पुलंच्या अक्षरसहवासात…

0
410

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचा आता सरता क्षण आहे. अशा प्रसंगी या आनंदसरोवरातील राजहंसाविषयी एकमुखाने काय म्हणावं? ‘‘पुल, तुम्ही आमचं जीवन अर्थपूर्ण केलंत. रसपूर्ण केलंत. जीवनाचा अर्थ लावीत बसण्यापेक्षा जीवन जगायला शिकवलंत. एक शतक तुम्ही गाजवलंत. येणार्‍या शतकांत तुम्हीच आम्हाला हवे आहात. तुमच्यासारख्या ‘पुरुषोत्तमा‘ने आपल्या अक्षरसमृद्धीने ‘विपुल’ करून ठेवलं आहे; ते आम्हाला पुरेसं आहे….’’

अनेकांचे आहेत तसे पु. ल. देशपांडे माझे आवडते लेखक आहेत. अनेकांनी त्यांच्याविषयी इतके लिहिले आणि इतके चांगले लिहिले आहे की आपण वेगळे काय लिहावे याविषयी पंचाईत होते. शिवाय आवडत्या माणसाविषयी आणि आवडत्या लेखकाविषयी विशेषणविरहित लिहिता येत नाही. मजेची गोष्ट अशी की विशेषणे लावीत बसलो तर बाकी लिहिण्यासारखे विशेष्य अन् विशेष काही राहत नाही. माणूस म्हणून प्रिय आणि प्रिय माणसांपैकी अत्यंत प्रिय लेखक म्हणून पु. ल. देशपांडे यांचीच मी गणना करीन. ज्या विनोदी लेखनामुळे त्यांना महाराष्ट्रात, देश-विदेशांत अमाप लोकप्रियता मिळाली, ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ ही प्रेमाची उपाधी ज्यांना प्राप्त झाली त्यांचे विनोदी लेखन मला अत्यंत आवडते. पण तेवढ्यापुरते त्यांच्याविषयीचे प्रेम मी सीमित करू इच्छित नाही. ज्यांची जन्मशताब्दी वाजत-गाजत आली आणि रसिकजनांनी, पु.लं.वर उदंड प्रेम करणार्‍या अगणित चाहत्यांनी ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली.

आता तर तिचा सरता क्षण आहे. अशा प्रसंगी या आनंदसरोवरातील राजहंसाविषयी एकमुखाने काय म्हणावं? ‘‘पुल, तुम्ही आमचं जीवन अर्थपूर्ण केलंत. रसपूर्ण केलंत. जीवनाचा अर्थ लावीत बसण्यापेक्षा जीवन जगायला शिकवलंत. एक शतक तुम्ही गाजवलंत. येणार्‍या शतकांत तुम्हीच आम्हाला हवे आहात. तुमच्यासारख्या ‘पुरुषोत्तमा‘ने आपल्या अक्षरसमृद्धीने ‘विपुल’ करून ठेवलं आहे; ते आम्हाला पुरेसं आहे. तुमच्यासारखा उत्तम पुरुष शतकातून एकदाच जन्मतो अशी आमची नितांत श्रद्धा आहे.’’
पु.लं.नी आपल्या अक्षरलेखनाने कोणती किमया केली आहे? त्यांचा नामोच्चार कोणत्याही नावाने करा. त्यांना पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणा. ज्या लेखनामुळे ते प्रतिष्ठाप्राप्त लेखक झाले ते पु. ल. देशपांडे हे नाव उच्चारा. किंवा नसतं पु.ल. अथवा पी.एल. (कधीकधी काही मित्रांनी म्हटल्याप्रमाणे पी. एल. देशपांडे म्हणून बघा.) असे उच्चारा; काही फरक पडणार नाही. आत्मीयतेचा धागा तोच आणि साहित्यक्षेत्रातील तेच खणखणीत नाणे!

