
>> भारताने घडवला इतिहास
>> ४८ दिवसांत चंद्रावर पोहोचणार
सारा देश ज्याची वाट पाहत होता तो क्षण अखेर सगळ्यांनी काल अनुभवला. भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम असलेले ‘चांद्रयान – २’ काल यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले आणि सुवर्णाक्षरांनी या क्षणाची नोंद इतिहासात झाली. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून चांद्रयान चंद्राच्या दिशेने झेपावले.
संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही एमके – ३ या प्रक्षेपकाने उड्डाणानंतर बरोबर १५ मिनिटांनी चांद्रयानाला त्याच्या नियोजित कक्षेत नेऊन सोडले आणि नियंत्रण कक्षातल्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या ताणलेल्या चेहर्यांवर पहिले हास्य उमटले. टाळ्यांचा एकच कडकडाट झाला आणि इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी आपल्या सहकार्यांचे अभिनंदन केले.
चांद्रयान आपल्या कक्षेत स्थिर झाल्यानंतर आता पुढचे २२ दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने आपला प्रवास सुरू करेल. अवकाशात झेपावलेले हे चांद्रयान सुमारे ४८ दिवसांत चंद्रावर पोहोचणार आहे. ६ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान चांद्रयान चंद्रावर पोहोचेल, असा अंदाज आहे. पुढचे काही दिवस या चांद्रयानासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तब्बल २५ वर्षे या मोहिमेवर काम सुरू होते. अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी घडल्याचे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितले. हा क्षण याचि देही याची डोळा अनुभवण्यासाठी इस्रोमध्ये अनेक लोकांनी गर्दी केली होती.
गोवा विधानसभेत अभिनंदन
गोवा विधानसभेने चांद्रयान – २ मोहिम यशस्वी करणार्या झस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले. सभापती राजेश पाटणेकर यांनी अभिनंदन ठराव विधानसभेत वाचून दाखविला.
भारतासाठी ऐतिहासिक क्षण : मोदी
‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण पंतप्रधानांनी लाइव्ह पाहिले. त्याचे काही ङ्गोटो ट्विट करत पंतप्रधानांनी या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. चांद्रयान-२च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी झटणार्या शास्त्रज्ज्ञांचे मी देशवासीयांच्या वतीने अभिनंदन करत आहे, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. ‘चांद्रयान-२’चे वैशिष्ट्य म्हणजे हे यान पूर्णपणे स्वदेशी आहे. या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचणारा पहिला देश ठरणार आहे. या मोहिमेमुळे चंद्राविषयी आपणास नवी माहिती मिळेल. या मोहिमेतून युवा पिढीला निश्चितच नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.