बेंगळुरू-ब्लास्टर्स पुन्हा आमनेसामने

0
106

हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) आंतरराष्ट्रीय ब्रेकनंतर शनिवारी पुन्हा सुरु होत आहे. येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर शनिवारी बेंगळुरू एफसी विरुद्ध केरला ब्लास्टर्स एफसी यांच्यात हा सामना होईल.

दक्षिणेतील हे प्रतिस्पर्धी नेहमीच चुरशीने खेळतात. त्यामुळे उद्याही वातावरण भारलेले असतील. दोन्ही संघांना मोहीमेत जाऩ आणण्यासाठी विजयाची गरज आहे. चार सामने झाल्यानंतर बेंगळुरू ६ गुणांसह पाचव्या, तर ब्लास्टर्स ४ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

बेंगळुरू हा आतापर्यंत अपराजित राहिलेल्या तीन संघांमध्ये आहे, पण त्यांना विजय एकच मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय ब्रेकपूर्वी आणखी एक कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नईन एफसीविरुद्ध ते जिंकले. या विजयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्‌य म्हणजे कार्लेस कुआद्रात यांच्या संघाला गोल करण्याचा फॉर्म गवसला. त्यांनी तीन गोल केले. आधीच्या तीन सामन्यांत त्यांना एकच गोल करता आला होता. यावेळी कर्णधार सुनील छेत्रीने मोसमातील खातेही उघडले.

बेंगळुरूचा कडेकोट बचाव भेदण्याचे खडतर आव्हान एल्को शात्तोरी यांच्या ब्लास्टर्ससमोर असेल. कांतीरवामधील समर्थकांकडून त्यांना लक्षणीय पाठिंब्याची अपेक्षा असेल.
ब्लास्टर्सने सलामीला एटीकेविरुद्ध विजय मिळविला. त्यानंतर त्यांना झगडावे लागले असून तीन सामन्यांत विजय मिळविता आलेला नाही. त्यांना मुंबई सिटी आणि हैदराबाद यांच्याविरुद्ध पराभूत व्हावे लागले, तर ओदीशाविरुद्ध घरच्या मैदानावर बरोबरी पत्करावी लागली. मारीओ आर्क्वेस, रॅफेल मेस्सी बौली आणि जैरो रॉड्रीग्ज अशा खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे मोहीम विस्कळीत झाली आहे. हे दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा नेहमीच चुरस होते. दोन्ही संघ भरगच्च स्टेडियमवर प्रसंगाला साजेसा खेळ करून लढतीत रंग भरणार का याची उत्कंठा शिगेला पोचली आहे.