नाफ्तावाहू जहाज आणण्यामागे मंत्री, आमदाराचा हात नाही

0
191

>> जहाज बंदरात आणण्यास मान्यता : मुख्यमंत्री

ू शी नलिनी हे नाफ्तावाहू जहाज दुरुस्तीसाठी मुरगाव बंदरात आणण्यास एमपीटीने मान्यता दिली आहे. नाफ्तावाहू जहाज आणण्यात राज्य मंत्रिमंडळातील मंत्री किंवा आमदाराचा हात नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल केले.

विरोधकांकडे नाफ्ताशिवाय अन्य कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे नाफ्ता प्रकरणामध्ये मंत्री, आमदार गुंतल्याचा आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारकडून सर्व विषय योग्य प्रकारे हाताळले जातात. नाफ्ता हा एकच विषय विरोधकांना सापडला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. दोनापावल येथे समुद्रात रुतलेल्या नाफ्तावाहू जहाजाची नियमित तपासणी केली जात आहे. नाफ्तावाहू जहाजाची टाकी सुरक्षित आहे. तसेच नाफ्ताची गळती होऊ नये म्हणून आवश्यक उपाय योजना करण्यात आलेली आहे. आपत्ती काही सांगून येत नाही असे सावंत म्हणाले.

काळजीचे कारण नाही : लोबो
नाफ्ता जहाजाचे सतत निरीक्षण केले जात आहे. त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही, असे असे बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बंदर कप्तान खात्याकडून नलिनी जहाजातील नाफ्ताची गळती होऊ नये म्हणून हाती घेण्यात येत असलेल्या कामकाजावर देखरेख ठेवली जात आहे. रुतलेल्या जहाजाची पाहणी केल्याशिवाय दिशाभूल करणारी विधाने कुणीही करू नये. रुतलेल्या जहाजाच्या जवळ टग बोट उपलब्ध करण्यात आले आहे. नाफ्ता नव्हेच तर ऑईल, डिझेलची गळती होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आलेली आहे.