मंत्रिमंडळतील आपले सहकारी मिलिंद नाईक यांना नाफ्ता जहाज प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लिन चिट’ दिल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविषयीही संशयाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल प्रसिद्धीस दिलेल्या आपल्या पत्रकात म्हटले आहे.
नाफ्तावाहू जहाजाच्याबाबतीत सारवासारव करण्याचा प्रयत्न करणार्या मुख्यमंत्र्यांनी सदर जहाज दुरुस्तीची वा नाफ्ता जहाजातून काढून घेण्याची कोणतीही सुविधा मुरगांव बंदरात नसताना एमपीटीने ते जहाज आत येण्यास कशी परवानगी दिली. तसेच १५ जुलैपासून सदर जहाज मुरगांव बंदरात का ठेवले होते याचे स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.
चोडणकर यांनी ट्विट केले असून त्यात यापूर्वी कॉंग्रेस पक्षाने भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणलेल्या आपल्या इतर मंत्र्यांबाबतीत मुख्यमंत्र्यांनी का तत्परता दाखवली नाही, असा सवालही केला आहे.
बाबू आजगांवकर यांच्यावर कॉंग्रेस पक्षाने भ्रष्टाचाराचे कित्येक आरोप केले होते. पण त्यावेळी सावंत यांनी एकदाही त्यांची बाजू घेतली नव्हती, असे चोडणकर यानी म्हटले आहे. हा १५ कोटींचा घोटाळा असल्याचा दावाही चोडणकर यांनी केला आहे.