>> अभियांत्रिकी विद्यालये व उद्योग यात समझोता करार बैठक
राज्यातील तांत्रिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठीची क्षमता वाढवण्यासाठीचे प्रयत्न यापूर्वी राज्यात कधीही झाले नव्हते, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
काल तांत्रिक शिक्षण संचालनालयाने ‘सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर एम्प्लोएबिलिटी एनटेन्समेंट’ खाली गोव्यातील ५ अभियांत्रिकी महाविद्यालये व राज्यातील १०० उद्योग यांच्यात समझोता करार घडवून आणण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत डॉ. सावंत हे बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अभियांत्रिकी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी आपले कौशल्य वाढवावे लागेल. नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे व ते शिकणे महत्त्वाचे असून राज्यातील ५ अभियांत्रिकी महाविद्यालये व १०० उद्योग यांच्यात समझोता करार घडवून आणला आहे तो त्याच उद्देशाने असे ते म्हणाले.
अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या शोधात जाणार्या अभियंत्यांकडे कसले कौशल्य आहे. ते तंत्रज्ञानात किती पारंगत आहेत हे पाहूनच कंपन्या त्यांना नोकरी देतात. अभियांत्रिकी शिक्षण घेणार्या फक्त ३० टक्के उमेदवारांनाच रोजगार प्राप्त होतो. कौशल्याच्या अभावामुळे उर्वरित ७० टक्के अभियंत्याना नोकर्या मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर सरकारने पुढाकार घेत राज्यातील पाच अभियांत्रिकी महाविद्यालये व १०० पेक्षा यांच्यात समझोता करार घडवून आणला असून याखाली या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योगात नोकरीसाठी आवश्यक असलेले कौशल्य विकसित करण्यास या कंपन्या प्रशिक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उद्योग, व्यापार व वाणिज्यमंत्री विश्वजित राणे यांनी, तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. कृत्रिम बुद्धिमतेमुळे आता आणखी मोठे बदल घडून येणार असून या अशा आव्हानाला तोंड देण्याची जर तांत्रिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी तयारी ठेवावी असे आवाहन केले.
आमदार व रायेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी, ही घटना ऐतिहासिक असल्याचे सांगितले. आयआयटीएन पद्मविभूषण अजय चौधरी म्हणाले की, देशासमोर या घडीला रोजगाराचे आवाहन असल्याचे सांगितले.