>> कला अकादमीत दलाई लामा यांचे व्याख्यान
भारतातील प्राचीन शिक्षण पद्धतीची आधुनिक शिक्षणाशी सांगड घातली तर अहिंसा व करुणेची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजतील असे सांगून तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी, सकारात्मक विचारांना बळकटी दिली तर विद्ध्वंसक विचारांचे प्रमाण निश्चितच कमी होण्यास मदत होईल याची जाणीव दिली व अंतर्गत शांततेतून जागतिक शांतीचा संदेश देण्याचे सामर्थ्य भारतात आहे याकडे लक्ष वेधले.
कला अकादमी गोवा येथे गोवा विद्यापीठातर्फे बुधवारी ‘द रेलेवन्स ऑफ एनशियंट नालंदा टिचिंग्स इन अवर मॉडर्न टाईम्स’ या विषयावर दलाई लामा यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी उपरोल्लेखित विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वरुण सहानी, कुलसचिव वाय. व्ही. रेड्डी उपस्थित होते.
भारतात हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन शिक्षण आहे व भारताचे प्राचीन मानसशास्त्र अत्यंत विकसित आहे तर आधुनिक मानसशास्त्र बालवाडीप्रमाणे भासते असे स्पष्ट करून दलाई लामा म्हणाले, की भारतीय प्राचीन शिक्षणामध्ये जी अहिंसा व करुणा ही मूल्ये आहेत ती आधुनिक शिक्षण पद्धतीत एकरूप व्हायला हवीत. मी लोकांना आनंदाचे मूळ काय आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. मनाच्या शांतीसाठी विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. क्रोध हा माणसाच्या आतील शांतीसाठी अत्यंत मारक आहे. माझ्या आईकडून मी दयाळूपणा शिकलो.
दलाई लामा यांनी, पालकांनी आपल्या पाल्यांना ‘द्वेष’ ही गोष्ट किती घातक असते हे शिकविण्याची गरज प्रतिपादून, दुसर्या महायुद्धानंतर ‘हत्या’ हा पर्याय नव्हे याची लोकांना जाणीव झाल्याचे निदर्शनास आणले. ते म्हणाले की, माणसाची हत्या न करण्याचा विचार युरोपियन संघातून पुढे आला. हा विचार पुढे आला नसता तर अनेक हत्या झाल्या असत्या. एक राष्ट्र, एक धर्म अशा एकेरीवादामुळे समस्या निर्माण होत असतात व ते घातक आहे. भारतासारख्या देशात अनेक धर्म, संकल्पना आवश्यक आहेत. बाबा आमटे यांचे कार्य पाहून मी प्रभावित झालो असल्याचे त्यांनी सांगितले व भारतातील मुस्लिमांनी एकसंघ भारताच्या दृष्टीने थोडी पावले टाकावित असे आवाहनही यावेळी केले.
डॉ. सहानी यांनी, नालंदा अभ्यासांतर्गत गोवा विद्यापीठात दलाई लामा अध्यासन सुरू केले जाणार आहे व त्यात प्राचीन इतिहास, बुद्धीमत्ता, ध्यानधारणा आदींचा समावेश असेल अशी माहिती दिली.