पु.लं.नी केवळ विनोदी लेखन केले नाही. त्यांचे गंभीर लेखन हे तेवढ्याच तोलामोलाचे आहे. ते सतत माणसांमध्ये वावरले. माणसांवर लिहिले. त्यांच्या या व्यक्तिरेखा गाजलेल्या आहेत. त्या गंभीर प्रकृतीच्या आहेत तशाच नर्मविनोदी आहेत. विनोदात आकंठ बुडून राहता येईल अशाही आहेत. पण मनुष्यत्वाचा सोलीव गाभा रेखाटायला पु.ल. विसरत नाहीत. कारण त्यांनी अशी माणसे पाहिलेली आहेत. अनुभवलेली आहेत. अनुभवाला अनुभूतीचे पाणी कसे चढवावे हे पु.लं.च्या कलात्मक लेखणीला आकळलेले आहे. म्हणून ही व्यक्तिचित्रे रोचक होतात. वाचनीय बनतात. अंतर्मुख करतात. यात सामान्य माणसे आहेत. असामान्यही आहेत. राजकारण, समाजकारण, संगीत, नाट्य, चित्रकला, शिल्पकला अशा नानाविध क्षेत्रांतील नामवंत मंडळींचा त्यात समावेश आहे.
पु.लं.च्या विनोदाविषयी जाता जाता थोडेसे सांगायला हवे. जीवनातील सुसंगतीवर त्यांचे अतीव प्रेम आहे. विसंगतींवर उपहास, उपरोध या आयुधांनिशी न दुखविता प्रहार करणे हे त्यांच्या लेखनाचे उद्दिष्ट आहे. पु.ल. इचलकरंजी येथील सुवर्णमहोत्सवी अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’च्या ‘पु. ल. विशेषांका’साठी डॉ. आनंद यादव यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी पु.लं.ना प्रश्‍न विचारला, ‘पु.ल., तुम्हाला विनोद कसा काय सुचतो?’ पु.लं.नी ताबडतोब उत्तर दिले, ‘‘मी गंभीरपणेच लिहितो. तुम्हा लोकांना तो विनोद वाटतो.’’
म्हणजे पु.लं.च्या लिहिण्याच्या शैलीतून तो आपल्यापर्यंत पोचतो.
पु.लं.च्या बहुविध लेखनाला जीवनाच्या अनेक पैलूंचा सर्वांगस्पर्श झाला आहे. त्याचे वाचन करताना आपण पुलकित होतो. नव्या दर्शनाने समृद्ध होतो. त्यांच्या जबरदस्त निरीक्षणशक्तीवर आधारलेल्या लेखनामुळे अंतर्मुख होतो. एखादा सामान्य विषय, एखादा अनुभव, अनुभवाचा एखादा तुकडा त्यांना पुरतो. त्यावर त्यांची आल्हाददायी अक्षरनिर्मिती उभी राहते. सर्वांना जवळचे आणि परिचित म्हणजे घर. घराविषयी पु.ल. लिहितात तेव्हा वेगळेच रसायन निर्माण होते.

‘‘गुहेतला नुसता निवारा आणि आसरा सोडून आदिमानव घरात आला तेव्हाच मनुष्यप्राण्यानं प्राणिसृष्टीशी असलेलं आपलं नातं सोडून आहार, निद्रा, भय, मैथुन यापलीकडलं काहीतरी साधायला सुरुवात केली. मनुष्य म्हणवून घेण्यापेक्षा गृहस्थ म्हणवून घेण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलुपात राहू लागला. भिंत आल्यावर दरवाजे आले, उंबरठा आला, खिडक्या आल्या, झरोके आले, ओसरी आली, पडवी-ओढे-खांब-पाखी आली. अंगण आलं, परसू आलं, परसात आड आला, आळवाची खाचसुद्धा आली. तेवढ्यात कुणा चतुर माणसाला घरावर घर बसवता येतं असा शोध लागला आणि माडी आली. गच्ची आली. जिना आला. चार भिंतींच्या आडोशापासून सुरुवात झालेल्या घराला अंतर्बाह्य फाटे फुटत गेले ते घरमालक आणि भाडेकरूंपर्यंत जाऊन पोहोचले.’’
-लेखनातील ही सजगता, शब्दकळेच्या मांडणीचे भान आणि तन्मयता यालाच म्हणतात पु.ल.स्पर्श. हा पु.ल.स्पर्श त्यांच्या विनोदी आणि वैचारिक, चिंतनशील प्रवृत्तीच्या लेखनात सर्वत्र आढळतो. पु.लं.नी लिहिलेल्या ‘खोगीरभरती’, ‘नस्ती उठाठेव’, ‘बटाट्याची चाळ’, ‘गोळाबेरीज’, ‘असा मी असामी’, ‘हसवणूक’ या विनोदी पुस्तकांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. मनातील जाळी-जळमटे नाहीशी होतात. निखळ आनंदाच्या अंगणात तुमचे मन निरागस हास्यरसात बागडायला लागेल. त्यात मानवी मनाच्या अनेक पापुद्य्रांचे दर्शन घडेल. शब्दनिष्ठ विनोदाच्या नाना परी आढळतात. शब्दप्रभू पु. ल. देशपांडे यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाची खरीखुरी श्रीमंती येथे अनुभवायला मिळेल. हे हसविणे मानवी व्यंगांवर आधारलेले नसून त्याच्या विसंगतींवर भाष्य करण्याच्या निमित्ताने निर्माण झालेले आहे. मानवी स्वभाववैशिष्ट्यांचा हा लघुत्तम साधारण विभाजक आहे. मानवी करुणा हा पु.ल.निर्मित विनोदाचा मूलस्रोत आहे. मध्यमवर्गीयांचे कष्टप्रद जीवन हा त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू आहे.
‘खिल्ली’ या पुस्तकातील विनोद वेगळ्या प्रकारचा आहे. आपल्या देशात उद्भवलेल्या आणीबाणीच्या प्रसंगी आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय घटना-प्रसंगांवर पु.लं.नी विनोदी पद्धतीने केलेले हे भाष्य आहे. या घटनांमुळे ज्या प्रतिक्रिया जनमानसात उमटल्या त्यांतील साक्षिभाव पु.लं.नी जागविला आहे. या विडंबनात्मक लेखनातून तात्कालिकाच्या सीमा उल्लंघून कलात्मक रूप देण्याचे त्यांचे भाषाकौशल्य वाखाणण्यासारखे आहे.

