>> उद्धव ठाकरेंसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रपरिषद
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्क्याने निवडून येईल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी त्यांनी अधिकृतरित्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली.
भाजप आणि शिवसेनेला जोडणारा हिंदुत्व हा धागा आहे. त्यामुळे महायुती व्हावी अशी जनतेची असलेली अपेक्षा आम्ही पूर्ण केली आहे अर्थात महायुतीत काही प्रमाणात तडजोड करावी लागते. तीही केलेली आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बंडखोरांना येत्या दोन दिवसांत माघार घ्यायला लावणार असून बंडखोरी राहणार नाही असे आम्हाला वाटते असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे पण त्यांची जबाबदारी आता बदललेली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. आदित्य ठाकरे हे लवकरच आमच्यासोबत विधानसभेत दिसणार असून मुंबईतून सर्वाधिक मताधिक्क्याने ते निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, सर्व काही आकड्यांवरच अवलंबून नसून महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून ही युती झाल्याचे स्पष्ट केले. कणकवलीत भाजपचे नितेश राणे विरोधात शिवसेनेचे सतीश सावंत मैदानात उतरले आहेत याबाबत विचारले असता ठाकरे यांनी, त्यावर लवकरच तोडगा आम्ही काढू असे सांगितले.
कणकवलीत सेनेचे बंड
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात नुकतेच भाजपमध्ये आलेले नितेश राणे यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे शिवसेनेने युतीधर्म धुडकावत सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. सावंत यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. सतीश सावंत हे नारायण राणे यांचे अत्यंत निकटवर्तीय असून ते राणेंचा स्वाभिमान पक्ष सोडून काही दिवसांपूर्वी सेनेत दाखल झाले आहेत.