हार-जीत

0
184
  • वासुदेव कारंजकर

 

या विषयावर ती कुणाशी उघडपणे बोलूही शकत नव्हती. ना आई-वडिलांशी, ना सासू-सासर्‍यांशी! कारण त्यांचा एकतर अशा गोष्टींवर विश्वासच बसला नसता आणि नात्यागोत्यात, समाजात सर्वांची छी-थू व्हायला वेळ लागला नसता.

 

सायलीच्या पप्पांच्या एका लहानपणीच्या मित्रातर्फे प्रतीकचे स्थळ सांगून आले. अमेरिकेत नोकरी करणार्‍या त्या हसतमुख राजबिंड्या मुलाचा फोटो पाहून सगळेच खूश झाले. सायलीच्या मैत्रिणी तिच्या भाग्याचा हेवा करू लागल्या. सायलीच्या घरी सर्वांच्या आनंदाला उधाण आले. एक दिवस प्रतीकचे आईवडील, मावशी, आजी-आजोबा सगळे सायलीला पाहायला आले. सगळ्यांना सायली आवडली. चांगली सून मिळावी, आणखीन काहीही नको अशी त्यांची साधी अपेक्षा होती. असेच दोन-तीन वेळा दोन्ही कुटुंबाचे एकमेकांकडे जाणे-येणे झाले. एकमेकांचे स्वभाव कळाले. सायलीच्या आई-वडिलांचा आणि आजी-आजोबांचा प्रेमळ आणि संस्कारी स्वभाव पाहूनच प्रतीकच्या घरचे खूश झाले होते.

मग सायलीच्या लग्नाची घरात जोरात तयारी सुरू झाली. एकुलती एक मुलगी. आईवडील आपली हौस भागवून घेत सारे सोहळे यथासांग पार पाडायच्या तयारीत होते. तसं सासरही तोडीस तोड हौशी मिळालं होतं. त्यांचाही एकुलता एक मुलगा असल्याने एकमेकांच्या आनंदाला अगदी उधाण आलं होतं. सायली शंभर जणीत उठून दिसेल अशी. खूप श्रीमंत नसली तरी मध्यमवर्गीय, संस्कारी आणि सुखवस्तू घरात मोठी झालेली. आई-वडील, आजी-आजोबा अशा सर्वांच्या मायेत, कोडकौतुक करून घेत वाढलेली. चुणचुणीत आणि हुशार. म्हणता म्हणता आयटी इंजिनिअरिंग डिग्री मिळवून बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीस लागलेली. एक-दोन वर्षे नोकरीतला अनुभव घेऊन, मग ब्रेक घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा तिचा विचार होता. पुढचे शिक्षण स्वत:च्या पैशावर घ्यायचा तिचा निर्धार होता. जास्त खर्च नको असे सगळे म्हणत असतानाही पप्पांनी आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नासाठी भव्य गार्डन-लॉन बुक केलं होतं.

सायली आणि प्रतीक दोघंही आयटीत काम करणारे, सॉफ्टवेअर इंजिनिअर. प्रतीक गेली चार वर्षं अमेरिकेत सेटल झालेला. सायलीसाठीही तिकडे त्याने जॉब पण शोधून ठेवला होता. त्यामुळे तिने आपला इथला जॉब सोडला होता व तीही पूर्णपणे लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. कपडे, दागदागिने यांची भरपूर खरेदी चालू होती. सध्या ती फ्री असल्याने सारे सोहळे एंजॉय करून घेत होती. लग्नाच्या आधी आठ दिवस प्रतीक अमेरिकेहून आला. पुढे तिचा व्हिसा, देवदर्शन, सत्यनारायण पूजा सारे यथासांग पूर्ण करूनच तो सायलीला घेऊन अमेरिकेला जाणार होता. सायलीनेही त्या तयारीनेच आपल्या बॅगा तयार ठेवल्या होत्या. प्रतीक दिसायला देखणा, तरणाबांड, गोरापान. कुणालाही पटकन आवडेल अशीच त्याची पर्सनॅलिटी होती. सायलीसुद्धा तोडीसतोड देखणी होती. त्यामुळे जोडा अगदी दृष्ट लागण्याजोगा शोभून दिसत होता. तशी लग्नाआधी बरेच दिवस त्यांची फोनाफोनी, चॅटिंग, फोटो शेअर करणे चालू होतेच. दोघेही अगदी मेड फॉर इच आदर असेच वाटत होते.