‘गणगोत’, ‘गुण गाईन आवडी’ आणि ‘मैत्र’ या पुस्तकांतील व्यक्तिचित्रे म्हणजे पु.लं.च्या समृद्ध जीवनपटावरील संस्मरणीय व्यक्ती आहेत. या व्यक्तिविशेषांमधून पु.लं.ची श्रद्धास्थाने कळतात, सौहार्दसंबंध उमगतात. त्यांच्या कलासक्त मनाचा आणि अभिरूचिसंपन्नतेचा प्रत्यय येतो. पु.लं.चे गणगोत कितीतरी समृद्ध आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांतील ही माणसे आहेत. त्यांच्याविषयीचा जिव्हाळा व्यक्त करावा तो पु.लं.सारख्या संवेदनशील आणि प्रतिभावंत लेखकानेच. यात प्रथमतः येतात त्यांच्या जीवनाची जडणघडण करणारे त्यांच्या मातुल घराण्यातील आजोबा वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी. त्यांचा विसर न व्हावा. नाट्यक्षेत्रातील दिग्गज चिंतामणराव कोल्हटकर आहेत. संगीतक्षेत्रातील केशवराव भोळे, हिराबाई बडोदेकर, रामूभय्या दाते, बालगंधर्व यांसारखी बुजुर्ग मंडळी आहे. त्यांचे व्यक्तिदर्शन घडविताना पु.लं.नी आपली संगीतक्षेत्रातील जाणकारी आणि बहुश्रुतता प्रकट केली आहे. आप्तजनांपैकी त्यांचे सासरे आप्पा आणि आजी (बाय) आहेत. त्यांचा लाडका छोटा दिनेश आहे. बेळगावचे नाट्यप्रेमी आणि संगीतप्रेमी अवलिया रावसाहेब आहेत. इतिहाससंशोधक बळवंत मोरेश्‍वर, पुरंदरे (बाबासाहेब पुरंदरे) आणि भूदानयज्ञासाठी वाहून घेतलेले कृतिशील प्रज्ञावंत विनोबा भावे यांच्याविषयी पु.लं.नी आत्मीयतेने लिहिले आहे. चोभे आणि फणसळकर मास्तर ही मुलुखावेगळी माणसे या ‘गणगोत’मध्ये समाविष्ट आहेत. ग्रंथजगतातील ‘इंटरनॅशनल’ दीक्षित आणि रा. ज. देशमुख यांचा त्यांंनी करून दिलेला परिचय तेवढाच हृद्य आहे. ही सारी व्यक्तिचित्रे वाचल्यानंतर आपल्या मनाचा क्षितिजविस्तार झाल्यावाचून राहत नाही. पु.लं.च्या प्रतिभेचे अनेक विभ्रम दर्शविणारा हा कॅलिडोस्कोप आहे. या व्यक्तिचित्रांतील शैलीविषयी लिहिणे हा स्वतंत्र विवेचनाचा विषय आहे. गुणीजनांचे गुण यथार्थपणे सांगणे हा पु.लं.च्या प्रतिभेचा स्थायी भाव आहे. त्यामुळे ‘गुण गाईन आवडी’ हे त्यांचे पुस्तक अवीट गोडीचे झाले आहे. केशवराव दाते, भास्करबुवा बखले, ‘हे देवाघरचे देणे’मधील राम गणेश गडकरी; ‘एक गाण्यात राहणारा माणूस’मधील मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, वसंत पवार आणि ‘मंगल दिन आज’मधील कुमारगंधर्व, स्वरूपसुंदर बाबू माने, ‘मुली, औक्षवंत हो’मधील लता मंगेशकर ही दिग्गज माणसे म्हणजे नाटक- चित्रपट- संगीतकलारूपी नभांगणातील नक्षत्रमालिका. अपार्थिव चांदण्यात विहार करायला लावणारे ते गंधर्वच जणू. त्यांचा समृद्ध आणि देखणा प्रवास रसिकजनांसाठी साकार करायला पु.लं.सारखा रसिकाग्रणी, कलावंत आणि शब्दप्रभूच हवा. जीवनाचे हे क्षेत्रफळ परिपूर्ण करण्यासाठी शिल्पकार अण्णासाहेब फडके, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आणि राष्ट्रकारणात मौलिक योगदान दिलेले सेनापती बापट आणि डॉ. राममनोहर लोहिया यांच्यासारखे धुरंधर नेते, काव्यक्षेत्रातील आनंदयात्री बाकीबाब बोरकर, ज्ञानक्षेत्रातील श्रेष्ठ विदुषी डॉ. इरावती कर्वे यांची उपस्थिती येथे आहे. परमोच्च बिंदू साधला आहे तो विसाव्या शतकातील बाबा आमटे यांच्यासारख्या कर्मयोगी संताच्या चित्रणाने.
कुसुमाग्रजांनी निर्माण केलेल्या ‘विशाखा’ नक्षत्रावर ज्यांच्या तरुणाईचे पोषण झाले त्या पु. ल. देशपांडे यांनी या समाजमनस्क व्यक्तींवर समतानतेने लिहिले, त्यामुळे मणिकांचनयोग जुळून आला आहे. तेच अनुस्यूत सूत्र ‘मैत्र’मध्ये व ‘आपुलकी’मध्ये आढळते. एककेंद्री भावविश्‍वात रमणे हे पु.लं.चे ‘नंदनवन’ नाही. विद्येची, कलेची आणि जीवनसंगरातील खडतर साधना करणारी पहाडाएवढी माणसे त्यांना जवळची वाटतात. या पुस्तकांच्या रूपाने पु.लं.नी पूर्वकाळ आपल्या मनात जागवला आहे. आपल्या काळातील मंतरलेले क्षण दृग्गोचर केले आहेत आणि भविष्यकाळाची दिशा दाखविली आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे निराळेपणाची साक्ष देणारे व्यक्तिचित्रांचे पुस्तक आहे. याला कालाची मिती आहे. अवलिया माणसांची ही एकत्रित गुंफलेली मालिका आहे आणि तिच्यात विनोदाची मुक्त हस्ते केलेली पखरण आहे.
सामान्यांमधील असामान्यत्व अधोरेखित करण्यात पु.लं.ना येथे अपरिमित यश प्राप्त झालेले आहे. ही कल्पित पात्रे वास्तवाची पुनः पुन्हा आठवण करून देणारी आहेत. यातच सारी ‘ग्यानबाची मेख’ आहे. यातली कुठली व्यक्तिरेखा चिरस्मरणीय असा प्रश्‍न केला तर आपण संभ्रमात पडू. पण उत्तर शोधता येईल. सारीच पात्रे सरसरमणीय आहेत. समाजाचे तळघर शोधले तर एखादा नारायण भेटेल, एखादा सखाराम गटणे भेटेल, चितळे मास्तर भेटेल, अंतू बर्वा भेटेल, परोपकारी गंभू भेटेल. चढाओढीने म्हणेल पुलंनी मला साहित्यात अमर करून ठेवलंय. कुणाचेच म्हणणे आपल्याला नाकारता येणार नाही.

‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ आणि ‘जावे त्यांच्या देशा’ ही पु.लं.ची प्रवासवर्णने चाकोरीतील प्रवासवर्णने नाहीत. त्यांच्या विनोदी लेखनात ती सहजतेने मिळून जावीत अशी ती आहेत. पु.लं.बरोबर आपणही मनाने ही आनंदयात्रा सुफळ संपूर्ण करू शकतो. फक्त त्यासाठी आपल्यालाही ‘सौंदर्यशोध’ करावा लागेल. ‘आनंदबोध’ स्वीकारावा लागेल. पु.लं.बरोबर प्रवास करून आल्याचे पुण्य पदरात निश्‍चित पडेल. ‘जावे त्यांच्या देशा’मध्ये मात्र पु.लं.च्या चिंतनशीलतेची नवी रूपकळा अनुभवायला मिळते. विशेषतः ‘एक बेपत्ता देश’ या लेखामध्ये. अमेरिकेच्या विरूपदर्शनाने त्यांचे मन संत्रस्त होते. ते उद्गारतात ः
‘‘न्यूयॉर्कच्या रस्त्यातून जाताना अंगावर अक्षरशः लक्तरे घालून हिंडणार्‍या सोळा-सतरा वर्षांच्या सोन्यासारख्या मुली पाहून मी तर सुन्न होत असे. स्वातंत्र्याच्या शोधात या आपल्या घरांना आणि आईबापांना सोडून पळून आलेल्या मुली! एकदा या अभाभी मुलींचा टेलिव्हिजनवर पोलिसांनी सादर केलेला कार्यक्रम पाहिला. घरट्यातून पडलेल्या पाखराच्या पिलांसारख्या त्या पोरी! कोणा गांजा-अफूसारख्या मादक पदार्थांत सुखाचा आणि स्वातंत्र्याचा शोध घेत होत्या!’’
याहून भयानक प्रकाराकडे पु.लं.नी आपले लक्ष वेधलेले आहे. असले सुख अन् असली समृद्धी आपल्या देशाला नको म्हणून त्यांनी आपल्याला सावध केलेले आहे. विनोदी साहित्यिकाप्रमाणेच विचारवंत पु.लं.चे लेखन आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. पण लक्षात कोण घेतो?
‘वंगचित्रे’ हे पठडीतील प्रवासवर्णन नाही. पु.लं.नी पन्नासाव्या वर्षी बंगालमध्ये राहून बंगाली भाषा आत्मसात करावी, रवींद्रनाथांच्या भूमीत अनिरुद्ध संचार करावा आणि रवींद्रमानस समजून घ्यावे हा ‘थ्रिलिंग’ अनुभव आहे. आत्मजीवनातील तो तेजस्वी अध्याय पु.लं.नी निर्मम वृत्तीने येथे लिहिला आहे.

