पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडियाने सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्याने बॅँकेंच्या महाराष्ट्र, गोव्यासह अन्य राज्यांमधील ग्राहकांत खळबळ उडाली आहे. बँकेची सद्यस्थिती पाहून ग्राहकहितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचे आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे.
आरबीआयने पीएमसी बँकेवर २३ सप्टेंबरपासून निर्बंध लागू केले आहेत. ग्राहकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आदेशात नमूद केले आहे. पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तसेच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, किंवा बँकेची देणी ङ्गेडण्यासाठी देयक अदा करू नयेत, अशा प्रकारचे निर्बंध बँकेवर असतील असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे निर्बंध सहा महिन्यासाठी लागू असतील व त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. या निर्बंधांची माहिती बँकेने प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक आहे, असे रिझर्व्ह बँकेने आदेशात म्हटले आहे.
गोव्यातही ग्राहकांमध्ये
गोंधळाचे वातावरण
दरम्यान, पीएमसी बँकेच्या गोव्यात पणजी, मडगाव, फोंडा, पर्वरी, दाबोली, म्हापसा अशी सहा ठिकाणी शाखा कार्यरत आहेत. पीएमसी बँकेच्या गोव्यासह महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक भागात एकूण १३७ शाखा कार्यरत आहेत. बँकेच्या सर्वाधिक शाखा महाराष्ट्रात आहेत. आरबीआयने निर्बंध लादल्याचं समजल्यापासून पीएमसीच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीएमसी बँकेच्या शाखांसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
आरबीआयने लादलेल्या निर्बंधाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली जात आहे. येत्या सहा महिन्यात बँकेच्या कारभारात सुधारणा केली जाणार आहे, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी दिली.
गोव्यातही ग्राहकांकडून संताप
पीएमसी बँकेवर लादलेल्या निर्बंधामुळे गोव्यातील ग्राहकांत खळबळ उडाली आहे. आरबीआयने बँकेवर निर्बंधाची माहिती लादल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्राहकांनी पीएमसीच्या पणजी, म्हापसा, मडगाव, फोंडा येथील शाखामध्ये गर्दी केली. बँकेतून केवळ महिना एक हजार रुपये काढण्यास मान्यता दिल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. ग्राहकांनी बँकेच्या स्थानिक व्यवस्थापकावर प्रश्नांचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. अनेक ग्राहकांनी बँकेतील रक्कम परत करण्याची मागणी केली. तथापि, बँक व्यवस्थापक ग्राहकांना समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. पीएमसी बँकेत खाती असलेले ग्राहक केवळ १ हजारामध्ये महिन्याचा खर्च कसा भागविणार आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.