजाचे लक्ष वेधलेले आहे. ‘‘आमच्या समाजाचा क्षय करणारे दुसरे व्यसन ‘जुगार’ हे आहे. थोड्या भांडवलांत पुष्कळ पैसा मिळविण्याची लालूच दाखवून अंती प्रपंचाची धूळधांड उडविणारे यासारखे दुसरें व्यसन नाही. त्यानेही आपला पगडा गोमांतकावर बसविला असून आपले साम्राज्य विस्तृत करण्याच्या त्याच्या खटपटीत बरेंच यश प्राप्त झाले आहे. या व्यसनांचे पायीं गोमांतकाची झालेली हानी भरून येणे कठीण झाले आहे. असें असता आमचे डोळे उघडणार तरी कधी?’’ जुगारासंबंधी त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अग्रलेख बारकाईने वाचावेत. त्यांचे मनन करावे.

सद्यःकालीन स्वराज्यात निर्माण झालेल्या महादोषांचे वास्तव चित्र या विचारांत पाहावे. विवेकी माणसांनी अंतर्मुख व्हावे असे हे विचार आहेत. पण लक्षात कोण घेतो? ‘प्रगतिपथ आक्रमा’ या अग्रलेखातून प्राप्त परिस्थितीत त्यांनी दिलेला स्फूर्तिदायी संदेश लक्षात ठेवण्यासारखा आहे, ‘‘प्रगतीचा मार्ग आपल्यापुढे खुला आहे. कर्तव्याची रेषा आपणाला स्पष्ट दिसत आहे. चला तर, अंधारातून आपण उजेडांत येऊं, निद्रावस्थेंतून जागे होऊ आणि आपल्या स्वार्थत्यागानें, विचारगांभीर्याने, बाणेदार भाषणाने, उदार आणि थोर आचरणाने आमचे स्वातंत्र्य सर्वस्वी लुबाडणार्‍यांना आम्ही बायको मानसें नसून मर्द पुरुष आहोंत असे दाखवूं.’’

‘भारत’कारांच्या सामाजिक दृष्टीचे विवेचन याहून विस्ताराने करणे शक्य आहे. एक गोष्ट येथे आवर्जून नमूद करायला हवी. त्यांचे सामर्थ्य फक्त विचारप्रकटनात नव्हते; जेथे जेथे कृती आवश्यक आहे, तिथे तिथे त्यांनी ती केली. ‘गोमंतक मराठा समाजा’ने रूढींच्या बंधनातून मुक्त होता यावे म्हणून जी चळवळ उभारली तिला ‘भारत’कारांनी सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी जात-पात-निरपेक्ष समाजरचनेचा कैवार घेतला. बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून संतपुरुषांच्या कर्त्यातील सामाजिक जाणिवा उलगडून दाखविल्या. सर्वार्थाने ‘भारत’कार कृतिशील विचारवंत होते. त्यांच्या पथदर्शक कार्याबद्दल गोमंतकीयांनी सदैव कृतज्ञता बाळगायला हवी.