याव्यतिरिक्त साहित्याच्या दालनात महत्त्वाच्या ठिकाणी पु.ल. आहेतच. त्यांनी स्वतंत्र नाटकाबरोबर रूपांतरित नाटकांच्या उत्तम संहिता मराठी रंगभूमीला पुरवून तिला श्रीमंत केले आहे. अनुवादित कादंबर्‍या आहेत. बालनाट्ये आहेत. एकांकिकांचे संग्रह आहेत. लोकनाट्य आहे. पटकथा आहेत. अनेक लेखकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रोत्साहनपर प्रस्तावना आहेत. आणीबाणीत युयुत्सू वृत्तीने अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी दिलेली झुंज त्यांच्या गाठीशी आहे. विखुरलेली आणि वाङ्‌मयीन संस्कृतीला समृद्ध करणारी असंख्य पत्रे आहेत. भाषणांचे संग्रह आहेत. अनेक लेख आहेत. गंगेचे दान गंगेलाच अर्पण करणारे पु.ल. आहेत.
असे समृद्ध जीवन जगलेला हा व्युत्पन्न, रसज्ञ आणि बहुश्रुत माणूस आहे. अनेक देश फिरून आलेला हा माणूस आहे. त्याच्या विचारांची मांड पक्की भारतीय आहे.
तस्मै पुरुषोत्तमाय नमः|