निवडणुकीच्या धामधुमीतील युती, महायुती आणि बंडाळी

0
107
  • शंभू भाऊ बांदेकर

विरोधकांची एकजूट किती भक्कम आहे, यावर जशी त्यांची सरशी अवलंबून आहे, त्याप्रमाणेच आपापल्या पक्षातील ‘विनॅबिलिटी’ असणार्‍या उमेदवारांनाच उमेदवारी कशी देता येईल, त्यांच्यातील बंडखोरीला कसा आळा घालता येईल आणि आपल्या पक्षाला लक्ष्य करू पाहणार्‍यांचे भक्ष्य कसे गिळंकृत करता येईल या सार्‍या गोष्टींवर उमेदवारांचे व पक्षांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि लगेच मग युती, महायुती आणि बंडखोरीला ऊत आल्याच्या बातम्या वाचनात येऊ लागल्या. हरियाणामध्ये तर सत्तारुढ भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसमध्ये बंडखोरीला ऊत आल्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांतील चिंता शिगेला पोहोचली आहे. आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली म्हणून दोन्ही पक्षांतील असंतुष्ट उमेदवारांनी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे बंडखोरीचा झेंडा फडकावणारे दोन्ही पक्षांतील उमेदवार हे सर्व दृष्टींनी तुल्यबळ समजले जातात. त्यामुळेच ‘जिंकू किंवा मरू’च्या या लढाईत आम्ही सपशेल धारातीर्थी तर पडणार नाहीत ना? या शंकेने दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते त्रस्त बनले आहेत.

राजकीय पक्षांतील सुंदोपसुंदी आपल्या गोव्यात काही नवखी नाही. २०१७ च्या गोव्यातील निवडणुकीनंतर विजय सरदेसाई यांनी कॉंग्रेसला बाजूला सारून भाजपसोबत सत्ता मिळविण्यात धन्यता मानली होती. त्यावेळी त्यांच्या ‘गोवा फॉरवर्ड’ मधील बुजूर्ग नेत्यांनाही त्यांची राजकीय खेळी आवडली नव्हती. तरीही भाजपशी एकनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ असलेल्या मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या कट्टर विरोधकांशी जुळवून घेत व झाले गेले गंगेला मिळाले म्हणत त्यांनी राज्यात भाजप आघाडी सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती व त्याची भरपाई करीत पर्रीकरांनी त्यांना महत्त्वाची खातीही बहाल केली होती. आज काय चित्र दिसते बरे? सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड बॅकफूटवर आला आहे. भाजपच्या नावाने आरडाओरड करणारा मगो पक्षही गोवा फॉरवर्डसारखा भाजपच्या नादी लागला होता. त्यानेही अल्पकाळ सत्ता भोगली आणि तोही सत्तेला वंचित झाला. आज भाजपची स्वतःच्या आमदारांची संख्या ४० पैकी २७ वर पोहोचलेली आहे. कॉंग्रेसचे एकगठ्ठा दहा उमेदवार भाजपवासी झाले, सत्तेत सामील झाले आणि गोव्यातील राजकारणात सख्खे मित्र पक्के विरोधक कसे बनतात आणि पक्के विरोधक कसे सख्खे मित्र बनतात हे ‘याचि देही, याचि डोळा’ बघता आले.

हे गोव्याचे चित्र डोळ्यांसमोर ठेवून हरियाणा व महाराष्ट्रामध्ये परिवर्तन, गैरवर्तन घडू शकणारच नाही. या दोन्ही राज्यांतील उमेदवार बंडखोरीच्या नावाखाली साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा मुकाबला करून गोव्याचा कित्ता गिरवणारच नाहीत, स्वकियांचा पत्ता काटणारच नाही, याची हमी कोण बरे देऊ शकणार?
आता आपण महाराष्ट्र राज्याचे उदाहरण घेऊया. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि त्यांनी युती नव्हे तर महायुती झाल्याची घोषणा मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. एका चाणाक्ष पत्रकाराने त्यांना प्रश्‍न केला,‘मग नुकतेच भाजपवासी झालेले निलेश राणे आणि शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत हे एकमेकांविरुद्ध कणकवली मतदारसंघातच उभे राहिले आहेत त्याचे काय?’ त्यावर श्री. उद्धव ठाकरे यांनी ‘आम्ही त्यावर तोडगा काढणार आहोत,’ असे सांगितले. हा लेख लिहून पूर्ण होईपर्यंत तरी तोडगा दृष्टिपथात नव्हता. फडणवीस तर म्हणाले,‘आम्ही आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणणार आहोत.’
काय गंमत आहे बघा. शिवसेना, कॉंग्रेस आदि पक्षांशी फारकत घेऊन नारायण राणे यांनी ‘स्वाभिमान पक्ष’ स्थापन केला. पण आपल्या वडिलांच्या ‘स्वाभिमाना’ला हात दाखवित (बहुधा वडिलांच्याच संमतीने) त्यांचे पुत्र निलेश भाजपमय झाले, तर नारायण राणेंच्या ‘स्वाभिमाना’शी स्वाभिमान व अभिमान बाळगून असलेले सतीश सावंत शिवसेनेत डेरेदाखल झाले.

आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसेना प्रमुखपदाच्या कारकिर्दीत ‘किंगमेकर’ बनून महाराष्ट्रात तर सत्ता काबीज केलीच, तर केंद्रातही आपले वर्चस्व निर्माण केले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र उद्धव म्हणा किंवा पुतणे राज ठाकरे म्हणा शिवसेना, मनसेच्या माध्यमातून जनतेसमोर आले. पण प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करण्यापासून ते दूरच राहिले. ते धैर्य किंवा शौर्य आदित्यने दाखवले आहे. आदित्य ठाकरेनी युती विधानसभा निवडणुकीत शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तब्बल तीन पिढ्या राजकारणात असलेल्या ठाकरे घराण्यातील निवडणूक लढणारे ते पहिले सदस्य ठरले आहेत.

गेल्या पाच-दहा वर्षांत आदित्य ठाकरे यांनी अनेक विषयांवर आपली, आपल्या आजोबांसारखी ठाम मते व्यक्त केली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना कार्यकर्ते (आणि भाजपचेही कार्यकर्ते) आदित्याय नमः म्हणून कामाला लागले आहेत. त्या जोरावरच फडणवीस यांनी आपले मत प्रदर्शित केले आहे. आता घोडामैदान जवळच आहे, याशिवाय आम्ही काय बरे सांगणार?
एक मात्र खरे की बंडखोरांना थोपविण्यासाठी भाजप काय, कॉंग्रेस काय, राष्ट्रवादी काय किंवा वंचित आघाडी काय, या सार्‍यांना आपले बळ पणाला लावून काम करावे लागणार आहे. अर्थात हे करताना पक्षनिष्ठा, उमेदवारांनी जिंकण्याची क्षमता आणि त्यांची एकंदरीत कार्यक्षमता या गोष्टींचाही सारासार विचार करावा लागणार आहे. या दृष्टीने पक्षश्रेष्ठींपुढे हे एक आव्हान आहे. त्या आव्हानाला उमेदवारांनी आवाहन करीत कुठला पक्ष बाजी मारतो हे पाहावे लागणार आहे.

नाही तरी निवडणुकीच्या प्रचाराला तशी सुरुवातही झाली आहे व आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात झाली आहे. उदाहरणादाखल मुंबईच्या प्रचारसभेत ठाणे येथे परवाच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी जो बॉम्बगोळा टाकला, त्याचे देता येईल. या सभेत वक्तव्य करताना मौर्य म्हणाले की, ‘पाकिस्तान सातत्याने अणुबॉम्बच्या धमक्या देत आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटन दाबले तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात आणि कलम ३७० ला विरोध करणार्‍यांवरही पडेल’ अशा वक्तव्यांचे परिणाम, दुष्परिणाम, सुपरिणाम आता लवकरच दिसू लागणार आहेत.

या सार्‍या पार्श्‍वभूमीवर विरोधकांची एकजूट किती भक्कम आहे, यावर जशी त्यांची सरशी अवलंबून आहे, त्याप्रमाणेच आपापल्या पक्षातील ‘विनॅबिलिटी’ असणार्‍या उमेदवारांनाच उमेदवारी कशी देता येईल, त्यांच्यातील बंडखोरीला कसा आळा घालता येईल आणि आपल्या पक्षाला लक्ष्य करू पाहणार्‍यांचे भक्ष्य कसे गिळंकृत करता येईल या सार्‍या गोष्टींवर उमेदवारांचे व पक्षांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
सध्या सत्ताधारी विरोधकांना सूडबुद्धीने वागवत आहेत, सत्ताधारी महागाई रोखण्यास व बेरोजगारी कमी करण्यास अयशस्वी ठरले आहेत या मुद्द्यांवर विरोधकांनी जोर धरला आहे, तर आम्ही कसा विकास साधला आहे हे सांगण्यात सत्ताधारी गर्क आहेत. यातून होऊ घातलेली, होत असलेली तथाकथित युती, महायुती आणि बंडाळी या त्रयींवर निवडणुकीतील यशापयश अवलंबून राहील असे चित्र दिसत आहे.