एक्झिट पोलचा कौल

0
192

महाराष्ट्र आणि हरियाणातील मतदान आटोपताच पाठोपाठ विविध दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वर्तमानपत्रांमधून मतदानोत्तर पाहण्यांचे म्हणजेच एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाले. या सर्व मतदानोत्तर पाहण्यांनी काढलेला निष्कर्ष एकच आहे, तो म्हणजे या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षच बाजी मारतील. गेल्या लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाची चमकदार कामगिरी लक्षात घेता या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला अनुकूलता आहे असा सर्वसाधारण समज व्यक्त होत होताच, त्याला या मतदानोत्तर पाहण्यांनी आकडेवारीनिशी दुजोरा दिलेला आहे. अर्थात, प्रत्यक्ष निकाल आता हाकेच्या अंतरावर आहेत, परंतु तरीही या मतदानोत्तर पाहण्यांनी वर्तवलेल्या अंदाजांचे विश्लेषण करणे अप्रस्तुत ठरू नये. या सर्व मतदानोत्तर पाहण्यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही राज्ये भाजपा सर करील. महाराष्ट्रात भाजप शिवसेना महायुतीला विविध पाहण्यांमध्ये कमीत कमी १६६ पासून जास्तीत जास्त २४४ पर्यंत जागा मिळतील असा अंदाज व्यक्त झालेला आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबतीत हेच प्रमाण ३९ पासून ९० पर्यंत आणि इतरांच्या बाबतीत हे प्रमाण ५ पासून ३४ पर्यंत वर्तवले गेले आहे. म्हणजे सर्वाधिक जागा भाजप व मित्रपक्षांच्या पारड्यातच पडणार आहेत असेच या पाहण्यांना म्हणायचे आहे. हरयाणामध्ये तर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज बहुतेक सर्वच्या सर्व पाहण्यांतून व्यक्त झाला आहे. तेथे भाजपला ९० जागांच्या विधानसभेत ७० ते ८० जागा मिळतील असे या पाहण्या म्हणत आहेत. म्हणजेच हरियाणात कॉंग्रेसची धूळधाण उडेल असा या पाहण्यांचा निष्कर्ष आहे. कॉंग्रेसला जेमतेम आठ ते दहा जागाच मिळू शकतात असे त्यांना वाटते. आधीच घसरणीला लागलेल्या कॉंग्रेसला हा आणखी एक धक्का ठरेल. इतर पक्षांना तेथे एक ते आठ जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचा अधिक बारकाईने विचार केला तर असे दिसते की भाजपा शिवसेना महायुतीला तिचा बालेकिल्ला राहिलेल्या मुंबई, कोकण, विदर्भ यामध्ये तर भरघोस यश मिळेलच, परंतु एकेकाळी कॉंग्रेस – राष्ट्रवादीचा प्रभाव राहिलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीला महाआघाडीपेक्षा दुप्पट जागांचा अंदाज या पाहण्यांत वर्तवला गेलेला आहे. त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात काहीशा समसमान जागांचा अंदाजही या पाहण्या वर्तवतात. भाजप – सेना महायुतीच महाराष्ट्र सर करणार याविषयी मात्र कोणाचेही दुमत दिसत नाही. आता प्रश्न एवढाच उरतो की यामध्ये मोठ्या भावाची भूमिका कोण वठवणार? मतदानोत्तर पाहण्यांचे निष्कर्ष तपासले तर असे दिसते की भाजपाच्या जागा शिवसेनेपेक्षा कितीतरी अधिक असतील. शिवसेनेने गेल्या वेळी भाजप सरकारच्या वाटेत वारंवार काटे पेरले त्याचे उट्टे काढण्याची संधी यावेळी भाजपला मिळू शकते. शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या रुपाने आपला मोहरा रणांगणात यावेळी उतरवलेला आहे. उद्या सरकार स्थापनेमध्येही त्याला महत्त्वाची भूमिका देण्यास भाजपला भाग पाडण्याचा सेनेचा इरादाही लपून राहिलेला नाही. परंतु भाजपाचे जागांचे गणित जर शिवसेनेहून भक्कम बनले तर शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावरील दावा आपसूक बाजूला पडेल. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्ष सातत्याने आपली ताकद वाढवत चालला आहे. गेल्या निवडणुकीनंतर तर जे काही नेत्यांच्या इनकमिंगचे आणि नेत्यांची मुले ‘पळवण्याचे’ सत्र भाजपाने महाराष्ट्रात चालवले, त्यातून ज्या भागांमध्ये भाजपाची ताकद नव्हती, तेथे देखील आता पक्षाच्या चिन्हाची ओळख निर्माण होऊ शकलेली आहे. किंबहुना इनकमिंगचे जे काही सत्र चालवले गेले ते त्यासाठीच होते. मोठमोठी तालेवार घराणी भाजपात डेरेदाखल झालेली आहेत. त्यांच्या सोबत त्यांची एकगठ्ठा मतपेढीही आयती भाजपाला मिळालेली आहे. याचा फायदा अर्थातच मिळण्याची चिन्हे आहेत. यातून आपला पक्षविस्तार करण्याचे काम भाजपा जोमाने सुरू ठेवील हे तर स्पष्टच आहे. राज्याराज्यात भाजपची तीच रणनीती राहिलेली आहे. शिवसेनेलाही याची जाणीव आहे. आपला आणि भाजपचा पारंपरिक मतदार एकच आहे आणि भाजपाशी उघड टक्कर घेणे आत्मनाशास कारणीभूत ठरेल याची पूर्ण जाणीव सेनेला आहे. त्यामुळे कितीही तणातणी झाली तरी शेवटी शेपूट घालून सेना भाजपाच्या साथीला जात असते. या निवडणुकीतही तेच झाले. कॉंग्रेस – राष्ट्रवादीने या निवडणुकीत अर्थव्यवस्थेची दुरवस्था, रोजगार, महागाई वगैरे वगैरे मुद्दे लावून धरले होते, परंतु मतदारांनी त्यापेक्षा अधिक प्राधान्य राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, पाकिस्तानविरोधी कणखर नीती आदी विषयांना दिल्याचे या मतदानोत्तर पाहण्यांचा कौल खरा मानला तर दिसून येते. कॉंग्रेसला त्यामुळे आपली त्याबाबतची नकारात्मक भूमिका तपासावी लागेल. निवडणूक निकाल जर पाहण्यांबरहुकूम आले तर भाजपाचा राजकीय वरचष्मा अधिक वाढेल. मात्र, विरोधक अधिकाधिक दुबळे होत जाणार असतील तर ती मात्र चिंतेची बाब असेल!