>> मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सोनसडाप्रश्नी उच्चाधिकार समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय
मडगावातील गंभीर बनलेली कचरा विल्हेवाटीची समस्या सोडविण्यासाठी तात्काळ दोन लहान बायो प्रक्रिया कचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सोनसडा कचरा विल्हेवाटीच्या प्रश्नावर न्यायालयाबाहेर सामंजस्याने तोडगा काढण्याची तयारी आहे. सरकारची फोंमेतो ग्रीन कंपनीला वास्तविक खर्च देण्याची तयारी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्च स्तरीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
सोनसडा येथील कचरा विल्हेवाटीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समन्वय समितीची बैठक पर्वरी येथील मंत्रालयातील सभागृहात मंगळवारी घेण्यात आली. या बैठकीला कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, मुख्य सचिव परिमल राय, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय, मडगावच्या नगराध्यक्ष बबिता आंगले प्रभुदेसाई, मडगावचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव आणि कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकार्यांना लहान कचरा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. मडगावातील कचरा विल्हेवाटीची समस्य सोडविण्यासाठी तात्काळ दोन लहान बायो कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंदाजे प्रत्येकी ५०० चौरस मीटर जागेत कचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत. या दोन्ही ठिकाणी दररोजच्या ओल्या कचर्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. मडगावातील सुका कचरा ठेवण्यासाठी आयडीसीला तात्पुरती जागा उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. नागरिकांनी कचरा वेगवेगळा ठेवावा. सर्व प्रकारचा कचरा एकत्र करू नये. नगरपालिका क्षेत्राच्या आसपासच्या पंचायत क्षेत्रातील कचरा कचरा व्यवस्थापन महामंडळाला गोळा करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पालिका-फोमेंतो ग्रीन
वाद सोडवण्यास प्राधान्य
कचरा विल्हेवाट प्रश्न सोडविण्यासाठी मडगाव नगरपालिका आणि फोंमेंतो ग्रीन यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. फोंमेतो कंपनीने कचरा विल्हेवाटीपोटी सुमारे १२ कोटी रुपयांचे बिल सादर केलेले आहे. फोंमेतो कंपनीला वास्तविक खर्च अंदाजे ५ ते ६ कोटी रुपये देण्याची तयारी आहे.
फोंमेतो कंपनीच्या अध्यक्षांशी या विषयावर चर्चा केली जाणार असून मडगाव शहरातील नागरिकांच्या हितार्थ फोंमेतो कंपनीने कचरा प्रकल्पातून माघार घेण्याची विनंती केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
साळगाव, बायंगिणीबाबत
संबंधित आमदारांशी चर्चा
साळगाव येथील कचरा प्रकल्पाचा विस्तार आणि बांयगिणी येथील कचरा प्रकल्पाबाबत येत्या १० दिवसात तोडगा काढला जाणार आहे. बायंगिणी येथील कचर्याबाबत पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात, कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांच्याशी चर्चा केली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दोन महिन्यात मडगावात पर्यायी प्रक्रिया प्रकल्प
मडगाव शहरात येत्या दीड ते दोन महिन्यात पर्यायी कचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मडगावातील कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. मडगाव नगरपालिका क्षेत्रात ३० ते ४० ठिकाणी उघड्यावर ओला आणि सुका कचरा टाकला जातो. वाराणशी, नवी दिल्ली येथे कार्यान्वित असलेल्या बायो मॅकनाईझ कचरा प्रक्रिया प्रकल्पासारखे ३ प्रकल्प मडगाव शहरात बसविण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मडगावातील कचरा विल्हेवाटीमध्ये शिस्त आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. उघड्यावर कचरा टाकणार्यावर दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र करण्याची गरज आहे. उघड्यावर कचरा टाकणार्यांना दंड ठोठावण्याची गरज आहे, असेही लोबो यांनी सांगितले.
सोनसडा येथील सुमारे १५ हजार क्युबिक मीटर कचरा वर्ष २०१७ मध्ये उचलण्यात आला आहे. त्याच धर्तीवर सोनसडा येथील कचर्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली जाणार आहे. सोनसडा येथील जुना कचरा प्रथम हाताळला जाणार आहे. मडगावातील साफसफाईसाठी मिशन सोनसडा मोहीम हाती घेतली जाणार आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.