Home बातम्या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतेय

समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतेय

0

दरवर्षी सरासरी १.२९ मि. मी. ची वाढ

देशातील समुद्राच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढत चालली असून गेली चाळीस – पन्नास वर्षे ती वार्षिक १.२९ मि. मी. या सरासरीने वाढत असल्याचे आढळून आले आहे, अशी कबुली सरकारने दिली आहे. हवामानातील बदल, लाटांमधील बदल, समुद्रकिनार्‍यांची धूप, नद्यांच्या मुखाशी गाळ साचणे आदी समस्यांच्या तुलनेत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ अल्प असली तरी दीर्घ काळाचा विचार करता ही समस्या जाणवू लागली आहे. केवळ समुद्रकिनार्‍यांची धूप झाल्यानेच ही पातळी वाढते आहे असे म्हणता येणार नाही असेही सरकारने नमूद केले आहे.

भारतीय भरतीचे मोजमाप करणार्‍या माहितीनुसार गेल्या शतकात कोचीत समुद्राच्या पाण्याची पातळी १.२ मि.मी. प्रतिवर्ष अशी वाढली, विशाखापट्टणममध्ये त्यात ०.९ मि. मी., मुंबईत ०.८ मि. मी., सुंदरबनमध्ये ३.१४ मि.मी. या सरासरीने वाढल्याचे सरकारने सांगितले आहे. भारत सरकारने समुद्राच्या पातळीतील वाढीची नोंद ठेवण्यासाठी २६ ठिकाणी मोजमाप यंत्रणा उभारल्या असून हैदराबाद येथील इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फर्मेशन सर्व्हीसेस (इनकोइस) कडे ते तत्क्षणी माहिती पाठवीत असतात. भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत हे केंद्र येते. केंद्रीय जल आयोग आणि संबंधित राज्यांच्या मदतीने त्या माहितीचा अभ्यास केला जातो. केंद्रीय नियोजन, विज्ञान, तंत्रज्ञान व भू विज्ञान राज्यमंत्री डॉ. अश्‍विनीकुमार यांनी लोकसभेत काल एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.