पुर्वकर्म विचार

0
295
  • वैदू भरत म. नाईक
    (कोलगाव)

ज्याप्रमाणे एखाद्या पातेल्यात ठेवलेला मंद आचेवरील भात त्या अग्नीच्या ज्वाला न दिसता शिजला जातो तसाच हा आम पाचिन होतो किंवा अजीर्णामध्ये केवळ गरम पाणी प्यायल्यामुळे अपक्च अन्नाचे पाचन होते.

पंचकर्म उपचार करण्यापूर्वी शरीराची पूर्वतयारी करावी लागते. सुश्रुत टीकाकार उल्हण यांनी या पूर्वकर्मांचे अचूक वर्णन केले आहे. ज्या व्यक्तीला पंचकर्म उपचार करावयाचे आहेत त्याची शारीरिक तयारी करण्यासाठी जी कर्मे केली जातात त्यांना पूर्वकर्मे असे म्हणतात. ही पूर्वकर्मे तीन आहेत
पाचन, स्नेहन, स्वेदन

पाचन ः-
हे पंचकर्म चिकित्सा करण्यापूर्वीचे प्रथम पूर्वकर्म आहे. बर्‍याच आयुर्वेदीय अभ्यासकांच्या मनामध्ये केवळ स्नेहन व स्वेदन ही दोनच पूर्वकर्मे आहेत अशी धारणा असते. मात्र या दोहोंंच्याही आधी पाचन कर्म करणे महत्वाचे आहे. इतरही काही पूर्वकर्मे त्या त्या कर्मांचे पूर्वी करावी लागतात. मात्र पाचन हे मुख्य पुर्वकर्म आहे.
जेव्हा पंचकर्म करण्यापूर्वी स्नेहपान केले जाते तेव्हा त्या व्यक्तीचा अग्नी प्रदीप्त असणे आवश्यक असते. कारण स्नेहपानाची ती मात्रा त्या व्यक्तीला प्रथम पचली पाहीजे. तरच अपेक्षित स्नेहनाचे कार्य होणार असते. जर एखाद्या व्यक्तीचे पचन पर्याप्त नसते, तसेच आमलक्षणे असतील तर स्नेहपानामुळे व्यापद् निर्माण होण्याची शक्यता असते.
आशुकारी अवस्थेमध्ये जेव्हा सर्व व्याधीलक्षणे उत्कटावस्थेत असतील व प्रकर्षाने दिसत असतील तेव्हा लगेचच शोधन न करता दीपन, पाचन औषधे किंवा दीपन व पाचन या क्रियांमधील सुक्ष्म फरक आपण समजून घेतला पाहिजे.

दीपन ः-
जे औषधी द्रव्य आमाचे साक्षात पाचन करीत नाही. परंतू अग्नी प्रदीप्त करते त्यास दीपन असे म्हणतात. दीपन द्रव्यांमुळे भुक लागते. जठरातील स्राव वाढतात. या द्रव्यांमध्ये अग्नि, वायु व पृथ्वी या महाभूतांचे अधिक्य असते. उदा. मिश्रेया, चित्रक, हिंग, मरीच, जीरक, अजवायन, आर्द्रक, मधु, तक्र व क्षार.

पाचन ः-
जे औषधी द्रव्य अठराग्निला प्रदीप्त न करता अन्न व आमाचे पाचन करते त्यास पाचन द्रव्य असे म्हणतात.
अग्निस्थानामध्ये विद्यमान असलेल्या पाचक स्रावांमध्ये वाढ करीत नाहीत. उदा. नागकेशर, अग्नि मंद झाल्यामुळे आमाची निर्मिती होते. पाचनद्रव्यांमध्ये अग्नि व वायु महाभुतांचे अधिक्य असते.
ज्याचा अग्नि मंद आहे. कोष्ठाक्रूर आहे त्याला क्षार व लवण मिश्रित्र घृतपान करुन अग्निदीपन करवावे व त्यानंतर स्नेह व स्वेदन करुन विरेचन द्यावे… असे सुश्रुताचार्यांनी सांगितले आहे.
जेव्हा सर्व शरीरामध्ये आमदोषसंचिती असते तेव्हा वमन विरेचनादि पंचकर्मांनी दोषांचे निर्हरण करताना शरीर धातुंना हानी पोहोचण्याचा अधिक संभव असतो. एखाद्या कच्च्या फळाचा रस काढताना जसे ते फळ नष्ट होण्याचा संभव असतो तसेच काहीसे हे आहे.

