- अनुराधा गानू
(आल्त सांताक्रूज-बांबोळी)
आजच्या तरुण पिढीला अनेक सर्पांनी विळखा घातलाय.. त्यामुळे संस्कृतीच्या झाडाला लागलेल्या कीडीकडे तिचं लक्षच नाहीयेय, पण हे झाड समूळ नष्ट होण्याआधीच पाऊले उचलली तर बरं. नाहीतर दुसर्याच्या अंगणात हे झाड बहरेल …
‘बहरला पारिजात दारी, फूले का पडती शेजारी…’ हे गाणं आज आठवायचं कारण परवा डिचोलीला एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्याचं उद्घाटन मा. आ. राजेश पाटणेकरांनी केलं. त्यांच्या अध्यक्षीय भाषणांत त्यांनी म्हटलं की आमची संस्कृती परदेशात रुजतेय. ऐकून बरं वाटलं अन् म्हणून मला त्या गाण्याची आठवण झाली.
संस्कार आमचे. संस्कृती आमची पण रुजत्येय परदेशात. चांगलंच आहे. पण आमची संस्कृती आमच्या देशात का रुजत नाही??… याचाही बिचार कुठेतरी व्हायला हवा. कां ती रुजण्यासारखी मातीच नाहीयेय आमच्या देशात? एखादं झाड लावलं की त्याची मशागत करावी लागते. त्याला खत-पाणी घालावं लागतं. कीड लागली की त्यावर फवारणी करावी लागते. वाळलेली, सडलेली पानं काढून टाकावी लागतात. एवढे सगळे कष्ट घेणार कोण? त्यापेक्षा झाड न लावलेलेच बरे. तसंच हे आमच्या संस्कृतीच्या झाडाचं. संस्कारांचे एकत्रीकरण म्हणजे संस्कृती. आपल्या इथे वयाच्या ५ वर्षापर्यंत आपण एखाद्यावर संस्कार करु शकतो. तेवढ्या वर्षापर्यंतच हे संस्काराचं, संस्कृतीच रोपटं टिकत. एकदा का माणसाला शिंगं फुटली की मग त्या झाडाची निगा कोणी राखत नाही. आता तर हे संस्कृतीचं झाड शोधावंच लागेल. शहरी भागात तर फार क्वचितच सापडेल. अजूनही एखाद्या एकोड्या खेड्यांत कदाचित कुठेतरी सापडण्याची शक्यता आहे. नाहीतरी ते झाड शोधत शोधत आपल्याला परदेेशाची वारी करावी लागेल.
परदेशात रुजण्याचा विचार सोडला तरी आपली संस्कृति आपल्याला तरी कुठे कळलीय, अगदी त्यांतल्या बारीकसारिक गोष्टीसुध्दा आम्हाला माहीत नाहीयेत. आपल्या संस्कृतीला सुरवात होते ती सकाळी उठल्यापासूनच. जमिनीवर पाय ठेवण्याआधीच जमिनीला नमस्कर करून देवाचं स्मरण करून उठावं. जमिनीला नमस्कार अशासाठी की दिवसभर आपण जमिनीवरच पाय ठेवून असतो. तीच आपला भार सांभाळत असते. तेव्हा कृतज्ञता म्हणून तिला आधी नमस्कार करावा आणि देवानं आपल्याला इतकं भरभरून दिलंय, त्याचे उपकार अंशतः तरी फेडावेे त्याचं स्मरण करुन! कल्पना करा त्याने जर आपल्याला डोळे, कान, हात, पाय, डोकं, नाक हे काहीच दिलं नसतं तर! म्हणून उठल्या उठल्या आधी देवापुढे दिवा-उदबत्ती लावून त्याच्यापुढे हात जोडून नतमस्तक व्हावं. बघा.. घर कसं प्रसन्नतेने उजळून निघेल. रात्रीच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं ते प्रतीक आहे. पण हे सगळं करायला वेळ कोणाला आहे?? सकाळी उठल्या उठल्या चहाची धावपळ सुरू होते. सकाळीच काय दिवसभरात देवापुढे हात जोडायला माणसाला एक मिनिटसुद्धा वेळ नसतो. देव म्हणजे काय सृष्टी निर्माण करणारी आणि ती चालवणारी एक शक्ती आहे. त्या शक्तीपुढे तरी नतमस्तक व्हाल की नाही. पण प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कानशीवर घासून घेणार्यांना हे पटतच नाही. पण त्यांना हे कळत नाही की विज्ञानाचा पायासुध्दा हीच शक्ती आहे. तिन्ही सांजा आपण देवापुढे, तुळशीपुढे दिवा लावतो. रामरक्षा, मारुतीस्तोत्र म्हणतो. त्यामुळे शरीरात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते.
तसेच आपल्या संस्कृतीमध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत त्या माणसाला निरांजनाच्या वातीने ओवाळायची आहे. निरांजनाच्या उजेडात आपण त्याला सत्मार्गाची, अंधारातून प्रकाशाकडे येण्याची वाट दाखवतो. मेणबत्तीला फुंकर मारून प्रकाशातून अंधारात चाचपडत ठेवण्याची आपली संस्कृती नाही. तसेच आपले सण. गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा हे सण साजरे करणे हाही आपल्या संस्कृतीचाच एक भाग.
आपली विवाहसंस्था, आपली कुटुंबपद्धती हीसुध्दा आपली परंपरा आहे. आपली संस्कृती आहे. एकत्र कुटुंबपध्दतीमध्ये माणसांना एकमेकांचा आधार असतो. घरातल्या तरुण माणसांनी घरातल्या वडिलधार्या वयस्कर माणसांचा सांभाळ करणे, त्यांना आधार देणे हे गृहीतच धरलेले आहे. पण आजचा तरुणवर्ग घरातल्या वयस्कर माणसांना वृध्दाश्रमापर्यंत पोहोचविण्यातच धन्यता मानतो. काही अपवाद वगळले तर सगळीकडे चित्र असेच दिसेल. गुरुला साक्षात परब्रह्म मानणारी आमची संस्कृती. पण याच संस्कृतीत वाढलेली आमची आजची मुलं गुरुंबद्दल जेव्हा अनादराने बोलतात तेव्हा मनाला दु:ख होतं.
आमच्या संस्कृतीचे वर्णन करावे तेवढे थोडेच. ती इतकी महान आहे की तिचे बीज कुठेही टाकले तरी ते उगवेलच. तसंच परदेशात उगवतंय, रुजतंय ही आनंदाची गोष्ट आहे. पण आपली संस्कृती आपल्या मातीत रुजत नाहीयेय याची खंत वाटते. आपल्या संस्कृतीच्या झाडाची जोपासना करणे हे नव्या तरुण पिढीच्या हातात आहे. पण या तरुण पिढीला अनेक सर्पांनी विळखा घातलाय.. त्यामुळे संस्कृतीच्या झाडाला लागलेल्या कीडींकडे तिचं लक्षच नाहीयेय, पण हे झाड समूळ नष्ट होण्याआधीच पाऊले उचलली तर बरं. नाहीतर दुसर्याच्या अंगणात हे झाड बहरेल आणि आमच्या इथली त्यांची मुळंसुद्धा नष्ट होतील.