>> पणजीत आत्तापर्यंत १४६८ संशयित रुग्ण
राजधानी पणजी शहराबरोबरच पर्वरी, म्हापसा, वास्को, मडगाव, फोंडा आदी प्रमुख शहरांबरोबरच राज्यातील विविध भागांत डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला आहे. तो आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसल्याने आरोग्य खात्याची झोप उडाली आहे.
आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी पणजीत चालू वर्षी सप्टेंबर महिन्यांपर्यंत डेंग्यूचे १४६८ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी २०७ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित डेंग्यू रुग्णांचा आकडा वाढतच चाललेला असून डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य संचालनालय सर्व ते प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, पर्वरी मतदारसंघात चालू महिन्यात डेंग्यूची लागण झालेले ८ रुग्ण सापडले असल्याचे आमदार व माजी मंत्री रोहन खंवटे यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आपण या प्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना पत्र लिहून त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले असल्याचे ते म्हणाले.
मडगावात २०० रुग्ण
मडगाव शहरात चालू महिन्यात आत्तापर्यंत डेंग्यूचे २०० रुग्ण आढळले असल्याची माहिती मडगाव आरोग्य केंद्रातील आरोग्याधिकारी डॉ. अंजू खरंगटे यांनी दिली.
सध्या मडगावात रोज डेंग्यूचे सुमारे २५ ते ३० संशयित रुग्ण आढळू लागले असल्याचे डॉ. खरंगटे यांनी सांगितले. जुलै महिन्याच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यापर्यंत मडगांव शहरात डेंग्यू रुग्णांचा आकडा बराच वाढला होता. तर सध्या डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडा रोज २५ ते ३० च्या आसपास असल्याचे त्या म्हणाल्या. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करीत असून लोकांमध्येही जागृती निर्माण केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, लोकांच्या घरातील झाडांच्या कुंड्यांतील स्वच्छ पाण्यात डेंग्यूचा फैलाव करणारे डास अंडी घालत असल्याचे आढळून आले होते. लोकांनी या कुंड्यातील पाणी रोज बदलावे असे त्यांना त्यानंतर सांगण्यात आल्याचे आरोग्य खात्यातील आणखी एका सूत्राने सांगितले.
डेंग्यूमुळे तिघांचे बळी
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी डेंग्यूमुळे राज्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झालेला असून त्यात एका माजी मंत्र्यांच्या भाच्याचाही समावेश आहे. मृतांपैकी एक जण हा वास्को शहरात राहणारा होता, असे सूत्रांनी सांगितले.
डेंग्यूसाठी वैद्यकीय अधिकार्यांना
रॅपिड टेस्टची मुभा ः आरोग्यमंत्री
आरोग्य खात्याच्या राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांना डेंग्यू तापाचे तात्काळ निदान करण्यासाठी आणीबाणीच्या प्रसंगी डेंग्यू जलद चाचणी किटचा (रॅपिड टेस्ट) वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यातील डेंग्यू तापाच्या फैलावाबाबत आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर यांच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
सांडपाणी सोडणार्यांना नोटीस
राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचनेनंतर राज्यातील नदी, नाल्यात सांडपाणी सोडणार्या सुमारे पाच हजार घरमालकांना नोटीस पाठवून सांडपाणी बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यातील डेंग्यूच्या फैलावाचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे. असेही मंत्री राणे यांनी सांगितले.