राज्यात जागतिक स्तरावरील कौशल्य विकासासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी कौशल्य विकास केंद्र निर्मितीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे गोव्यात जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र बनविण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री विश्वजित राणे यांनी येथे काल दिली.
राष्ट्रीय ऍप्रेंटीशिप प्रमोशन योजनेवरील दुरुस्तीसंबंधीच्या एका परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री राणे बोलत होते. यावेळी एमएसडीईच्या वरिष्ठ सल्लागार श्रीमती सुनीता सांघी, सीएसआर उद्योग भागीदारी प्रमुख, एनएसडीसीचे गौरव कपूर, एमएसडीई संयुक्त सचिव कैलाश चंद गुप्ता (आयएएस), सीआयआयचे गोवा राज्य परिषद अध्यक्ष ललित सारस्वत आणि डीएसडीईचे संचालक दीपक देसाई उपस्थित होते.
राज्यात कौशल्य विकास केंद्र बनविण्यासाठी कोअर ग्रुपची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी उद्योग समूहाचे सहकार्य आवश्यक आहे. उद्योग समूहाच्या सहकार्यातून राज्यातील कौशल्य विकासाची असलेली कमतरता भरून काढण्यास मदत होऊ शकते.