यशपाल व इक्बालच्या अर्धशतकांमुळे सिक्किमने पराभव लांबवला

0
156

यशपाल सिंह आणि आणि इक्बाल अब्दुल्ला यांच्या अर्धशतकांमुळे सिक्किमने गोव्याविरुद्ध आपल्या दुसर्‍या डावात ८ बाद ३१७ धावा करीत पराभव चौथ्या दिवसावर लांबवला. पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या प्लेट गट रणजी लढतीत सिक्किमने तिसर्‍या दिवसअखेर ३१ धावांची आघाडी मिळविलेली असून त्यांचे केवळ २ गडी बाकी आहेत.

दुसर्‍या दिवसाच्या २ बाद २२ धावांवरून पुढे खेळताना सिक्किमची एकवेळ ६ बाद ६१ अशी बिकट स्थिती झाली होती. फेलिक्स आलेमांवने निलेश लामिछाने, फैझान खान व बिजय सुब्बाला ठराविक अंतरात बाद केले. परंतु सेनादलाचा माजी अनुभवी फलंदाज यशपाल सिंहने (१० चौकारांनिशी ८४) ली योंग लेपचाच्या साथीत सातव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण ७१ धावा जोडल्या. त्यानंतर आठव्या विकेटसाठी अन्य एक व्यवसायिक खेळाडू इक्बाल अब्दुल्लाच्या साथीत १५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत सिक्किमला डावाच्या पराभवातून बाहेर काढले.

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अब्दुल्ला ९ चौकार व ३ षट्‌कारांच्या सहाय्याने ९९ तर कर्णधार पाल्जोर तामंग ३२ धावांवर नाबाद खेळत होते. अब्दुल्लाला शतकासाठी केवळ १ धावेची गरज आहे. गोव्याकडून दर्शन मिसाळ व फेलिक्स आलेमाव यांनी प्रत्येकी ३ तर हेरंब परब व अमुल्य पांड्रेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.