स्वयंचलित हवामान व पर्जन्यमापक केंद्र उभारणीसाठी निविदा जारी

0
119

>> जलस्त्रोत खात्याने प्रस्ताव मागवले

राष्ट्रीय हायड्रॉलॉजी प्रकल्पाअंतर्गत राज्यातील विविध भागात स्वयंचलित हवामान आणि पर्जन्यमापक केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव आहे.
भारत सरकारला राष्ट्रीय हायड्रॉलॉजी प्रकल्पासाठी विश्‍व बँकेकडून आर्थिक साहाय्य लाभलेले आहे.

राज्य सरकारच्या जलस्रोत खात्याने विविध भागात स्वयंचलित हवामान आणि पर्जन्यमापक केंद्र उभारणीबाबतची निविदा जारी केली असून इच्छुक कंत्राटदारांकडून स्वयंचलित हवामान आणि पर्जन्यमापक केंद्राबाबत पुरवठा, स्थापना, चाचणी, प्रारंभ आणि देखभालीबाबत प्रस्ताव मागविले आहेत. येथील हवामान विभागाची पणजी व मुरगाव येथे पूर्णवेळ हवामान केंद्रे कार्यरत आहेत. तर, राज्यातील इतर भागातील पावसाची माहितीसाठी त्या भागातील सरकारी कर्मचारी किंवा खासगी व्यक्तीची मदत घेतली जात आहे. त्यामुळे काही वेळा पावसाबाबत वेळीच माहिती उपलब्ध होणे कठीण होत आहे. या वर्षी हवामान विभागाला वाळपई, फोंडा येथील पावसाची दैनंदिन माहिती मिळविताना अडचणींना तोंड द्यावे लागले.

या पार्श्‍वभूमीवर जलस्रोत खात्याने राष्ट्रीय हायड्रॉलॉजी प्रकल्पाच्या अंतर्गत राज्यातील विविध भागांत स्वयंचलित हवामान आणि पर्जन्यमापक केंद्रासाठी पुढाकार घेतला आहे. या निविदेसंबंधी संपूर्ण दस्तऐवज १४ ऑक्टोबरपासून संबंधितासाठी उपलब्ध केले जाणार आहेत. इच्छुक पुरवठादार येत्या ७ नोव्हेंबर सकाळी ११ वाजेपर्यंत निविदेबाबत स्पष्टीकरण घेऊ शकतात. बोली पूर्व बैठक ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घेतली जाणार आहे. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत इच्छुक ठेकेदारांकडून बोलीचे प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता तांत्रिक बोलीचे प्रस्ताव उघडले जाणार आहेत.