>> महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष
महाराष्ट्रातील सत्तापेचावर काल रविवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राज्यपालांना सादर केलेली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले असून आज सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी सर्व पक्षकारांना न्यायालयाकडून नोटीस जारी केली असून यात अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा समावेश आहे.
काल झालेल्या सुनावणीवेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली तर भाजपकडून मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. कर्नाटकाचा हवाला देत अभिषेक मनू सिंघवी आजच बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत तसेच गुप्त मतदानाऐवजी थेट मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. काल ज्यांनी बहुमताचा दावा केला. ते आज विश्वासदर्शक ठरावापासून पळ का काढत आहेत, असा सवालही उपस्थित करण्यात आला. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते राहिलेले नाहीत. भाजपकडे जर बहुमत असेल तर त्यांना बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यायला हवी, असे सिब्बल यांनी म्हटले. तर मुख्यमंत्र्यांना नोटीस मिळेपर्यंत न्यायालयाने कोणताही निर्णय देऊ नये, असे मुकुल रोहतगी यांनी सांगितले.
मी राष्ट्रवादीतच ः अजित पवार
बंडखोरी करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच भूमिका जाहीर करत मी राष्ट्रवादीतच असून आदरणीय शरद पवार हेच आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ असे ट्वीट केले. राष्ट्रवादीच्याच मदतीने पुढील सरकार बहुमत सिद्ध करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांनी काल लागोपाठ १६ ट्विट केली असून त्यातील पहिल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. थोेडा संयम बाळगल्यास सारे काही ठीक होईल असेही त्यांनी यातील एका ट्वीटमध्ये म्हटले आहे .
दरम्यान, अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न अद्याप सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ५१ आमदारांच्या सह्याचे पत्र घेऊन राजभवन गाठले परंतु, राज्यपाल दिल्लीत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
शरद पवारांचे उत्तर
दरम्यान, अजित पवार यांचे वक्तव्य चुकीचे असून ते लोकांमध्ये गैरसमज आणि संभ्रम निर्माण करणारे असल्याचे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे. भाजपसोबत आघाडी करण्याचा कोणताही संबंध नाही. राष्ट्रवादीने शिवसेना आणि कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असे पवार म्हणाले.
भाजपकडून कॉंग्रेसचे आमदार
फोडण्याचे प्रयत्न ः चव्हाण
सत्ता टिकवण्यासाठी भाजपकडून कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवलंय तिथे रुम बुक केल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात घोडेबाजार सुरू झाल्याचे संकेत मिळत असून भाजपकडून कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
भाजपने आखली रणनीती
येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेत होणारा विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकण्यासाठी भाजपच्या बैठकीत रणनीती आखण्यात आल्याची माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शेलार यांनी ही माहिती दिली. येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. आमदारांनीच हा ठराव मांडल्याचं शेलार यांनी सांगितले.