>> पेडण्यात म्हादई बचाव आंदोलन
म्हादई ही जीवनदायिनी आहे तिच्या रक्षणासाठी आता प्रत्येक गोमंतकीयाने जागृत राहून आंदोलनाच्या उपक्रमात सहभागी व्हायला हवे. वेळप्रसंगी हे सरकार उखडून टाकावे लागेल. आता पाच वर्षांसाठी थांबण्याची गरज नाही दरदिवशी जागृत होऊन राजकर्त्याना धडा शिकवावा लागेल, अन्यथा पुढील पिढी आम्हाला माफ करणार नाही. आमची म्हादई आम्हाला वाचवायला हवी असे प्रतिपादन गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर यांनी केले. पेडणे टॅक्सी स्थानकाजवळ म्हादई बचाव आंदोलनाची सभा पेडणे प्रभागातर्फे आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
सुरुवातीला पेडणे प्रभागातर्फे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांना निवेदन सादर केले. त्यावेळी प्रसाद शहापूरकर यांनी उपजिल्हाधिकार्यांना हे निवेदन पेडणेच्या जनतेतर्फे आपणास देत असून आपण ते सरकारला पोचवावे अशी विनंती केली. निवेदन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शहरात जागृती फेरी काढली. त्या फेरीत विविधघोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जागृत फेरीचे रूपांतर सभेत झाले.
म्हादईचे सर्व श्रेय प्रा. राजेंद्र केरकर यांना द्यावे लागेल. त्यांचा तिथला अभ्यास, म्हादई किती महत्वाची आहे हे राजेंद्र केरकर यांनी वेळोवेळी कथन केले असल्याचे वेलींगकर यांनी सांगितले.
अरविंद भाटिकर यांनी, म्हादई नदी ७८ टक्के गोव्यातून, १८ टक्के कर्नाटक आणि ४ टक्के महाराष्ट्रातून वाहते. त्यामुळे राज्याला ७८ टक्के पाणी मिळायला हवे. मात्र केंद्र सरकार आणि लवादाने २४ टक्के राज्याला पाणी वितरित करण्याचा निर्णय घेतला तो योग्य नसून त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. हे आंदोलन प्रत्येक गोमंतकियाचे असल्याचे सांगितले.
माजी पोलीस अधीक्षक उमेश गावकर, यांनीही यावेळी मत व्यक्त केले. तर शिक्षकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनी केले.
विविध संस्थांचा पाठिंबा
या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी जीवनदायिनी संस्थेचे संस्थापक नाना ऊर्फ नारायण सोपटे केरकर, पर्यावरणप्रेमी विक्रमादित्य पणशीकर, आपचे प्रसाद शहापूरकर, गोवा सुरक्षा मंचाचे विनायक च्यारी, भारत माता की जयचे प्रा. गजानन मांद्रेकर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे दिलीप नाईक, राष्ट्रप्रेमीचे प्रसाद ताटकर, शिवजयंती उत्सव समितीचे अमीत मोरजे, गोवा कुळ मुंडकार संघर्ष समितीचे डॅनियल डिसोझा, मोपा विमानतळ पीडित शेतकरी समितीचे संदीप कांबळी, शांतादुर्गा कला केंद्राचे सतीश धुमाळ, मोरजाई देवस्थान समितीचे अध्यक्ष गोपाळ शेटगावकर व इतरांनी सांगितले.