राज्यामध्ये यंदा डेंग्यूने कहर मांडला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्याचे खापर फोडून नामानिराळे झाले. ही अधिकृत आकडेवारी पाहा- गेल्या जानेवारीपासून सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात डेंग्यूचे तब्बल १४६८ संशयित रुग्ण आढळले. त्यातील २१७ रुग्ण डेंग्यूबाधित असल्याचे सिद्ध झाले. डेंग्यूची लागण झालेल्या सात रुग्णांचा आतापर्यंत बळी गेला. मात्र, हे मृत्यू केवळ डेंग्यूने झालेले नसून इतर आरोग्य समस्यांमुळे ओढवल्याचा दावा करून आरोग्य खाते सरळसरळ लपवाछपवी करू पाहात असल्याचे स्पष्ट दिसते आहे. आरोग्य खात्याने स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी चालवलेली जनतेची ही शुद्ध फसवणूक आहे. मुळामध्ये डेंग्यूने राज्यात एवढा कहर माजवलेला असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले हे सांगण्याऐवजी आरोग्यमंत्री ग्रामपंचायती आणि नगरपालिका सहकार्य करीत नाहीत असे सांगतात आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीन समन्वय समितीची पळवाट शोधतात याचा अर्थ काय? वास्तविक, विश्वजित राणे हे त्यांच्या धडाडीसाठी प्रसिद्ध आहेत. या व मागील सरकारमधील आरोग्यमंत्रिपदाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या आरोग्यक्षेत्रामध्ये अनेक चांगले उपक्रम राबवले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यामुळेच शिस्त आली. परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये वावरत असताना मात्र विश्वजित यांची ही सगळी धडाडी पूर्णपणे थंडावली असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. डेंग्यूचा राज्यात झालेला फैलाव आणि त्यावर नियंत्रण आणण्यात आरोग्य खात्याला आलेले अपयश हे आरोग्यमंत्री म्हणून राणे यांचेच अपयश आहे. त्याची जबाबदारी त्यांनीच स्वीकारली पाहिजे. परिसरामध्ये स्वच्छता राखणे ही पालिका आणि पंचायतींची जबाबदारी आहे हे खरे, परंतु ती जर राखली जात नसेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आरोग्य खात्याने आजवर कसूर का केली? किती जणांना अस्वच्छतेसाठी नोटिसा बजावल्या, किती जणांवर प्रत्यक्षात कारवाई केली? डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारीच्या काय उपाययोजना राबवल्या? डेंग्यूबाबत जनजागृती करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले? किमान वर्तमानपत्रांतून डेंग्यूविषयी जागृती करणार्या किती जाहिराती दिल्या? आरोग्य खात्याने वरीलपैकी काहीही केलेले नाही आणि आपले अपयश झाकण्यासाठी आता इतरांकडे बोटे दाखवली जात आहेत. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी राज्यात डेंग्यूचे प्रमाण आटोक्यात आहे हे दाखवण्याच्या धडपडीत आरोग्य खाते दिसते आहे. डेंग्यू झालेले सात रुग्ण दगावलेले असताना आरोग्याच्या इतर गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू ओढवल्याचे सांगणे हा शुद्ध बनाव आहे. राज्याचे आरोग्य संचालक कोण आहेत? ते काय करतात? ते जनतेपुढे का येत नाहीत? आजवर आम्ही त्यांचा चेहराही कधी पाहिलेला नाही. राज्यातील आरोग्य यंत्रणा ढेपाळल्यानेच आज डेंग्यूचा कहर राज्यात माजलेला आहे. बरे, केवळ एखाद्या भागापुरताच हा फैलाव नाही. मडगावात ३१४, वास्कोत १३४, पणजीत ७४ ही सगळी अधिकृत आकडेवारी पाहिली तर सर्वच शहरांतून डेंग्यूचा फैलाव झाल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. मलेरिया, चिकुनगुनिया आदींची आकडेवारी तर समोर आलेलीच नाही. डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात प्रजनन करतात. कोठेही स्वच्छ पाणी साठू न देणे हे डेंग्यू रोखण्यासाठी पहिले काम केले पाहिजे. पण राजधानी पणजीचेच उदाहरण घ्या. पणजी महापालिकेने शहरातील गटारांवर ज्या लाद्या बसवल्या आहेत, त्यांची रचनाच अशी आहे की, त्या लाद्यांमध्येच स्वच्छ पाणी साचून राहते. लाद्यांची ही रचना मंजूर करणार्याला पद्मभूषणच द्यायला हवे! म्हणजे डासांवर नियंत्रण आणण्याऐवजी महापालिकेने जणू ही डेंग्यू दास पैदास केंद्रेच ठिकठिकाणी स्थापन केलेली आहेत. राजरोस दिसणार्या या प्रकाराबाबत आरोग्य खात्याने पणजी महापालिकेला आजवर नोटीस का बजावली नाही? आरोग्य खाते एक तर झोपलेले आहे किंवा सारे दिसत असूनही बेफिकिर आहे हेच यावरून दिसते. स्वतःवरील जबाबदारी ढकलण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील समन्वय समितीच्या पळवाटा काढण्यापेक्षा आरोग्यमंत्री श्री. राणे यांनी आधी आपल्या निद्रिस्त खात्याला जागवावे. डेंग्यू, मलेरियाच्या कहरामुळे राज्यात रक्ततपासणी केंद्रांचा व्यवसाय अतिशय तेजीत आहे. सरकारला खरोखर जनतेच्या आरोग्याची फिकीर असेल तर ठिकठिकाणी अतिरिक्त मोफत रक्ततपासणी केंद्रे उघडावीत. डेंग्यू, मलेरियाच्या चाचण्याही तेथे करून द्याव्यात. डेंग्यूबाबत व्यापक जनजागृती करावी. परिसर स्वच्छतेबाबत आक्रमकपणे पावले टाकावीत. सरकारने आपले अधिकार वापरावेत. इच्छा असेल तर करता येण्यासारखे खूप आहे. पण निद्रिस्त व्यवस्था आधी जागी तर झाली पाहिजे! आरोग्यमंत्री आपल्या खात्यामध्ये नोकरभरतीसाठी जेवढा आटापिटा करताना दिसले, तेवढा जर त्यांनी राज्यातील डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी केला असता तर आजची ही नामुष्कीची वेळ ओढवली नसती!