>> आमदार आलेक्स लॉरेन्स यांची स्पष्टोक्ती
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह विविध मंत्री व सत्ताधारी आमदार माझे जे कौतुक व स्तुती करीत आहेत ती मी विरोधी आमदार म्हणून करीत असलेल्या कामामुळे. मी भाजपात प्रवेश करणार आहे असा गैरसमज कुणी करून घेऊ नये, असे कुडतरी मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
भाजपमध्ये जाण्याचा आपला कोणताही विचार नसून एक विरोधक म्हणून आपले काम करीत राहणार असल्याचे आपण वाढदिनाच्या समारंभात बोलताना स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता कुणीही कसलीही शंका घेण्यास वाव राहीला नसल्याचे ते म्हणाले.
आपण एक प्रामाणिक माणून असून राजकारणात आल्यापासून आतापर्यंत प्रामाणिकपणे आपले काम करीत आले आहे. आणि म्हणूनच मतदारसंघातील लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी ते सभापती असताना पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात आपणाला एक स्वतंत्र खोली दिली होती. स्टोअर रुमसाठीची ही खोली आपणाला दिल्यानंतर त्याचे रुपांतर आपण केबिनमध्ये केले होते असे रेजिनाल्ड यानी सांगितले. मनोहर पर्रीकर हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. माझ्या प्रामाणिकपणामुळेच कदाचित मला ती खोली मिळाली असावी, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.
रेजिनाल्ड यांचा नुकताच ५० वा वाढदिवस झाला असता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या वाढदिनाच्या समारंभाला हजेरी लावून त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. त्यासंबंधी आमच्या प्रतिनिधीने त्यांना विचारले असता त्यानी वरील प्रतिक्रिया दिली.