किनारी शॅकची १७ रोजी पणजी व मडगावात सोडत

0
127

पर्यटन खात्याकडून समुद्र किनार्‍यावरील शॅकचा लॉटरी ड्रॉ (सोडत) पूर्वी जाहीर केलेल्या २२ ऑक्टोबर ऐवजी येत्या दि. १७ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता पाटो पणजी येथे पर्यटन भवन आणि मडगाव येथे माथानी साल्ढाणा संकुलात काढण्यात येणार आहे. मांद्रे व मोरजी येथील समुद्र किनार्‍यावर २१ शॅक उभारण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती पर्यटन खात्याचे संचालक संजीव गडकर यांनी एका सूचनेद्वारे काल जाहीर केली आहे.

राज्यातील समुद्र किनार्‍यावरील शॅकचा लॉटरी ड्रॉ येत्या २२ ऑक्टोबर २०१९ रोजी काढण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटन खात्याने केली होती. राज्यातील समुद्र किनार्‍यावर शॅक उभारण्यासाठी खास धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणानुसार तीन वर्षे शॅक उभारण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. राज्यातील समुद्र किनारी भागात एकूण ३६७ शॅक उभारण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. यात उत्तर गोव्यात २५९ आणि दक्षिण गोव्यात १०८ शॅकचा समावेश आहे. शॅकचे वितरण लॉटरी ड्रॉ पद्धतीने केले जाणार आहे. पर्यटन खात्याने संबंधितांकडून शॅक उभारणीसाठी अर्ज मागविले आहे. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत शॅकसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

पर्यटन खात्याने पहिल्यांदा जाहीर केलेल्या नोटीसमध्ये मोरजी आणि मांद्रे समुद्रकिनार्‍यावर शॅकबाबत माहिती जाहीर केलेली नव्हती. या दोन्ही किनार्‍यावर वनखात्याच्या निर्देशानुसार शॅक उभारण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. मांद्रे येथे १० आणि मोरजी येेथे ११ शॅक उभारण्यास मान्यता दिली जाणार आहे.
समुद्र किनारी शॅक धोरणामध्ये शॅकसाठी तीन वर्षासाठी शुल्क निश्‍चित करण्यात आलेले आहे. तसेच ५० टक्के शॅक १० वर्षे आणि जास्त अनुभव असलेल्या व्यक्तींसाठी राखीव ठेवले आहेत. ४० टक्के शॅक ५ वर्षे आणि १० वर्षापेक्षा कमी अनुभव असलेल्या व्यक्तीसाठी राखीव ठेवलेले आहेत. तर केवळ १० टक्के शॅक पाच वर्षांपेक्षा कमी अनुभव आणि नवीन व्यक्तींसाठी राखीव ठेवलेले आहेत.