दहशतवादाची पाळेमुळे पाकिस्तानात आहेत असा टोला हाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीसंदर्भात मोदी भाष्य करीत होते. दहशतवाद एक विचारधारा बनली असून कोणत्याही एका देशापुरता तो सिमित नाही. या समस्येपासून संपूर्ण जगाला धोका आहे. आपल्या शेजारच्या देशात दहशतवाद फोफावतो आहे, असे मोदी म्हणाले.
भूतकाळात भारताने दहशतवादाविरुद्ध भूमिका घेतली आणि भविष्यातही ती भूमिका कायम राहील असे मोदी यांनी स्पष्ट केले. दहशवादाला आश्रय देणारे, त्यांना प्रशिक्षण देणार्यांविरोधात कठोर भूमिका अंगिकारण्याचा जगभरातील देशांनी निश्चय केला पाहिजे. भारत दहशतवादाच्या बिमोडासाठी सक्षम आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विरोधकांवर टिका करताना मोदी म्हणाले, ‘या देशात दुर्भाग्याची गोष्ट आहे की, ओम आणि गाय हे शब्द कानावर पडले तर काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यांना देश पुन्हा १६ व्या शतकात गेल्यासारखे वाहते. अशा गोष्टी सांगणार्यांनी या देशाला बरबाद केले आहे.’ दुसर्यांदा पंतप्रधानपदी आरुढ झाल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी मथुरेचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकर्यांसाठीच्या पशुरोग नियंत्रण योजनेची घोषणा केली. तसेच प्लास्टिकमुक्त भारतासह जय किसानचा नारा दिला.