व्हिक्टोरिया फर्नांडिस ‘मामी’ ते ‘रणरागिणी’

0
124
  • शंभू भाऊ बांदेकर

आपण शांततावादी समाजकार्यकर्त्या असलो, तरी प्रसंग येताच आपण रुद्रावतार धारण करून रणरागिणी बनू शकतो हे त्यांनी आंदोलकांना, पत्रकारांना आणि समाजकार्यकर्त्यांना दाखवून दिले. मग पुढे त्यांचा उल्लेख ‘रणरागिणी मामी’ असा होऊ लागला. ‘मामी’ बनून त्यांनी गोरगरीबांना
न्याय मिळवून दिला.

सांताक्रुझ मतदारसंघातून चार वेळा विधानसभेवर निवडून येऊन विक्रम करणार्‍या व्हिक्टोरिया फर्नांडिस या फक्त त्या मतदारसंघाच्याच नव्हे, तर संपूर्ण गोव्याच्या जणू ‘मामी’ होत्या. समाजकारणी, राजकारणी, साहित्यिक, पत्रकारांपासून सर्व अबालवृद्धांमुखी त्या ‘मामी’ याच नावाने सुपरिचित होत्या. आमदार असो, मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो, कुणीही त्यांना मॅडम व्हिक्टोरिया किंवा मॅडम फर्नांडिस असे संबोधलेले आठवत नाही. चार वेळा विधानसभेवर निवडून येऊन त्या आमदार, मंत्री, उपसभापती बनल्या, तरी त्यांचा खरा पिंड हा समाजकार्यकर्त्याचा, अडलेल्या – नडलेल्यांचे अश्रू पुसण्याचा आणि ज्यांच्यावर अन्याय, जुलूम – जबरदस्ती झाली आहे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा होता. यामुळे वेगवेगळ्या आंदोलनांतून तन, मन, धनपूर्वक सक्रिय राहून त्या क्रांतिकारी समाजकार्यकर्त्या, लढाऊ रणरागिणी बनल्या. आंदोलनाचे नेतृत्व आपल्या वाणीने व कृतीने स्वतःकडे खेचून आणत त्या सभा-आंदोलनांमध्ये चैतन्य निर्माण करीत असत.

जनमत कौल, कोकणीला राजभाषेचा दर्जा, गोव्याला घटकराज्याचा दर्जा अशा मोठ्या आंदोलनांतून मामीने आपले नेतृत्व सिद्ध केले. रापणकरांचा मोर्चा, भाजीवाले-फळवाल्यांचा मोर्चा, दिव्यांगांना न्याय मिळविण्यासाठी मोर्चा, शेतकर्‍यांचा, शिक्षकांचा, अंगणवाडी सेविकांचा मोर्चा आणि लहान-मोठ्या सर्व आंदोलनांमध्ये त्या नेहमीच पुढे राहिल्या. आपण शांततावादी समाजकार्यकर्त्या असलो, तरी प्रसंग येताच आपण रुद्रावतार धारण करून रणरागिणी बनू शकतो हे त्यांनी आंदोलकांना, पत्रकारांना आणि समाजकार्यकर्त्यांना दाखवून दिले. मग पुढे त्यांचा उल्लेख ‘रणरागिणी मामी’ असा होऊ लागला. ‘मामी’ बनून त्यांनी गोरगरीबांना न्याय मिळवून दिला. गोवा विधानसभेत आजपर्यंत आठ-दहा महिलांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतून प्रतिनिधित्व केले आहे. पण आजपर्यंतच्या विधानसभेच्या इतिहासात दोनच महिला आपल्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने चमकल्या. त्यातील पहिल्या म्हणजे शशिकलाताई काकोडकर आणि दुसर्‍या होत्या व्हिक्टोरिया फर्नांडिस.

