९ ऑगस्टनंतरच्या नोकर भरतीच्या जाहिराती रद्द ः सरकारचे परिपत्रक

0
120

राज्य सरकारने सरकारी खात्यातील क गटातील नोकर भरती गोवा राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून करण्याबाबत परिपत्रक काल जारी केले असून सरकारच्या विविध खात्याच्या ९ ऑगस्ट २०१९ नंतरच्या नोकरभरतीच्या जाहिराती मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने क गटातील नोकर भरतीसाठी गोवा राज्य कर्मचारी भरती आयोग स्थापन करण्याबाबत विधेयक मंजूर केले. राज्यपालांनी या विधेयकाला मान्यता दिली आहे. या नवीन भरती आयोगामुळे राज्यातील विविध खात्यातील नोकर भरतीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला होता.

मुख्यमंत्र्यांनी एका सूचनेद्वारे नोकर भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध करणार्‍या खात्याने नोकर भरतीसाठी कार्मिक खात्याकडून मान्यता घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नोकर भरतीचा प्रश्‍न बराच गाजला. या नोकर भरतीबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत योग्य निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नवीन नोकर भरती आयोग स्थापनेचा कायदा १८ सप्टेंबर २०१९ पासून लागू होत आहे. सर्व खात्यांनी क वर्गातील नोकर भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध करू नये. सदर नोकर भरती आयोगाच्या माध्यमातून क गटातील नोकर करण्यात यावी, असे परिपत्रकात म्हटले.

राज्य सरकारने नवीन नोकर भरती आयोगाची स्थापना केली. परंतु, महिना उलटला तरी या आयोगासाठी अध्यक्षांची निवड केलेली नाही. या आयोगासाठी अध्यक्षाची निवड लवकरच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.