हिमालयाचे सर्वांगसुंदर व परिपूर्ण दर्शन

0
231

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

नगाधिराज हिमालयाची लांबी आहे अडीच हजार किलोमीटर आणि रुंदी आहे दीडशे ते साडेतीनशे किलोमीटर. हिमालयातील सर्वाधिक उंच गिरिशिखरांची उंची भरते तब्बल नऊ किलोमीटर! पाच देशांत पसरलेल्या या पर्वतराजीचा विविधांगी परिपूर्ण निसर्गोतिहास स्टीफन ऑल्टर यांनी या पुस्तकात मांडला आहे.

नगाधिराज हिमालय. युगानुयुगे, शतकानुशतके भारतीय मानसाला भव्यत्वाचा, दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवीत आलेला अभेद्य संरक्षक. जेव्हा तुम्हाला त्याचे हिमाच्छादित प्रथम दर्शन घडते, तेव्हाच तो तुमच्या मनाला त्याची आस लावतो. तुम्हाला जणू त्याच्या अंगाखांद्यावर खेळायला बोलावतो. हिमालयाची ही हाक विलक्षण असते. एकदा तुम्ही त्या हाकेला ओ दिलात की तो पुन्हा पुन्हा तुम्हाला साद घालत राहतो. या पर्वताधिराजाची किमयाच अशी आहे. नीरव शांतता म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर हिमालयाला पर्याय नाही. म्हणूनच तर प्राचीन काळापासून देवादिकांनी आणि ऋषीमुनींनी तपाचरणासाठी हिमालयाचीच निवड केली. भारतभूचे भूषण असलेल्या या हिमालयाच्या पर्वतराजीचा निसर्गेतिहास अतिशय सुंदररीत्या मांडणारे एक अनोखे पुस्तक या आठवड्यात वाचायचे भाग्य लाभले, ते म्हणजे स्टीफन ऑल्टर यांचे ‘वाईल्ड हिमालय.’ पाच देशांमध्ये पसरलेल्या हिमालयाचे एवढे परिपूर्ण आणि सखोल दर्शन घडवणारे इतके सुंदर पुस्तक माझ्या तरी वाचनात वा पाहण्यात नाही.

नगाधिराज हिमालयाची लांबी आहे तब्बल अडीच हजार किलोमीटर आणि त्याची रुंदी आहे दीडशे ते साडेतीनशे किलोमीटर. हिमालयातील सर्वाधिक उंच गिरिशिखरांची उंची भरते तब्बल नऊ किलोमीटर! असा हा भव्य दिव्य हिमालय भारतच नव्हे, तर पाकिस्तान, भूतान, नेपाळ आणि चीनपर्यंत पसरलेला आहे. स्टीफन ऑल्टर यांनी या पाचही देशांमध्ये प्रवास केला. तेथून या हिमालयाचे मनसोक्त दर्शन घेतले, त्याच्या कुशीतले लोकजीवन अभ्यासले, प्राणीजीवन अभ्यासले आणि इतिहास, विज्ञान, भूगर्भशास्त्र, पर्यावरण, पशुपक्षी, फळफूल, लोककथा, दंतकथा, अध्यात्म, हवामान अशा सर्वांगाने या हिमालयाचे तेवढेच भव्य दिव्य दर्शन आपल्याला शब्दांद्वारे घडवणारे हे सुंदर पुस्तक निर्मिले आहे. हे नुसते पुस्तक नाहीच, जणू एक परिपूर्ण कलाकृती आहे.

स्टीफन ऑल्टर यांचा जन्मच मुळी हिमालयाच्या कुशीतला. उत्तराखंडमधल्या मसूरीजवळच्या लँडोरमध्ये अत्यंत रम्य ठिकाणी असलेल्या ‘ओकविले’ या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्यांचा जन्म झाला. या ‘ओकविले’चाही इतिहास मोठा रंजक आहे. अंदमानमधल्या हॅवलॉक बेटांना ज्याचे नाव दिलेले आहे, त्या मेजर जनरल हेन्री हॅवलॉकच्या कुटुंबाचे या वास्तूमध्ये वास्तव्य होते. दुर्दैवाने तेथे अग्निकांड घडले आणि त्याची झळ मेजर जनरल हॅवलॉकच्या कुटुंबालाही बसली. नंतर ही वास्तू पुनर्रचित करण्यात आली. या वास्तूची कहाणी सांगत ऑल्टर हिमालयाची कथा सांगायला प्रारंभ करतो आणि आपल्या मनाची झट्‌दिशी पकड घेऊन जातो.

हिमालयाच्या उत्त्पत्तीसंबंधीच्या रंजक दंतकथाही त्याच्या संग्रही आहेत. त्यातली एक अशी – पृथ्वीच्या जन्माआधी झोंगमा ही महाशक्ती आणि तिचे निपू व निली हे पूत्र. ते निराकार असतात. निलीने पृथ्वी बनवली, तर निपूने तिच्यासाठी आकाशाचे आवरण. पण निपूने बनवलेले आकाशाचे आवरण छोटे झाले. मग निलीने काय केले? त्याने आकाशाचे आवरण बसावे म्हणून पृथ्वीला आक्रसून घेतले. त्यामुळे पर्वतराजी, डोंगरदर्‍या निर्माण झाल्या. त्यातूनच निर्माण झाला हिमालय.

