>> आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर
आयसीसी क्रमवारीत तिन्ही प्रकारात ‘टॉप १०’मध्ये स्थान मिळविणारा रोहित शर्मा हा भारताचा तिसरा खेळाडू बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ‘कसोटी सलामीवीर’ या नव्या भूमिकेत शानदार कामगिरीच्या बळावर त्याने कसोटी क्रमवारीत ‘अव्वल दहांत’ स्थान प्राप्त केले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व निवृत्त सलामीवीर गौतम गंभीर यांनी यापूर्वी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘टॉप १०’मध्ये प्रवेश करण्याचा कारनामा केला आहे. रांची कसोटीतील २१२ धावांच्या बळावर रोहितने १२ स्थानांची उडी घेत दहाव्या स्थानावर हक्क सांगितला आहे. रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसर्या (फेब्रुवारी २०१८) व टी-ट्वेंटीत सातव्या (नोव्हेंबर २०१८) स्थानापर्यंत पोहोचला होता. रांची कसोटीत ११२ धावांची खेळी साकारलेला टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचव्या स्थानाची बरोबरी केली आहे.
यापूर्वी नोव्हेंबर २०१६ मध्ये रहाणेने पाचवे स्थान प्राप्त केले होते. कोहली व पुजारानंतर तो कसोटी क्रमवारीतील तिसरा सर्वोत्तम भारतीय आहे. मयंक अगरवाल १८व्या स्थानावर असून यामुळे ‘टॉप २०’मधील भारतीय खेळाडूंची संख्या पाच झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहित ४४व्या स्थानावर होता. मालिकेतील ५२९ धावांच्या बळावर त्याने मोठी उडी घेतली. कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वलस्थान भूषविले आहे. गंभीरने कसोटी व टी-ट्वेंटी प्रथम स्थानापर्यंत मजल मारली होती तर वनडेत आठव्या स्थानापर्यंत तो पोहोचला होता. गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक गुण मिळविले आहे. शमीच्या खात्यात ७५१ तर यादवच्या खात्यात ६२४ गुण जमा आहेत. रांची कसोटीतील ३७ व २७ धावा केलेल्या जॉर्ज लिंड याने फलंदाजीत १०४वे तर गोलंदाजीत ४ बळींच्या जोरावर ९९वे स्थान मिळविले आहे.