खाण व्यवसाय डिसेंबरमध्ये सुरू होण्याचा मुख्यमंत्र्यांचा आशावाद

0
108

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे राज्यातील बंद असलेला खाण व्यवसाय येत्या डिसेंबर महिन्यात पूर्ववत होणार असल्याचा आशावाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण क्षेत्रातील कामगार संघटना आणि मायनिंग पीपल्स फ्रंटच्या पदाधिकार्‍यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केला.
गोवा मायनिंग पीपल्स फ्रंट आणि खाण कामगार संघटना या दोन संघटनांच्या प्रतिनिधीशी राज्यातील खाण व्यवसायासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या फेरआढावा याचिकेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. खाण व्यावसायिकांना रस्ता करामध्ये सूट देण्याचा विषय सोडविण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. पंतप्रधान मोदी यांची खाण प्रश्‍नावर चर्चेसाठी येत्या २५ नोव्हेंबरपूर्वी भेटीसाठी वेळ मागून घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे, असे पुती गावकर यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन खाण प्रश्‍नी पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करून पुढील कृती निश्‍चित केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयातील खाणी संबंधीची प्रलंबित जुनी याचिका निकालात काढण्यासाठी पाठपुरावा करावा. केंद्रीय मंत्रालयाने न्यायालयात फेब्रुवारी महिन्यात अर्ज सादर करून याचिका लवकरात लवकर सुनावणीसाठी घेण्याची विनंती केली आहे. परंतु, अजूनपर्यंत याचिका सुनावणीला आलेली नाही, असे पुती गांवकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी डिसेंबरपर्यंत राज्यातील खाण व्यवसाय पूर्ववत करण्याचा आश्‍वासन दिले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या फेरआढावा याचिकेची माहिती दिली.