हिमालयाचे भौगोलिक महत्त्वही स्टीफन ऑल्टर अधोरेखित करतो. जगामध्ये एक हजार मीटरपेक्षा अधिक उंचीची फक्त चौदा शिखरे आहेत. त्यापैकी दहा एकट्या हिमालयात आहेत. उर्वरित चार देखील हिमालयाशेजारच्या काराकोरम पर्वतराजीमध्येच आहेत. असा हा हिमालय आपल्या दृष्टीने ब्रह्मपुत्रा ते सिंधू नदी दरम्यान पसरलेला असला, तरी प्रत्यक्षात त्याचे विस्तारीत रूप काराकोरम व हिंदुकूश पर्यंत पसरलेले आहे. अशा या हिमालयाचे सर्वांगीण दर्शन लेखक या पुस्तकामधून घडवतो. तिथल्या चित्तरकथा सांगतो. हिमालयातले लोकजीवन, प्राणीजीवन, फळा फुलांचे वैभव, तिथल्या अनोख्या लोककथा या सगळ्याचे दर्शन घडवत तो हिमालय उभाआडवा पादाक्रांत करतो. त्याचे अस्तित्व असलेल्या सर्व देशांमध्ये भटकतो. हिमालयाचा आत्मा शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करतो. गिल्गिट बाल्टीस्तानपासून नेपाळ, शेवटचे हिमालयी संस्थान असलेला भूतान, चीन अशा सर्व भूभागातून भटकत भटकत हिमालयाचे नानाविध अंगांनी, नानाविध रंगांनी दर्शन तो घडवत जातो. हिमालय जितका मनोवेधक आहे, तितकेच हे पुस्तकही मनोवेधक झालेले आहे. आपण ते वाचायला हाती घेतो तेव्हा जणू त्याच्यासोबत हिमालयाच्या त्या गारव्यातून त्याच्यासोबत प्रवास करतो.

हिमालयामध्ये वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कारणांनी आजपासून सात ते दहा हजार वर्षांपूर्वी मानव पोहोचला. त्या आदिम मानवाच्या खाणाखुणांपासून ते आजच्या हिमालयापुढील समस्यांपर्यंत सर्व विषयांना लेखकाने या पुस्तकामध्ये समरसून स्पर्श केलेला आहे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. हे वरवरचे प्रवासवर्णन नाही. हा हिमालयाचा निसर्गोभ्यास आहे आणि तो अधिकाधिक परिपूर्ण होण्यासाठी शेकडो संदर्भांची जोड देत लेखकाने त्यावर परिश्रम घेतले आहेत हे पानापानांतून जाणवते. याच हिमालयात एव्हरेस्टच्या पायथ्याशी हिंडताना तो एकाला प्रश्न विचारतो, तू एव्हरेस्टवर गेलायस का? तो उत्तर देतो हो, फक्त दोनवेळा! आजकाल एव्हरेस्टवर नऊ दहा वेळा जाऊन आलेले लोकही आहेत हेच त्याला सांगायचे असते. अशा अनेक गमतीजमती आपल्याला रिझवतात. लेखकाचे निरीक्षण अतिशय सूक्ष्म आहे. प्रत्येक गोष्टीकडे तो जिज्ञासेने पाहतो. त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी नानाविध संदर्भ ढुंढाळतो. ऋग्वेदातल्या अरण्यदेवतेच्या प्रार्थनेपासून आधुनिक विज्ञानाच्या साधनांपर्यंत अनेकांगांनी हिमालयाचा असा अभ्यास अन्य कोणी क्वचितच केलेला असेल.

हिमालयावरचे स्टीफन ऑल्टर यांचे हे खरे तर दुसरे पुस्तक आहे. त्यांनी लिहिलेल्या एकूण पुस्तकांची संख्या वीसच्या घरात जाते. हिमालयावरच्या त्यांच्या आठवणीपर पुस्तकाचे नाव आहे, ‘बिकमिंग अ माऊंटन ः हिमालयन जर्नीज् इन सर्च ऑफ द सेक्रेड अँड द सब्लाईम.’ मला काही ते वाचण्याची संधी अद्याप मिळालेली नाही, परंतु त्यानंतरचे हे ‘वाईल्ड हिमालय’ मात्र आगळावेगळा वाचनानंद मिळवून देते. या पुस्तकाच्या शीर्षकात त्याने हिमालयाचे नाव इंग्रजीत सहसा लिहिले जाते तसे ‘हिमालया’ ऐवजी ‘हिमालय’ असेच दिलेले आहे यावरून लेखकाची त्याच्या प्राचीन वारशाप्रतीची निष्ठा जाणवते. या पुस्तकाची त्रुटी एकच आहे ती म्हणजे त्याच्या फॉंटचा आकार. कमीत कमी पानांमध्ये बसवण्यासाठी त्याच्या फॉंटचा आकार खूपच बारीक ठेवण्यात आला आहे, त्यामुळे वाचताना डोळ्यांवर ताण येतो. परंतु हिमालयाची परिपूर्ण वर्णने वाचता वाचता हा ताणही आपण विसरून जातो आणि कौसानी, मनाली किंवा धर्मशालाला हिमालयाच्या कुशीत असल्यासारखा गारवा आणि गंध अनुभवतो!