म्हणून वातादि साम दोष जेव्हा धातूमध्ये लीन होऊन त्यामध्ये संसृष्ट झालेले असतात तेव्हा त्यांना पाचन करुन जर बाहेर काढले नाही तर संबंधित आशय वा धातुंची हानी होते. परंत या क्रियेमध्ये दोष पूर्णपणे बाहेर येत नाहीत. यासाठी पाचन-दीपन प्रकारचे स्नेह वापरले जातात. आणि त्यानंतर स्वेदनकरुन त्यांना बाहेर काढावे लागते. म्हणून साम व सर्व शरीरामध्ये प्रसृत दोष प्रथम पाचन, दीपन, स्नेहन व स्वेदन करुन शरीर घटकापासून सुटे करुन नंतर शोधन कर्म केले जाते.
स्नेहन स्वेदनाप्रमाणेच पाचन हे महत्त्वाचे व आध पूर्व कर्म आहे; याचा वैद्यांना विसर पडू नये.

पाचनामुळे सामान्यतः अग्नि वाढतो असा तर्क करता येतो. पण तरीही अशी शंका मनात येते की, अग्निदीपन न करता पाचन द्रव्ये शरीरस्थ आमाचे पाचन कशी काय करतात?
ज्याप्रमाणे एखाद्या पातेल्यात ठेवलेला मंद आचेवरील भात त्या अग्नीच्या ज्वाला न दिसता शिजला जातो तसाच हा आम पाचिन होतो किंवा अजीर्णामध्ये केवळ गरम पाणी प्यायल्यामुळे अपक्च अन्नाचे पाचन होते. पण गरम पाण्याने पाचक स्राव वाढत नाहीत.

सुंठ, धने, पिंपळीमुळ, लवांगु, मरिच, नागरमोथा, रास्ना, देवदार, ही काही पाचक द्रव्यांची उदाहरणे आहे. पाचन हे पूर्वकर्म असल्याने वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण या पाचही मुख्य पंचकर्मांपूर्वी हे कर्म केले पाहिजे. पाचन हे घृतासह केले तर श्रेयस्कर ठरते. कारण उचित मात्रेमध्ये घृतपान केल्यास ते अग्निवर्धक, पाचन व अनुलोमक ठरते. बरीच द्रव्ये दीपन न करता पाचन करते. तसेच कुटकी, हरिद्रा, लिंबू, दारुहळद, मोठी इलायची, इंद्रजव अतिविषा, क्वाथ, भारंगी ही पाचन द्रव्ये आहेत.

व्यावहारिक दीपन पाचन कल्प ः-
बहुतेक वेळा त्रिक टू चूर्ण ३ ते ५ ग्रॅम सकाळी व सायंकाळी असे तीन दिवस दिल्याने रुग्ण आमरहित होते हा सामान्य कल्प आहे.
चूर्णे – पंचकोल चुर्ण, लवणभास्कर चूर्ण, शिवाक्षारपाचन चूर्ण, हिंग्वादक वडवानल, तक्र, चित्रकादी चुर्ण १-३ ग्रॅम हे चुर्णकल्प, उष्णोदक, धान्यक फांट, धान्यक जीरक जल या अनुपानासोबत घ्यावेत.
वटी – शंखवटी, लसुनादीवटी, आमपाचक वटी, अग्नितुंडीवटी, विषतिदुंक वटी इत्यादी.
क्वाथ – पिप्पल्यादि क्वाथ, धान्यनागर क्वाथ, धान्यपंचक क्वाथ इ.
घृत – क्षार घृत, पिप्पल्सादिघृत, षट्‌पल घृत, द्राक्षादि घृत, २० ते २५ मिली उष्णोदक.
आसवारिष्ट – पंचकोलासव, पिप्पल्यासव, चविकासव, द्राक्षासव,जीरकाधारिष्ट, कुमार्यासव.