आरे मेट्रो कार शेडसाठी वृक्ष तोडण्याविरोधात आंदोलन करणार्या पर्यावरणप्रेमी व ‘आरे वाचवा’ मोहिमेतील आंदोलन करणार्या २९ जणांना न्यायालयाने काल जामीन मंजूर केला. दरम्यान या वृक्षतोडी विरोधात बहुजन वंचित आघाडीने उडी घेतली आहे. आंदोलनास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर करीत काल स्वत:ला अटक करून घेतली.
शनिवारी पोलिसांनी आरे वाचवा मोहिमेखाली आंदोलन करणार्या ३८ जणांना अटक केली होती. त्या आंदोलकांना बोरीवलीतल न्यायालयात हजर करण्यात आले होते. सार्वजनिक आदेशाचा भंग करणे, सरकारी कर्मचार्यांना कामात अडथळा आणणे व अन्य कलमांखाली त्या आंदोलकांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. ७ हजार रु.ची अनामत ठेव व पुन्हा आंदोलन न करण्याची अट त्यांना न्यायालयाने घातली आहे.
दरम्यान या वृक्षतोडीचे पडसाद काल मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. यावेळी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी वृक्षतोडीच्या कृतीला तीव्र विरोध केला. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या कृतीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
दरम्यान बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर काल सकाळी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी येणार असल्याने त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे तेथे पोलीस फौजफाटा वाढविण्यात आला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की आरेतील जंगल हवा शुध्दीचे काम करते. त्यामुळे ते टिकले पाहिजे.
आरे प्रकरणाची सर्वोच्च
न्यायालयाकडून दखल
आरे वृक्षतोडप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतली असून याप्रकरणी जनहीत याचिकेच्या स्वरूपात सुनावणी घेण्यात येणार आहे.
दिल्लीस्थित एका कायदा शाखेच्या विद्यार्थ्यांने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहून याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांना केली होती. त्याला अनुसरून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
रिशव रंजन या विद्यार्थ्यांचे पत्र जनहीत याचिका म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतले आहे.