>> बॅग पळविणार्या मुलाचाही शोध घेणार
मिरामार येथील गास्पर डायस सभागृहातील एका लग्न सोहळ्याच्या स्वागत समारंभातून ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पळविणार्या टोळीतील प्रमुख संशयित सावन सिसोदिया याच्याकडून चोरण्यात आलेले सोन्याचे दागिने आणि चोरी करण्यासाठी वापर केलेल्या मुलाची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला असून या दागिने चोरी प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे पथक पुन्हा एकदा मध्य प्रदेशला रवाना झाले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दागिन्यांची बॅग पळविण्यासाठी वापर करण्यात आलेला मुलगा संशयित सिसोदिया याचा नातेवाईक नसल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. तसेच चोरण्यात आलेल्या दागिन्यांबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहे.
या सोन्याच्या दागिने चोरी प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी सावन सिसोदिया (मध्य प्रदेश) याला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. तथापि, चोरीस गेलेले सोन्याचे दागिने अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने संशयित सावन सिसोदिया याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेला आहे.