>> अद्याप म्होरक्यासह ५ संशयित फरारी
कोलवाळ येथील भरवस्तीतील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन पळवून १०.६६ लाख रुपये लुटलेल्या ७ दरोडेखोरांपैकी दोघांना काल म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. महम्मद लुंकमन अन्सारी (झारखंड) व हसन अब्दुल बारीक अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेला टेम्पो, ऍक्टीव्हा स्कूटर, ३३ हजार रुपये, एटीएम मशीन, दोन रेनकोट व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांनी काल रात्री उशिरा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोरट्यांना अटक केल्याची माहिती दिली. रविवारी २१ ऑगस्ट रोजी पहाटे २.२० ते २.३५ वा.च्या दरम्यान संशयितांनी कोलवाळ येथील एटीएम मशीन कापून पळवून रेवोडा येथील जंगलात नेऊन आतील १०.६६ लाख लुटले होते. यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत २३ रोजी आसगाव येथे राहत असलेला व मूळ झारखंड येथील महम्मद अन्सारी याला आसगाव येथे जेरबंद केले व त्याच्याजवळील चोरीस वापरलेली जीए ०३ जे – ०७६२ क्रमांकाची ऍक्टीव्हा स्कूटर व जीए ०३ डब्ल्यू ४७८२ क्रमांकाचा टेम्पो जप्त केला. दुसरा संशयित हसन बारीक याला शेट्टची अल्ली, बागगुट्टे येथून पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र व ईशाद वाटांगी यांनी अटक करून काल रात्री गोव्यात आणले. अद्याप या दरोड्याचा सूत्रधार रुस्तम खान, आमीर सलीम, असुद्दीन व कायला हे पाच संशयित फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा शोध जारी असून त्यांना लवकरच पकडण्यात येणार असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.
दरोडेखोरांनी एटीएम मशीन पळवीत असताना सीसीटीव्ही कॅमेर्यांचीही चोरी केली होती. एटीएम मशीन कोलवाळपासून चार किलोमीटर अंतरावर करक्याचा व्हाळ, रेवोडा येथील जंगलात फोडलेल्या स्थितीत खाली सापडले होते.
एटीएम लुटमार प्रकरणी पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे.