– महेश गावकर
पृथ्वीतलावरील अद्भुत, महाकाय आणि भव्यदिव्य क्रीडा सोहळा कालपासून इंग्रजभूमीत दिमाखात सुरू झाला. एकेकाळी मानवाच्या शारीरिक सामर्थ्याची कसोटी घेणारा हा वैश्विक क्रीडा महोत्सव पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाच्या काळात जगाला मैत्री आणि बंधुत्वाची हाक देण्याचे निमित्त ठरला! मैदानावर खेळाडू क्रीडा कौशल्याची उधळण करत असतानाच प्रत्येक स्पर्धक देशांमध्ये पदकांची लयलूट करण्यासाठी येथे रस्सीखेच सुरू असते. अमेरिका, चीन, रशिया या महासत्ताक देशांमध्ये अग्रक्रमासाठी चुरस असते. यजमान देशाचे खेळाडू तर अधिकाधिक पदके झोळीत घालण्यासाठी जिवाचे रान करतात. १९९६च्या ऑलिम्पिकमध्ये चक्क ३६व्या स्थानावर खाली घसरलेल्या ब्रिटनने या वेळी आपल्या खेळाडूंच्या पूर्वतयारीसाठीही प्रचंड पैसा खर्च केला आहे. यजमानपदाच्या स्पर्धेत रशियाला मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी जोरदार चुरस असेल. छोटे–मोठे देश सुवर्णपदकांची लयलूट करतात. मग भारताला ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवण्याची किती संधी आहे? असा प्रश्न भारतीय क्रीडाप्रेमींना पडतो. १९४७ नंतरच्या स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केल्यास भारतीय संघ पदकांसाठी गेल्या दोन ऑलिम्पिकपासून हॉकीवरच अवलंबून नाही, हे लक्षात येते.
मॉस्को ऑलिम्पिकमधील हॉकीचे सुवर्णपदक भारताचे हॉकीतील अखेरचे पदक ठरले होते. मात्र शूटिंग, बॅडमिंटन, बॉक्सिंग या खेळांमध्ये भारताने सध्या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केल्यामुळे या खेळातील स्पर्धांकडे आशेने पाहिले जात आहे. ऑलिम्पिक हॉकीसाठी जेमतेम पात्र ठरलेल्या भारतीय संघाकडून पदकांची अपेक्षा करणे म्हणजे चमत्काराचीच अपेक्षा करण्यासारखे आहे! १९४८च्या लंडन ऑलिम्पिकपासूनच्या कालखंडाचा विचार केला तरी भारताच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा वेग यथातथाच म्हणावा लागेल. हॉकीच्या एका पदकामुळे १९८० पर्यंत काही अपवाद वगळता पदक मालिकेत आपले स्थान कधी विसापलीकडे, तर कधी चाळिसापलीकडे कायम राखणार्या भारताला या वेळी स्थान उंचावण्याची संधी आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या तोंडून ‘इंडिया मॉंगे गोल्ड’चा नारा घुमत आहे. भारताच्या संभाव्य पदक विजेत्यांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली तरच हे घडणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक आणि सांघिक खेळांमध्ये पदके जिंकून आपले आणि आपल्या देशाचे नाव जगात अजरामर करायचे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. भारतीय खेळाडूसुद्धा त्याला अपवाद नाहीत; परंतु देशात सर्वंकष क्रीडा संस्कृती अद्यापही खोलवर रुजली नसल्याने त्याचे प्रतिबिंब भारतीयांच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीत उमटते. ‘लिखोगे– पढोगे तो बनोगे नवाब और खेलोगे– कूदोगे तो बनोगे खराब’ ही सरंजामशाहीच्या काळापासून रूढ झालेली म्हण आपल्याकडे अशी काही रुजलेली आहे की अद्यापही एखादे मूल क्रीडा प्रकारात रस दाखवत असेल तर ते वाया गेले, अशीच भावना कुटुंबीयांची आणि समाजाचीही असते. त्यामुळेच १२५ कोटींच्या भारताला २–४ पदके मिळवताना धाप लागते. इटली, स्वीडन, हंगेरी, जपान, द. कोरिया आणि क्युबासारखे छोटे देश पदकांची अक्षरश: लयलूट करीत राहतात. मात्र, आपल्याला ते शक्य होत नाही. का? आजच्या राजकारण्यांनी या प्रश्नावर मंथन करावे. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताने आजवरच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सांघिक खेळ प्रकारांत ११, तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात ९ अशी केवळ २० पदकेच कमावली आहेत.
भारताला सर्वाधिक पदके म्हणजेच तब्बल आठ सुवर्ण ज्या खेळाने कमावून दिली तो म्हणजे, आपला राष्ट्रीय खेळ हॉकी. ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या हॉकी या एकमेव क्रीडा प्रकारात भारताने १९२८ ते १९५६ अशा सलग सहा वेळा सुवर्णपदके पटकावून डबल हॅट्ट्रिक साधली होती. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या ऐन बहराच्या काळातील ही कामगिरी. मात्र, हा उज्ज्वल काळ सरला आणि त्यानंतर १९६० मध्ये रजत, १९६४ मध्ये पुन्हा सुवर्ण, १९६८ आणि १९७२ मध्ये कांस्य, तर १९८० मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरचे सुवर्णपदक मिळवले. हॉकीतील हा उज्ज्वल इतिहास वगळता भारतीयांची ऑलिम्पिकमधील कामगिरी मान खाली घालायला लावणारी आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून दिले ते कोल्हापूरच्या लाल मातीतील पहिलवान खाशाबा जाधव यांनी. हेलसिंकी येथे १९५२ मध्ये झालेल्या कुस्ती प्रकारात भारताने पहिले कांस्यपदक पटकावून वैयक्तिक कामगिरीवरील पदकांचे खाते उघडले असले तरी त्यानंतर दुसरे वैयक्तिक पदक पटकावायला भारताला तब्बल ५६ वर्षे वाट पाहावी लागली. १९९६ मधील ऍटलांटा ऑलिम्पिकमध्ये टेनिसमध्ये लिएंडर पेसने अमेरिकेच्या आंद्रे अगासीशी लढत देत देशाला दुसरे कांस्यपदक मिळवून दिले. त्यानंतर २००० मध्ये झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये करनाम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदकाची कमाई करून भारतीय महिलांच्या पदकांचे खाते उघडले. त्यानंतर २००४ मध्ये लष्कराच्या राज्यवर्धन राठोडने भारताला नेमबाजीतील कांस्यपदक मिळवून दिले. या यशानंतर नेमबाजी या प्रकारात भारताने खर्या अर्थाने प्रगती करण्यास प्रारंभ केला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारातील पहिलवहिलेे सुवर्णपदक मिळवून दिले. तेव्हापासून या खेळामध्येही भारतीय खेळाडूंचा दबदबा निर्माण होण्यास प्रारंभ झाला. बीजिंगमध्येच प्रथम भारताने विजेंदरसिंगच्या रूपाने बॉक्सिंगमधील पहिले, तर कुस्तीमधील दुसरे (खाशाबा यांच्यानंतरचे) पदक सुशीलकुमार याने जिंकून भारताची पदकसंख्या प्रथमच तीनवर पोहोचवली. आता सुरू झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ज्या दोन क्रीडा प्रकारांमध्ये सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे, त्यात नेमबाजी आणि बॉक्सिंग या दोन खेळांचा समावेश आहे. पण इतरही क्रीडा प्रकारांतही यंदा भारतीय खेळाडूंनी सुवर्णमजल मारावी हीच भारतीयांची अपेक्षा आहे.
आगामी लंडन ऑलिम्पिकसाठी ८१ खेळाडूंची भारतीय टीम पदकांसाठी झुंजणार (?) आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी टीम आहे. नेहमीप्रमाणे तमाम भारतीयांना लंडन ऑलिम्पिकमध्ये मोठ्या संख्येने पदकांच्या आशा आहेत. तर्काचा आधार घेत सदसद्विवेकबुद्धीने विचार केल्यास भारताला किती पदके मिळतील? हॉकी, नेमबाजी, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती, तिरंदाजी, जलतरण अशा एकूण १३ खेळप्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी होत असले तरीही जगातील अव्वल खेळाडूंशी स्पर्धा करताना पदकापर्यंत किती जणांना पोहोचता येईल? प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. तरीपण आशा ही मृगजळासारखी असल्याने नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि चमत्कार घडल्यास हॉकी या खेळांमध्ये पदकांची अपेक्षा करणे गैर नाही.
कुस्ती या क्रीडा प्रकारात बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेचा कांस्यपदक विजेता आणि महाबली सत्पाल यांचा पठ्ठ्या सुशीलकुमार लंडनमध्ये ६६ किलो फ्रीस्टाइल प्रकारात सहभागी होत आहे. तंत्र, डाव, चपळता यांत सुशील आघाडीवर आहे. शांत बुद्धीने फक्त खेळावर लक्ष केंद्रित करून विरोधी मल्लांना चीतपट करण्यात तो तरबेज मानला जातो. भल्याभल्यांना जमत नाही, त्या ‘क्लिचं’मध्येही तो माहीर आहे. या क्लिचंमध्ये त्याने मागच्या वेळी कांस्यपदकाची लढाई जिंकली होती. पूर्ण लयीत खेळ केल्यास सुशील पुन्हा ऑलिम्पिक पदक मिळवू शकतो. पण त्यासाठी इराण, पाकिस्तान, मलेशियाच्या मल्लांचे तगडे आव्हान त्याला पेलावे लागेल. नेमबाजीत मागच्या स्पर्धेत १० मी. एअर रायफल प्रकारात अभिनवने बिंद्राने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. या वेळीही हा ‘अभिनव’ भारत नवा इतिहास लिहिण्यासाठी सज्ज आहे. संकटातही न डगमगता लक्ष्याचाच ध्यास ठेवणारा नेमबाज अशी त्याची ओळख. स्वभावाने शांत, संयमी, कणखर आणि अडचणीतून मार्ग काढणारा लढवय्या म्हणजे अभिनव, अशीही त्याची ख्याती आहे. या वेळीही त्याच्याकडून पदकाची आशा आहे. त्याला रशिया, अमेरिका आणि चीनच्या अव्वल नेमबाजांकडून तगडे आव्हान मिळेल. गगन नारंग हा नेमबाजी क्रीडा प्रकारातील लढवय्या खेळाडू. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेचा ‘हिरो’ ठरलेल्या गगनने १० मी. एअर रायफल प्रकारात परफेक्ट ६०० गुण मिळवण्याच्या रेकॉर्डला गवसणी घातली होती. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सर्वाधिक ४ सुवर्णपदके पटकावली होती. वर्ल्डकप, आफ्रो आशियाई, एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने पदकांची लयलूट केली आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये त्याची झोळी अद्याप रिकामी आहे. या वेळी ऑलिम्पिकमध्ये त्याचा निशाणा अचूक लागेल, अशी आशा आहे. १० मी. एअर रायफल आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये ‘खेलरत्न’ पुरस्कार विजेता गगन नशीब अजमावणार आहे.
युवा भारताची ‘सोनपरी’ सायना नेहवालने बीजिंगमध्ये महिला एकेरीच्या बॅडमिंटनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठून इतिहास रचला होता. ऑलिम्पिक क्वार्टर फायनलपर्यंत धडक देणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. ज्युनिअर गटात वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा पराक्रमही तिने केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सायना पूर्ण लयीत आहे. गेल्या काही महिन्यांत तिने सिंगापूर ओपन, इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद पटकावून ऑलिम्पिक पदकाची दावेदारी सिद्ध केली होती. प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली ती सज्ज झाली आहे. तिलासुद्धा या वेळी पदक जिंकण्याचा विश्वास आहे. आक्रमक खेळ, दमदार स्मॅशमध्ये ती तरबेज झाली आहे. सायना आणि ऑलिम्पिकचे पदक यांच्यात ‘चीनची भिंत’ उभी आहे. लीन वँग, वॅन यिहान या आघाडीच्या खेळाडूंना नमवण्याचे आव्हान तिच्यासमोर असेल. सायनाला पदकापर्यंत पोहोचण्यासाठी चीनच्या या भिंतीला पार करावेच लागेल.
बॉक्सिंग क्रीडा प्रकारात विजेंद्रसिंग आणि मेरिकोम यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. बीजिंगमध्ये कांस्यपदक जिंकून विजेंद्रसिंगने भारतीय क्रीडाविश्वात नवचैतन्य निर्माण केले होते. यंदासुद्धा त्याच्याकडून पदकाच्या आशा आहेत. विजेंद्र ७५ किलो वजनगटात लाइटवेट प्रकारात नशीब अजमावणार आहे. शिवाय महिला गटात पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरीकोम विरोधी खेळाडूंवर ‘दे दणादण’ ठोशांचा पाऊस पाडण्यात सज्ज आहे. बॉक्सिंगमध्ये देवेंद्रोसिंग, शिवा थापा, जय भगवान, विकास कृष्णन यादव, सुमीत सांगवान हे खेळाडूसुद्धा पदकांचे दावेदार मानले जातात.
टेनिसमध्ये भारताकडून पुरुष दुहेरीत लियांडर पेस – विष्णू वर्धन आणि महेश भूपती–रोहन बोपण्णा अशा दोन जोड्या लंडनमध्ये खेळणार आहेत. संघ निवडीच्या वादानंतर पेस–भूपतीची जोडी मोडली गेली. या दोन नव्या जोड्या समोर आल्या. पेस आणि भूपती दुहेरीत दांडगा अनुभव असलेले स्टार खेळाडू आहेत. हे दोघेही एकत्र नव्हे, तर विभिन्न खेळणार असल्याने भारताच्या पदकाच्या आशा कमी झाल्या आहेत. पेस–वर्धनपेक्षा भूपती–बोपण्णा जोडीत ‘दम’ दिसतो. मिश्र दुहेरीत भारताच्या पेस–सानियाच्या रूपाने भारताचे दोन अनुभवी खेळाडू झुंजणार आहेत. तिरंदाजीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू दीपिकाकुमारी महिलांच्या रिकर्व प्रकारात खेळणार आहे. ती वैयक्तिक आणि टीम इव्हेंट अशा दोन्हीत सहभागी होणार आहे. बोम्बल्या देवी, चेक्रुवोरू स्वोरू आणि पुरुष एकेरी जयंत तालुकदारसुद्धा धनुर्धराची भूमिका बजावतील. दीपिकाचा फॉर्म बघता ती धक्कादायक निकाल नोंदवू शकते.
हॉकीसह इतर खेळांचा मार्ग मात्र खडतर वाटतो. हॉकीत जर्मनी, हॉलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा दिग्गज संघांसमोर भारताला दोन हात करावे लागणार आहे. भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये ‘ब’ गटात आहे. भारतासह या गटात मजबूत जर्मनी, हॉलंड, द. कोरिया, न्यूझीलंड आणि बेल्जियमचे संघ असतील. ज्यूदोमध्ये गरिमा चौधरी (६३ किलो वजनगट), टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीत सौम्यजित घोष आणि महिला एकेरीत अंकिता दास, भारोत्तोलनात कथुल्लु रवीकुमार (६९ किलो), महिला गटात एन. सोनिया (४८ किलो), जलतरणात वीरधवल खाडे (१०० मी. फ्रीस्टाइल), संदीप सेजवाल (१०० मी. ब्रेस्टस्ट्रोक), सौरव संगवेकर (१५०० मी. फ्रीस्टाइल), ऍथलेटिक्समध्ये गुरमितसिंग, बलजिंदरसिंग (पु. २० कि.मी. पायी चालणे), कृष्णा पुनिया, सीमा अंतिल (थाळीफेक), विकास गौडा (थाळीफेक), ओमप्रकाश खन्ना (गोळाफेक), टिनू लुका (८०० मी. शर्यत), रंजीत महेश्वरी (पुरुष तिहेरी उडी), मयुखा जॉनी (महिला तिहेरी उडी), रामसिंग यादव (पुरुष मॅरेथॉन) यांनी ऑलिम्पिक प्रवेश मिळवला असला तरीही पदक मिळवणे महाकठीण काम आहे. ज्यूदो, टेबल टेनिसमध्ये जपान, चीन, कोरियाच्या खेळाडूंचे वर्चस्व मोडून पदक पटकावणे सोपे काम नाही. असे असले तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास, तांत्रिकदृष्ट्या सरस आणि अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिल्यास काहीच अशक्य नाही.