गोव्यात वैद्यकीय पर्यटनासाठी कायद्यात दुरुस्ती करणार ः मुख्यमंत्री

0
128
????????????????????????????????????

राज्यात वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी कायद्यात लवकरच आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या पणजीत आयोजित कार्यक्रमात बोलताना काल केली.

स्वदेश दर्शन योजनेअर्तंगत उत्तर गोव्यातील हणजूण, कांदोळी येथील समुद्र किनार्‍यावर उभारलेल्या पार्किंग व इतर साधन सुविधा, मोरजी खिंड प्रकल्पाचे उद्घाटन आणि आग्वाद कारागृहाच्या विकासाच्या पायाभरणी समारंभात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी केंद्रीय पर्यटन व कला राज्य मंत्री प्रल्हाद सिंग पटेल, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, महापौर उदय मडकईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन व्यवसायातून सरकारी तिजोरीत थेट महसूल गोळा होत नसला तरी अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होत असतो. राज्यात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी समुद्र किनारे व इतर ठिकाणी आवश्यक साधन सुविधा उभारण्यात येत आहेत. राज्यातील पर्यटन स्थळावर ६० ते ७० टक्के साधन सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. अनेक पर्यटन स्थळांवर साधन सुविधा उभारण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आगामी काळात कायद्यात योग्य तरतूद केली जाणार आहे. हिंटरलॅण्ड टुरिझमसाठी साधन सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात
पर्यटन व्यवसायात यावे
राज्यातील पर्यटन व्यवसायात परराज्यातील लोकांचा वावर दिसून येत आहे. स्थानिकांनी मोठ्या पर्यटन व्यवसायात येण्याची गरज आहे. टूरिस्ट गाइड म्हणून स्थानिकांनी काम केले पाहिजे. परराज्यातील लोकांच्या हाती पर्यटन व्यवसाय सोपवून पर्यटन व्यवसाय वाढणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. एनजीओनी पर्यटन क्षेत्रातील विकास कामांना केवळ विरोधासाठी विरोध करू नये. राज्यात येणार्‍या पर्यटकांचा योग्य सन्मान केला पाहिजे. पर्यटकांची लुबाडणूक किंवा मारहाणीचे प्रकार खपवून घेणे योग्य नव्हे. एखादा पर्यटक कायदा हातात घेत असल्यास त्याला कायदेशीर मार्गाने वठणीवर आणण्याची गरज आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

गोवा राज्याने विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात स्वदेश दर्शन योजनेतील सर्वांत चांगले व वेळेआधी काम केले आहे. दुसर्‍या टप्प्यातील काम लवकर संपवा, पर्यटन विकासाच्या तिसर्‍या टप्प्यासाठी नक्की निधी देऊ, असे आश्वासन केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी याप्रसंगी बोलताना दिले. भारताला युनेस्कोमध्ये अधिकाधिक स्थान मिळावे, म्हणून प्रयत्न सुरू आहे, असे केंद्रीय मंत्री पटेल यांनी सांगितले. देशात १७ पर्यटन स्थळांवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गोव्याला १० कोटींचा निधी कला संग्रहालयासाठी मिळणार
केंद्रीय कला व पर्यटन मंत्री राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी राज्य कला संग्रहालयासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
केंद्रीय मंत्री पटेल यांच्याशी गोव्याचा इतिहास, कला व संस्कृती यांच्या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना देण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पटेल यांनी राज्य कला संग्रहालयासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच केंद्रीय योजनेतून राज्यात नव्याने उभारण्यात येणार्‍या रवींद्र भवनासाठी आर्थिक साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

हॉटेल्सचा जीएसटी २८ वरून
१२ टक्के करावा ः आजगावकर
केंद्र सरकारने विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्हिसा शुल्कात कपात करावी. तसेच, हॉटेलना लागू २८ टक्के जीएसटी १२ टक्के करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी केली. यावेळी मंत्री मायकल लोबो, आमदार दयानंद सोपटे यांची भाषणे झाली. गोवा पर्यटन मोबाईल ऍपचा शुभारंभ करण्यात आला आहे. या ऍपच्या माध्यमातून विविध पर्यटन स्थळाची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. पाटो येथे कन्वेंशन सेंटरची उभारणी केली जाणार आहे.