अमेरिकेहून प्रतीकबरोबर त्याचा एक तिथला गोरा मित्रही आला होता. ‘जॉन’ त्याचं नाव. त्याला इंडियन लग्नसोहळा अगदी जवळून बघायचा होता. त्याने ते हिंदी पिक्चरमधून पाहिलेलं होतं. त्याबद्दल त्याला खूप उत्सुकता होती. त्यासाठी तो प्रतीकबरोबर आला होता. त्याचीही लग्नात मस्त धम्माल चालली होती. साखरपुडा, हळदी सारे सोहळे तो बारकाईने बघत होता व आपल्या कॅमेर्‍यात ते क्षण टिपून घेत होता. तोही सगळ्यांबरोबर हळद खेळला. हे सगळे करताना त्याला खूप आनंद होत असावा, कारण तो त्याच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. प्रतीकबरोबर तो एखाद्या करवल्यासारखी पाठराखण करत होता. प्रत्येक फोटोत तो त्याच्या बरोबरीने उभा होता. घरातल्या सगळ्यांशी खेळीमेळीने वागून जॉनने सगळ्यांची मने जिंकून घेतली. जणू तो त्या घरचाच एक भाग बनून गेला. सायलीच्या काही मैत्रिणी तर त्याच्यावर लाईन मारायच्या, आपलं इम्प्रेशन पाडायचा प्रयत्न करत होत्या. ‘आय लाईक धिस मॅरेज फंक्शन वेरी मच, आय इंजोय इट अ लॉट’ असं तो सारखं म्हणून दाखवत होता. रिसेप्शनच्या वेळी जॉनने सायली व प्रतीकबरोबर डान्सही केला. सगळ्यांनी त्याची तारीफ केली.

लग्नाचा समारंभ दणक्यात पार पडला. देवदर्शन, पूजा सारे यथासांग पार पडले. रजा नसल्याने परगावी, हनिमूनला जायचे मात्र जमले नाही. प्रतीकला लवकरच परत जावं लागलं. सायलीचा व्हिसा आला नव्हता. ती तिकडे जाऊन जॉब करणार होती, त्यामुळे तिचा व्हिसा नवर्‍याबरोबर जाणार्‍या डिपेंडट या कॅटेगरीतला नव्हता. तिच्या कंपनीने कॉललेटर पाठवायलाच उशीर केला त्यामुळे तिचं अमेरिकेला जाणं थोडं लांबणीवर पडलं होते.

नंतर महिन्याभरात तीही अमेरिकेला गेली. प्रतीक फोन, वॉटसअप चॅटिंग इत्यादीमुळे संपर्कात होताच. पण त्यातून त्याला सायलीबद्दल फारसा विरह, ओढ वाटते असे वाटत नव्हते. नवीन नवीन लग्नानंतरची नवथर भावना मनातून उन्मीलित व्हायला हवी होती तशी कुठे दिसत नव्हती. असुदे, तिकडे गेल्यावर सहवासाने प्रेम वाटू लागेल अशी सायलीने स्वत:च्या मनाची समजूत घातली. हनिमूनला जायला मिळाले नाहीच पण पहिल्या रात्रीची ओढही त्याच्या वागण्यातून दिसत नव्हती. ती अमेरिकेत पोचली तेव्हा तो गाडी घेऊन तिला घ्यायला आला होता. त्याने तिला पाहून मिठी मारली. म्हणजे अमेरिकन स्टाईलने ‘हग’ केले. पण त्या मिठीत ती अधीरता नव्हती, जी पती-मीलनात तिला अपेक्षित होती.

घर त्याने छान सजवले होते. घराबाहेर बागबगीचा, झाडे होती. तिला ते पाहता क्षणी सारे आवडले. घरातले रोजचे रुटीन सुरू झाले. तिला घरात काय हवं नको ते त्याने आणून दिले, तिला आधी तिथे तिथले ड्रायव्हिंग शिकावे लागले. ती त्याच्या गाडीवर प्रॅक्टीस करत होती. त्याने तिच्यासाठीही गाडी घेतली. प्रोब्लेम एवढाच होता की तो रात्र रात्र स्वतःला कामात गुंतवून घेत होता. कधीकधी कंपनीतून फोन आला म्हणून अचानक रात्री गायब होत होता. तो आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न का करतोय हे मात्र सायलीला समजत नव्हते.

दरम्यान, तिचाही जॉब रेग्युलर सुरू झाल्याने तीही कामात व्यस्त झाली. हल्ली प्रतीकबरोबर वरचेवर जॉन घरी येऊ लागला होता. त्याचं वारंवार घरी येणं तिला आवडत नव्हतं. अजून त्यांच्याच संसाराची घडी नीट बसली नव्हती.
एकदा ती ऑफिसचे पेपर घरी विसरले ते घ्यायला अचानक मध्येच घरी आली. तिच्याकडे घराची चावी असल्याने सरळ दरवाजा उघडून ती बेडरूममध्ये गेली. तिच्या बेडरूममध्ये प्रतीक आणि जॉन नको त्या अवस्थेत एकत्र असल्याचे तिने पाहिले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रतीकलाही कळून चुकले की सायलीला आता सगळे सांगून टाकले पाहिजे. त्याने सायलीकडे तो ‘गे’ असल्याची कबुली दिली. झालेल्या प्रतारणेने तिच्या अंगाची लाहीलाही होत होती. हे सगळं असं होतं तर तू माझ्याशी लग्न का केलंस? मला का फसवलंस? त्याचं उत्तर होतं मी आईबाबांना ही गोष्ट सांगू शकत नव्हतो, आणि आपल्या देशात अजून तरी अशा गोष्टी समजण्यापलीकडच्या आहेत त्यामुळे माझा नाईलाज झाला होता. त्यांच्या सुखासाठी मी मुकाट्याने लग्न केलं. त्यांनी एकसारखा माझ्या मागे लकडा लावला होता लग्न कर म्हणून मग मी नाईलाजाने मनाविरुद्ध तुझ्याशी लग्न केलं, पण आता खरं सांगायचं तर मला तुझ्यात काडीइतकाही इंटरेस्ट नाही. ही गोष्ट आपल्या दोघांतच ठेवून आपण असेच राहू शकतो.

