भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गड्यांनी विजय

0
127

पदार्पणवीर प्रिया पूनिया व जेमिमा रॉड्रिगीस यांनी दिलेल्या ८३ धावांच्या सलामीच्या बळावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने काल पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी व ५० चेंडू राखून पराभव केला. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे पाहुण्यांचा डाव ४५.१ षटकांत १६४ धावांत संपवल्यानंतर भारताने २ गडी गमावून ४१.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठले.

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लूस हिने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, कर्णधाराचा हा निर्णय अंगलट आला. खेळपट्टी फलंदाजीस पोषक असतानादेखील त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून झुलन गोस्वामी (३३-३), शिखा पांडे (३८-२), एकता बिश्त (२८-२) व पूनम यादव (३३-२) यांनी प्रभावी मारा करताना द. आफ्रिकेच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची क्वचितच संधी दिली. त्यांच्या मरिझान काप हिने सर्वाधिक ५४ धावा केल्या. सलामीवीर लॉरा वुल्वार्टने ३९ धावांचे योगदान दिले. जायबंदी स्मृती मंधाना हिच्या जागी संघात स्थान मिळालेल्या प्रिया पूनियाने १२४ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांसह नाबाद ७५ धावा केल्या. मोठ्या धावसंख्येचा दबाव नसल्यामुळे तिला कुर्मगती फलंदाजी करूनही धावा जमवणे शक्य झाले. जेमिमा रॉड्रिगीसने आपले दुसरे वनडे अर्धशतक लगावताना ५५ धावा केल्या. तिने केवळ ६५ चेंडू खेळताना ७ चौकारांसह आपली खेळी सजवली. पूनम राऊत १६ धावांवर बाद झाली. कर्णधार मिताली राज ११ धावा करून नाबाद राहिली. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार ११ रोजी खेळविला जाणार आहे.