गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षातर्फे म्हादई जनजागृती अभियानाच्या पहिल्या टप्प्यात उत्तर गोव्यात तालुका पातळीवर निदर्शने केली जाणार आहेत. आज शुक्रवार दि. १ नोव्हेंबर २०१९ पासून पेडणे तालुक्यातून म्हादई जनजागृतीसाठी निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
म्हादई जनजागृती अभियानाच्या पहिल्या टप्प्यात उत्तर गोव्यात तालुका पातळीवर निदर्शने करून संबंधित उपजिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले जाणार आहे. ५ नोव्हेंबरला वाळपई, ६ नोव्हेंबरला डिचोली, ८ नोव्हेंबरला बार्देश आणि १२ नोव्हेंबरला तिसवाडी तालुक्यात निदर्शने केली जाणार आहेत. त्यानंतर दक्षिण गोव्यात म्हादई जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. म्हादई जनजागृती अभियानाच्या दुसर्या टप्प्यात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने कर्नाटकातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकीवर लक्ष ठेवून कळसा भांडुरा प्रकल्पाला मान्यता देणारे पत्र दिले आहे. कनार्टक सरकारला पत्र देताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विश्वासात घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी केला.
म्हादई प्रश्नी न्यायालयाने निवाडा दिलेला नाही. म्हादई पाणी वाटप प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कर्नाटकाला प्रकल्प सुरू करण्यासाठी पर्यावरण दाखला देणे चुकीचे आहे. या पर्यावरण दाखल्यामुळे म्हादईचे अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. राज्य सरकारकडून म्हादईसाठी न्यायालयात खटला चालविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. म्हादई बचाव अभियानाची न्यायालयात याचिका आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष जनतेच्या न्यायालयात म्हादईचे प्रकरण नेऊन जनजागृती करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हादईप्रकरणी कणखर भूमिका घ्यावी, अशी मागणीही चोडणकर यांनी यावेळी केली.