>> टीम इंडिया प्रथमच खेळणार ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट
भारतीय क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्या ऐतिहासिक ईडन गार्डनवर आजपासून टीम इंडिया आपली पहिलीवहिली ‘गुलाबी’ कसोटी खेळणार आहे. दिवस-रात्र पद्धतीने व गुलाबी चेंडूने भारत तसेच बांगलादेशचा हा पहिलाच कसोटी सामना असेल. इंदूरमधील पहिली कसोटी तीन दिवसांत जिंकलेला भारतीय संघ १-० असा आघाडीवर असून दुसर्या सामन्यासह मालिका २-० अशी जिंकण्यावर भारताचा भर असेल.
भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
विद्युतझोतात खेळताना दवाचा परिणाम देखील जाणवणार आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यास फलंदाजी की गोलंदाजी निवडावी हा प्रश्न दोन्ही संघाच्या कर्णधारांना पडलेला असेल. कोणत्याही वातावरणात गोलंदाजी करण्यास सक्षम असलेली पाच अनुभवी गोलंदाज भारताकडे आहेत. त्यामुळे वातावरणाची व गुलाबी चेंडूची चिंता करण्याचे कारण नाही. बांगलादेशचा संघ पात्र संघ निवडीच्या पेचात पडला आहे. गुलाबी चेंडूने खेळलेल्या कसोटींचा इतिहास पाहता वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे बांगलादेशचा संघ एका फिरकी गोलंदाजाला बाहेर बसवून मध्यमगती गोलंदाजाला संधी देऊ शकतो. इबादत हुसेनच्या जागी वनडे स्पेशलिस्ट अल अमिन हुसेनला संघाचे दार उघडले जाऊ शकते. अतिरिक्त सलामीवीर सैफ हसन जायबंदी झाल्याने शदमन व ईमरूल यांच्या जागेला धोका वाटत नाही. क्रमवारीत प्रयोग करण्याचे ठरविल्यास लिटन दासला सलामीला पाठवणे त्यांच्यासाठी सोयीचे ठरू शकते.
बांगलादेश संभाव्य ः शदमन इस्लाम, इमरूल कायेस, मोमिनूल हक, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्ला रियाद, मोहम्मद मिथुन, लिटन दास, मेहदी हसन मिराझ, ताईजुल इस्लाम, अबू जायेद व अल अमिन हुसेन.
भारत संभाव्य ः रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृध्दिमान साहा, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा व मोहम्मद शमी.
भारतीय पदार्पणासाठी तब्बल चार वर्षे
२०१५ साली नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात ऍडिलेड ओव्हलवर पहिला दिवस-रात्र कसोटी सामना झाला होता. यजमानांनी हा सामना ३ गड्यांनी जिंकला होता. यानंतर दहा कसोटी दिवस-रात्र पद्धतीने झाले आहेत. सर्वाधिक पाच दिवस-रात्र कसोटी सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. मागील वर्षी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यातील ऍडिलेड कसोटी गुलाबी चेंडूने खेळविण्याची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयला केली होती. परंतु, त्यांची ही विनंती मंडळाला फारशी पसंत पडली नव्हती.