एकदा त्या सांताक्रुझ मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांच्या प्रचारासाठी मी काही कार्यकर्त्यांसमावेत त्या मतदारसंघात गेलो होतो. आम्ही चिंबल येथील इंदिरानगर वस्तीत पोचलो. हा भाग म्हणजे बहुसंख्य मुस्लीम, दलित आणि गोरगरीबांनी गच्च भरलेला. या भागात मामी ‘इंदिरा गांधी’ म्हणूनच प्रसिद्ध होत्या. त्या भागातील लोकांशी आम्ही संपर्क साधला तेव्हा अनेकांनी सांगितले ‘मामी आमच्या अडीअडचणीला धावून येतात, आमच्या आरोग्य, पाणी, वीज इत्यादी समस्या कोणतीही कुरकूर न करता सोडवितात. त्या आमच्या खर्‍याखुर्‍या मामी आहेत. तुम्ही काळजी करू नका. त्या आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.’ आणि झालेही तसेच! त्या प्रभागातील ऐंशी टक्के मते मामीच्या ‘हाता’ला पडली होती.

पीडीएने त्यांच्या पंचायतीचा काही भाग पणजी महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मामीच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. त्यात अर्थातच त्या विजयी ठरल्या. आपल्या मतदारसंघावर विकासाच्या बाबतीत अन्याय झाला, लोकांचा नाहक छळ झाला, मंत्री, सहकारी, अधिकारी ऐकेनासे झाले की मग त्या पत्रकार परिषद बोलवत. आपण सरकार पक्षातील असो किंवा अपक्ष आमदार असो, सरकारला पाठिंबा देऊनही आपल्यावर कसा अन्याय होतो, हे त्या पोटतिडकीने सांगत. पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे त्यांच्याकडे असत. बांबोळीचे गोवा मेडिकल कॉलेज हा तर त्यांच्या समाजकार्याचा हुकमी एक्का. आपल्या मतदारसंघातील कुणी आजारी पडला की मामींनी आपला मोर्चा इस्पितळाकडे वळवलाच म्हणून समजावे. कॉंग्रेस आघाडी सरकारचे त्या काळी दिगंबर कामत हे मुख्यमंत्री होते. तरीही प्रादेशिक आराखड्याला विरोध करायला कॉंग्रेसजन रस्त्यावर उतरले होते. मामीही आमच्या समवेत होत्या. त्या तावातावाने बोलत होत्या. ‘पीडीएची पीडा आमका नाका. आमचे सोबीत धांकटुले गोंय तुमी इबाडू नाकात. नीज गोंयकाराक वार्‍यार उडोंव नाकात.’ मग रुद्रावतार धारण करून म्हणाल्या,‘तुमी ही पीडीएची पीडा आमच्या माथ्यार थापली, जाल्या जे जे भीतर आसात तेची तकली हांव जाग्यार दवरचीं ना.’ त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आवाज मोठा केला. ‘आमकां नाका, आमकां नाका, पीडीएची पीडा आमका नाका.’ मग हीच घोषणा अधिक मोठ्या आवाजात मामींनीही केली. नंतर मलाही चेव आला. मी म्हणालो,‘आमका नाका, आमकां नाका, पीडीएची पीडा नीज गोंयकारांक नाका.’ मामीने परत ताला-सुरात चार-पाचवेळा ही घोषणा दिली. एव्हाना मामींचा घसा कोरडा पडला होता. एका कार्यकर्त्याने त्यांना पाण्याची बाटली दिली. ती घटाघटा पीत मग त्यांनी मलाही थोडे पाणी पाजले आणि आम्ही सरकारला चांगलेच पाणी पाजले या अभिनिवेशात आम्ही घरी परतलो!

आपली ऐन उमेदीची वर्षे इतरांना न्याय मिळावा म्हणून दिलेल्या मामींना त्यांच्या उतारवयात स्वतःसाठीच रस्त्यावर यावे लागले. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात विधानसभेत त्या एकमेव महिला प्रतिनिधी होत्या. आपला मंत्रिमंडळात समावेश व्हावा, ही त्यांची मागणी होती. त्यांचा मतदारसंघ तर त्यांच्या पाठीशी होताच, पण अनेक महिला संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. त्या पणजीच्या कस्टम हाऊससमोर आपल्या पाठिराख्यांसह उपोषणास बसल्या होत्या. मी त्यांना भेटायला गेलो. कार्यकर्त्यांनी मला घेराव घातला. म्हणाले, ‘हे तुमच्या कॉंग्रेस पक्षाला शोभते का?’ मी म्हटले,‘मी कॉंग्रेसचा अध्यक्ष नव्हे. पक्षाला काय वाटते मला माहीत नाही, पण माझा पूर्ण पाठिंबा मामीला आहे.’ मामींनी माझा हात हातात घेतला. त्या काही बोलल्या नाहीत. मी माझ्यापरीने त्यांना दोन शब्द सांगितले. जाताना त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाने हात फिरवला.