आता तिचा राग अनावर झाला होता. ‘‘माझ्यात काय कमी आहे?’’ तिचा स्वाभिमान दुखवणारी भावना तिच्या मनातून उफाळून आली होती. ‘‘तुझ्यात काही कमी नाही, पण मलाच त्या संबंधात मजा येत नाही. तुझे शरीर जवळ नकोसे वाटते. तुझा दोष नाही. मला देवाने असे बनवलेय तर मी तरी काय करू?’’
‘मी कुठल्या अपराधाची शिक्षा भोगतेय ही?’ हा स्वत:च्या मनालाच प्रश्न विचारत सायली सुन्नपणे बसून राहिली. या अशा विषयावर ती कुणाशी उघडपणे बोलूही शकत नव्हती. ना आई-वडिलांशी, ना सासू-सासर्‍यांशी! कारण त्यांचा एकतर अशा गोष्टींवर विश्वासच बसला नसता आणि नात्यागोत्यात, समाजात सर्वांची छी थू व्हायला वेळ लागला नसता. आपल्या नशिबाचे भोग आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. घरून वरचेवर फोन येत होते. आपली लेक सुखात आहे हे त्यांना तिला फोनवर बोलून पटवून द्यावं लागत होतं. आता तर काही गुड न्यूज आहे का अशी विचारणाही व्हायला लागली होती. ती काहीतरी सबब सांगून टाळाटाळ करत होती. सध्या आमचे प्लॅनिंग आहे, तोवर काही विचारू नका म्हणून ती सांगत होती.
अशा दुर्धर परिस्थितीतून वाट काढायचा मार्ग ती शोधू लागली. इंटरनेटवर, पुस्तकातून माहिती काढायचा प्रयत्न करू लागली.

सुरुवाती सुरुवातीस त्याचे वागणे अनैसर्गिक आहे, त्याचा त्याला लवकरच कंटाळा येईल अशी स्वत:ची समजूत घालून ती प्रयत्न करत राहिली. एकदोनदा त्याला डॉक्टरची अपॉइन्टमेंटही घ्यायला लावली. पण परिस्थिती सुधारण्याऐवजी जास्तच बिघडत गेली. मग हळूहळू ती मनाने खंबीर होत गेली. सूड म्हणून तिने प्रतीकला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याच्या पगाराचा बराचसा हिस्सा ती स्वतःच्या नावे इंडियात पाठवू लागली. पैसे द्यायला उशीर झाला तर तुझ्या घरी आईबाबांना सांगेन म्हणून सज्जड दम देई. प्रतीकला तिचे सर्व म्हणणे ऐकून त्याप्रमाणे वागावे लागत होते. तिच्या सौंदर्याचा, तिच्या स्त्रीत्वाचाच त्याने घोर अपमान केला होता. ‘अरे मी काय चिध्यांची बाहुली आहे काय?’ मग तिने डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट ट्यूब बेबीचा विचार मनात पक्का केला. लवकरच त्याची प्रोसिजर सुरू करून ती प्रेग्नंट राहिली. सासू-सासर्‍यांना, सर्व नातलगांना, माहेरी-सासरी सगळ्यांना ही गोड बातमी तिने दिली. त्यांनी प्रतीकचे आणि तिचे अभिनंदन केले. त्याला काही बोलायला तोंडच उरले नव्हते. आधी तिने कोंडमारा सहन केला होता; आता भारतीय पुरुषी प्रवृत्ती आणि तिथली परिस्थिती यात होणारा कोंडमारा तो सहन करू लागला. सासरी-माहेरी, दोन्हीकडे उत्सवाचं वातावरण तयार झालं होतं. ती बाळंतपणासाठी घरी आईकडे येणार होती. तिच्याकडे आता पुरेसे पैसेही जमा झाले होते आणि आईपण मिरवण्यासाठी बाळही होतं. या दोन्हीच्या आधारे तिने परत कधीही नवर्‍याकडे अमेरिकेला जायचं नाही हे ठरवून टाकलं. भारतीय स्त्रीचे संस्कारी मन आणि परदेशात निर्माण झालेले तंत्रज्ञान याच्या संयोगाने आलेल्या संकटातून तिने मार्ग काढला होता. सासरची लाज तिच्या हाती होती अन् त्यांच्या वंशासाठीचा दिवा तिच्या पदरात होता.