समाजकारणातील आणि राजकारणातील त्यांचे कार्य सर्वश्रृतच आहे. पण त्या एक चांगल्या नाट्यकलाकार होत्या. ९ जानेवारी हा विधिकार दिन आमच्या विधिकार मंचामार्फत प्रत्येकवर्षी साजरा केला जातो. यासाठी मुख्यमंत्री, सभापती, आजी-माजी आमदार, खासदार एकत्र येतात. दहा-बारा वर्षांपूर्वी या ‘लेजिस्लेचर फोरम’चा मी खजिनदार होतो. कार्यकारिणीमध्ये श्रीमती व्हिक्टोरिया फर्नांडिस, निर्मला सावंत, संगीता परब, ऍड. (कै) बाबुसो गांवकर, मोहन आमशेकर, विनयकुमार उसगांवकर अशी नाट्यरसिक माणसे होती. आम्ही वीस-पंचवीस मिनिटांचा करमणुकीचा कार्यक्रम करायचे ठरविले. लेखक, निर्माता, दिग्दर्शक या सार्‍या बाजू श्रीमती निर्मला सावंत यांनी घेतल्या. मामी नायिका, मी नायक. अनेक पात्रे तयार झाली. आमच्या त्या विनोदी नाटकाने बरीच वाहवा मिळवली. ती सुरुवात मग अनेकवर्षे चालू राहिली. एका वर्षी मामी तालमीच्या आठ दिवस आधी आजारपणामुळे इस्पितळात दाखल झाल्या. मी निर्मलाताईंना म्हटले, ‘तुम्ही खबर घेण्याच्या निमित्ताने इस्पितळात जा. त्यांच्या प्रकृतीचा कानोसा घेतल्यानंतर नाटकाचे पाहू.’ दुसर्‍या दिवशी निर्मलाताईंचा फोन आला,‘डॉक्टरी उपचार चालू आहेत, खूप थकवा आहे. विश्रांतीची गरज आहे. मी उठता उठता मामींनी माझा हात हातात घेतला व विचारले,‘आमच्या नाटकाचे काय?’ मी म्हटले,‘तू आधी बरी हो, मग नाटकाचे पाहू’ तर मामी म्हणाल्या,‘मी पूर्ण बरी आहे, दोन दिवसांत घरी जाईन. मग तालमीला सुरवात करुया. सगळ्यांना सांग.’ मला निर्मला सावंत यांनी सांगितले,‘तुम्ही उद्या जाऊन भेटा. काय म्हणते मामी ते बघा.’ मी पडत्या फळाची आज्ञा मानून इस्पितळात गेलो. मामी आराम करत होत्या. मुलीच्या सहाय्याने कॉटवर बसल्या. घरची मंडळी माझ्याकडे पाहत होती. तर मामीच म्हणाल्या,‘काल निर्मला येऊन गेली. मी तिला नाटकाबद्दल सांगितले आहे. मला परवा डिस्चार्ज मिळणार. मग धुमधडाक्यात तालमी सुरू करू.’ मी काही न बोलता स्मितहास्य केले. त्यांचा मुलगा म्हणाला,‘निर्मला आल्यापासून मामी खुषीत आहे. आता मामी घरी आल्यावर दुसर्‍याच दिवशी तालमी सुरू करा. मी मामीला तालमीला घेऊन येईन.’ मामी मला म्हणाल्या,‘तू तुझा नेहमीचा कोट, टोपी, धोतर हा ड्रेस ठेव. मी मात्र यावर्षी नवीन ड्रेस शिवून घेणार आहे. सगळेजण पोटभर हसले. मी ही सुवार्ता निर्मलाला कळवली. तालमी सुरू झाल्या. सगळ्यांचीच पात्रे छान झाली. मामी तर लाजवाब, प्रेक्षकांतून मिनटा मिनटा मिनटाला हशा आणि टाळ्या पडत होत्या.तर अशा या मामी. त्यांच्या निधनाने लोकांचा आधारवड कोसळला, तर नाट्यरसिकांचा चांगला कलाकार कायमचा पडद्याआड गेला. मामींच्या, या रणरागिणीच्या, या नाट्यकलाकाराच्या पावन स्मृतीस सलाम!